लेख : अंतरातील ऊर्जा


>>दिलीप जोशी<<

सध्याच्या तरुणाईचं जग कमालीचं विस्तारलेलं आहे. जागतिक खेडय़ाची (ग्लोबल व्हिलेज) संकल्पना, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती-तंत्रज्ञानाच्या उदयानंतर प्रत्यक्षात उतरली. एकोणीसशे नव्वदच्या दशकात पहिले वहिले कॉम्प्युटर ही कुतूहलाची आणि ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी ‘प्रतिष्ठs’ची गोष्ट होती. त्यापूर्वी सत्तरच्या दशकात तर असा संगणक येऊ घातलाय त्याच्या कौतुकाचा चक्क एक धडा आमच्या कॉलेजच्या इंग्लिशच्या पुस्तकात होता. कधीकाळी ‘टूण्टसिक्स’ कॉम्प्युटरची किंमतसुद्धा चाळीस-पन्नास हजारांपर्यंत होती. म्हणजे त्या वेळचं रुपयाचं मूल्य लक्षात घेतलं तर आता किती होईल बघा! आता तो ‘कॉम्प्युटर’ खेळण्यातला वाटावा असे लॅपटॉप आणि पामटॉप तसेच टॅब्ज आले आहेत. त्यातच इंटरनेट नावाच्या सर्वंकष आणि सर्वव्यापी संपर्क यंत्रणेने या कॉम्प्युटरची करामत घरोघर नेली. सेलफोनच्या रोजच्या नव्या आवृत्ती क्षणार्धात जगाचा कोणताही भाग ‘जोडून’ देऊ लागल्या.

या सगळय़ाचा परिणाम म्हणून माणसं माणसांच्या यंत्र-सान्निध्यात आली. पण मनाने किती जवळ आली आणि माहितीच्या धो धो वर्षावात चिंब होत असताना ज्ञानाची तहान किती भागवता आली यावर कोणीतरी संशोधन करायला हवं. (किंवा केलंही असेल) या सगळय़ा ‘प्रगती’ने नवी पिढी सुखी, समृद्ध आणि मुख्य म्हणजे कमालीची उत्साही होईल, अशी अपेक्षा होती.

तरुणपण मुळात उत्साह आणि उमेद घेऊन येतं. भरपूर कष्ट करण्याची शारीरिक शक्ती असते आणि मानसिक शक्तीची जोड मिळाली तर यशाची अवघड शिखरंही सर करता येतात. तसे अनेक तरुण-तरुणी असतातच. अगदी विपरीत परिस्थितीशी झगडतही आत्मभान जागृत ठेवून आत्मोन्नती करणारे दीपस्तंभ कौतुकाचा, इतरांच्या प्रेरणेचा विषय ठरतात. नव्या काळाने दिलेल्या तंत्रज्ञानावर स्वार होणं ज्याला साधलं त्यांच्या प्रगतीची गती अफाट असते. नव्यातल्या ‘सोन्या’ची ही लखलखती बाजू, परंतु जगातल्या कित्येकांच्या वाटय़ाला हे भाग्य येत नाही. विशेषतः आफ्रिकेतल्या काही देशातला आर्थिक आणि एकूणच मागासलेपण इतकं टोकाचं आहे की, प्रगत जगाच्या समृद्धीची हवा त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. इथिओपिआसारखा देश वर्षानुवर्षे दुष्काळाच्या सावटाखाली असतो. तिथल्या मुलांचं बालपण आणि तरुणांचं तारुण्य झाकोळून जातं. तंत्रज्ञानाने प्रगती केलेल्या जगात याची माहिती सर्वदूर पसरली तरी अनेकांचा भाग्योदय होतच नाही. याउलट अतिसमृद्ध देशात वेगळय़ाच समस्या नवतरुणाईला सतावतात. खिशात पैसा खुळखुळत असल्याने व्यसनांचं प्रमाण कित्येकांचं तरुणपण बरबाद करतं. त्यातच आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, क्लायमेट चेंज म्हणा. अशा आपत्तींनी अकल्पित अशा ‘व्हायरस’चे रोग जगभर फैलावतात. पंचवीस वर्षांपूर्वी ज्या आजारांची नावंही ठाऊक नव्हती त्यांची धास्तावणारी चर्चा होते. बुद्धिमान माणसाच्या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीने सात अब्ज माणसांचं जग एव्हाना सुखी व्हायला हवं होतं. प्राणी-पक्षी आणि वनश्रीचं संरक्षण व्हायला हवं होतं. स्वच्छ पाणवठे आणि समुद्र यामुळे पृथ्वीवरचं वातावरण आल्हाददायक बनायला हवं होतं. पण एका बाजूला ‘प्रगती’चा वेग सुसाट होत असताना दुसरीकडे माणसं ‘सुखी’ होताना मात्र दिसत नाहीत. म्हटलं तर सगळं आहे पण… या ‘पण’मध्ये अनेकांच मन व्यापून टाकणारा ताण-तणाव आहे. संधी आहेत, पण अनिश्चितताही आहे. स्पर्धा आहे, पण मनातला कल्लोळ आहे.

