मुद्दा : वाढलेल्या थंडीची कारणमीमांसा

cold-wave

>>डॉ. रंजन केळकर, ज्येष्ठ हवामान तज्ञ

सध्या खूप थंडी जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी ती खूप वाढली, पण त्याचवेळी निसर्गाला कोणतीही मर्यादा नसते हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात अतिशय थंडी आणि उन्हाळ्यात खूप उष्णता जाणवते. यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे वाऱ्याची दिशा. सध्या अचानक पारा उतरलेला दिसतो कारण उत्तरेकडून येणारे वारे. हवामानात जो बदल जाणवतो, तो उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे. देशाचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो. उत्तरेकडचा भाग हा शीत कटिबंधात आहे. उत्तरेकडून वाहत येणारे वारे हे थंडावा घेऊन वाहातात. सध्या समुद्राकडून वारे वाहत नाही, पण त्याचवेळी उत्तरेकडून वारे वाहत असल्याने थंडी अधिक जाणवते. त्यामुळे नाशिक, धुळे येथे निचांकी तापमान आहे, कारण हे जिल्हे या थंड वाऱ्याच्या दिशेत येतात. सकाळी 7 ते 7.30 या वेळेत तापमान कमी झालेले जाणवते. मध्यरात्रीपासूनच तापमान कमी होण्यास सुरुवात होते, हे कमी तापमान द्राक्ष पिकासाठी घातक आहे. याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कल्पना असते. आपण गारठा जास्त जाणवला की जशी शेकोटी करतो, अगदी त्याचप्रमाणे हे घसरलेले तापमान पिकांना घातक ठरू नये यासाठी शेतात शेकोटी पेटवून फळांना उपयुक्त वातावरण निर्माण केले जाते. अलीकडे तर शेतकरी द्राक्ष बागेच्या संरक्षणासाठी हिटर बसवतात. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात लोकांना योग्य ती खबरदारी घ्यायची माहिती असते. दिल्लीत तर हिवाळ्यात दर वर्षी 2ते 2.50डिग्री तापमान असतें. कारण तिथून हिमाचल प्रदेश जवळ आहे. उन्हाळ्यातही उष्णता जास्त असते, कारण जवळच असलेल्या राजस्थानच्या वाळवंटावरून वाहणारे उष्णवारे. आपल्याकडे अशा घटना फार दिवस टिकत नाहीत. त्यामुळे थंडी जास्त पडली किंवा उन्हाळा जास्त जाणवला तर त्याचा जागतिक तापमानवाढीशी काही संबंध नाही. त्यामुळे थंडीची ही स्थिती कायमच राहील किंवा पुढच्या वर्षीही अशीच थंडी पडेल असे नाही. हवामानाची ही स्थिती वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून असते. जागतिक घटना आणि स्थानिक घटना यांच्या मध्ये आपण फरक करायला शिकले पाहिजे. निसर्गाला कोणतीही सीमा नसते. निसर्गाला कोणतीही बंधने लागू होत नाहीत. हिवाळ्यात थंडी राहणारच. त्यात न भूतो ना भविष्यति असे काही नसते.