लेख : कधी बहर… कधी शिशिर…

188

>>दिलीप जोशी<<

[email protected]

ऋतुचक्राच्या बदलाप्रमाणे माणसाच्या जीवनचक्रातही बदल घडत असतात. निसर्गाचे ऋतू सहाच, पण मानवी भावभावनांचे कितीतरी. त्यात कधी फुलारलेला बहर येतो तर कधी पानगळीचा शिशिर. चिरंतन सुखाचा शोध माणूस हजारो वर्षांपासून घेतोय. ‘सर्वेः सुखिनः सन्तु’ म्हणजे सर्वजण सतत सुखी राहोत अशी उदात्त प्रार्थनाही आपल्या संस्कृतीत आहे. कुणाला वाटतं श्रीमंतीत सुख आहे तर कुणाला ते साधेपणात सापडतं. गणिती पद्धतीने ज्यांची उत्तरं सापडत नाहीत असे मनोव्यापार क्षणोक्षणी बदलत असतात. सुखदुःखाच्या कल्पनाही बदलतात. काल ज्या गोष्टींचं वाईट वाटत होतं, चुटपूट लागत होती त्याबद्दल आज काहीच वाटत नाही किंवा काल ज्यात खूप सुख वाटत होतं ते आता सापडत नाही. असा मनाचा खेळ.

जगात हल्ली ‘स्टॅटिस्टिकल’ पाहणी करून अनेक गोष्टींचे ‘निष्कर्ष’ काढले जातात. ही ‘पाहणी’ कुठे, कोणत्या देशात होते, त्याच्या कसोटय़ा काय असतात अशा स्थळकाळावर बऱयाच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे एका देशातल्या ‘सुखा’च्या कल्पना दुसरीकडे लागू पडतीलच असं नाही. पूर्वी एका अर्थसंस्थेने केलेल्या पाहणीत एका गरीब देशातले लोक ‘समाधानी’ तर श्रीमंत देशातले अस्वस्थ असल्याचा निष्कर्ष आला होता. कारण समाधान हीसुद्धा सापेक्ष गोष्ट आहे. अल्पसंतुष्ट किंवा ‘नशिबावर’ भार टाकणारे जे आहे ते स्वीकारतात. उलट, अधिक काही मिळालेल्यांना त्यात भर कशी पडेल किंवा ते टिकेल की नाही याची विवंचना असते. पहिल्या वृत्तीने निक्रियता येऊ शकते तर दुसऱया वृत्तीने हाव संपत नाही. समाजात खूप ‘वेल ऑफ’, पण काहीतरी दुखावलेली माणसं दिसतात. तेव्हा ‘सुख दुखतंय’ अशी शेरेबाजी केली जाते. काही कष्टकरी चेहऱयावरची प्रसन्नता ठेवून जगताना पाहिले की आश्चर्य वाटतं, परंतु हा अंतर्मनातील ऊर्जेचा आणि ‘माइन्डसेट’चा भाग आहे.

बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं ते खरं आहे. पण तसं मौजमजा करता येणारं, खेळण्या-बागडण्याची संधी मिळालेलं बालपण असेल तर अनेकांच्या वाटय़ाला तेही येत नाही. नंतरचा तारुण्याचा काळ मात्र तन-मनाने फुलण्याचा असतो. अमूर्त आनंदाच्या ऊर्मींनी मन भरून, भारून जातं. म्हणून सोळाव्या वर्षी बहुतेक लोक आनंदी असतात असं या पाहणीत आढळलं. सोळावं वरीस म्हणजे ‘तरुणपणाच्या नाक्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं’ असतंच, पण कवी (गदिमा) म्हणतात त्याप्रमाणेच ‘तोल सुटावा अशी’ हीच वेळ असते. तो सावरण्याचं साधलं तर तारुण्य नवनवोन्मेष घेऊन येतं. कर्तृत्व बहरतं. वेळीच सावध होऊन पुढच्या गोष्टींचा कानोसा घेता आला तर आयुष्याला चांगलं वळणही देता येतं. माझ्या परिचयाच्या एका तरुणाच्या वडिलांचा छोटासा घरगुती व्यवसाय होता. घरात शिक्षणाची परंपरा नव्हती, पण याने स्वतः योग्य वेळी योग्य विचार करून इंजिनीअरिंग पूर्ण केलं. स्वतःची बौद्धिक उन्नती तर साधलीच, मोठय़ा कंपनीत मोठय़ा पदावर रुजू होऊन साऱया घराची आर्थिक स्थितीही उंचावली. लहान भावंडांना शिक्षण दिलं आणि हे सर्व आपण काही विशेष केलं असं न मानता. त्याचे वडील मला सांगत, ‘‘आमच्या मुलामुळे आम्हाला ऊर्जितावस्था आली.’’ तर तो म्हणे ‘‘आईबाबांच्या मायेमुळे आणि प्रोत्साहनाने हे शक्य झालं.’’ आज तो पन्नाशीतला सुखी माणूस आहे.

या संस्थेच्या अहवालात सोळाव्या वर्षांनंतर सौख्यकाळाचं वय एकदम ‘सत्तर’ असं नोंदलंय. सत्तराव्या वर्षी बहुधा निवृत्ती स्वीकारलेली मंडळी चार पैसे गाठीला बांधून सांसारिक विवंचनांमधून मोकळी झालेली असतात. समवयस्क लोकांमध्ये ‘आपल्या’ काळातल्या आठवणीत रमून ‘नॉस्टॅल्जिक’ होतात. पर्यटनाला जातात. माझ्या माहितीतल्या एका सत्तरीजवळ आलेल्या ‘तरुणा’नं गाणं शिकण्याचा क्लास लावलाय. कॉलेजमध्ये गाणं म्हणायचो, नंतरच्या काळात शक्यच झालं नाही, आता निवांतपणा मिळालाय तर जुना छंद जोपासतोय. मला काही गाण्यांचे कार्यक्रम करण्याएवढा मोठा गायक व्हायचं नाही, पण जे गुणगुणतो ते सुरात असावं म्हणून हा क्लास. एकदा त्याच्याबरोबर त्या ‘क्लास’ला गेलो तर तिथे एक पंच्याहत्तरीचे गृहस्थही ‘पेटी’ शिकायला आलेले पाहिले. अशा प्रकारे ‘संध्याछाया भिवविती हृदया’ऐवजी ‘संध्याछाया सुखविती हृदया’ असं जमलं तर किती छान!

पण सर्वांनाच ते कसे जमावे, याच पाहणीनुसार सोळा आणि सत्तर ही वयं सौख्याची शिखरं आहेत, तर वीस ते पन्नास ही दरी. कारण या काळात कौटुंबिक, व्यावसायिक जबाबदाऱया आणि त्यातून येणारे ताणतणाव यांचे चढउतार सुरू असतात. अनेकदा यश मिळते तर काही वेळा अपयशाचे चटके बसतात. नेमकं काय करावं अशी ‘किंकर्तव्यमूढ’ स्थितीही अनेकदा होते. हा एवढा काळ संयमाने सांभाळला तर उतारवय समाधान देतं. सत्तरीतल्या समाधानाचा सौख्याचा पाया सोळाव्या वर्षीच विचारपूर्वक घालण्याचा सुज्ञपणा ज्यांना साधतो ते आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवतात. तरीसुद्धा ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’ हे  चिरंतन सत्य उरतंच!’

आपली प्रतिक्रिया द्या