अशा वेळी उगवत्या पिढीच्या मनात विशी-पंचवीशीच्या वयात ‘डिप्रेशन’सारख्या धास्तीने प्रवेश केला तर त्यातून बाहेर यायला बराच प्रयास करावा लागतो. सर्वव्यापी प्रदूषणाने आधीच नकळत तनमनावर झालेला दुष्परिणाम त्यात भर टाकतो. काय होतंय कळत नाही, पण ‘स्वस्थ’ वाटत नाही असा अनुभव आपल्यालाही कधीतरी येतोच. सगळेच काही लगेच ‘डिप्रेशन’ची शिकार होत नाहीत, पण एक प्रकारचा कंटाळवाणेपणा साचत जातो. चिडचिड वाढते. अमेरिकेतल्या एका संस्थेने अनेक वर्षे हजारो मुलांच्या जीवनपटाचा त्यांच्या बालपणापासून अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की, तरुण वयात विविध कारणांनी डिप्रेशन (नैराश्य) ग्रासत असेल तर त्याचा परिणाम पन्नाशीतच ‘विस्मरण’ होण्यात होऊ शकतो. पन्नाशीचा काळ म्हणजे तरुण वयात कष्ट करून मिळवलेल्या यशाची अनुभूती घेण्याचा. परंतु पूर्वी आलेल्या ताणतणावाने ‘सुवर्ण’काळ असा झाकोळून जाणार असेल तर वेळीच सावध झालं पाहिजे. वयस्कर मंडळीनी तरुणाईच्या समस्या समजून ‘मार्गदर्शन’ केलं पाहिजे. हे जितकं खरं तितकंच तरुणाईनेही मागच्या पिढीचा सगळाच अनुभव ‘आऊट डेटेड’ आहे असं न समजता त्यातली चिरंतन मूल्ये समजून घेतली तर सर्वांचचं भलं होईल. जुन्या-नव्या पिढीत पूर्वी मैलभराचं अंतर असेल तर आता ते शंभर मैलांचं झालंय असं म्हटलं जातं. दोन पिढय़ांमध्ये अंतर हे असायचंच, पण सर्वांच्याच ‘अंतरा’तील ऊर्जा एकवटली तर भरपूर ‘एक्स्पोजर’ असलेली नवी पिढी आणि ‘एक्स्पीरिअन्स’ गाठीशी असलेली मागची पिढी यांच्यात समन्वय साधला जाईल. जीवनातल्या अनेक अकस्मिक समस्यांना कसं तोंड द्यावं हे अनुभवसिद्ध ज्ञान नव्यांना मिळेल. मग नैराश्य आणि त्यानंतर येऊ शकणाऱ्या विस्मरणाची चिंता सातावणार नाही.