हिंदुस्थान-अमेरिका संबंधांचा नवा अध्याय

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

[email protected]

हिंदुस्थान-अमेरिका संबंध वरच्या स्तरावर पोहोचणे ही आपल्या विदेश नीतीच्या यशस्वीतेची खूणगाठ आहे. आपल्या विदेश नीतीचे उचित कृतीत रूपांतर झाले आहे. हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर हिंदुस्थानसाठी निर्विघ्न झाले पाहिजेत. चीनच्या आक्रमक हालचालींना दोन्ही महासागरांतून प्रतिबंध झाला पाहिजे. अमेरिकेच्या पुढाकारामुळे जपान व ऑस्ट्रेलिया हे असा प्रतिबंध करू शकतील. हिंदुस्थान-अमेरिका संबंधांमधील नवा अध्याय आनंददायी आहे यात शंका नाही.

हिंदुस्थान-पाकिस्तान नियंत्रणरेषेवर दहशतवाद्यांना ठार मारले जात आहे. तेथील लष्करी मोहिमा चालूच राहतील असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत. त्या देशात दहशतवाद्यांना अभय दिले जात असून ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही असा इशारा हिंदुस्थान व अमेरिकेने संयुक्तपणे द्यावा, हे महत्त्वपूर्ण आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. अफगाणिस्तानात शांतता व सुरक्षा नांदावी आणि हिंदुस्थानातील दहशतवादी कारवाया कमी व्हाव्यात यासाठी पाकने त्या गटांवर कठोर कारवाई करावी अशी दोन्ही देशांची मागणी आहे. पाकमधील दहशतवादी गटांची ताकद वाढल्यास ते तेथील सरकारला धोक्यात आणतील. पाकने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करावेत. त्यांना अभय देणे सहन केले जाणार नाही व उलट त्यालाच जबाबदार धरू असा स्पष्ट इशारा टिलरसन यांनी दिला आहे.

अमेरिकी अफगाण धोरणात हिंदुस्थानास स्थान आहे. त्यामुळे इंडो-पॅसिफिकमध्ये अमेरिकेस हिंदुस्थानचे सहकार्य हवे आहे. तिथेच दहशतवाद रुजला व त्या परिणामी ‘९/११’ घडले. त्यामुळे अमेरिकेस हिंदुस्थानच्या मदतीनेच तो दहशतवाद काबूत आणता येणार आहे.

जागतिक पातळीवर मोठी भूमिका निभावण्याचे संकेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पक्षाच्या अधिवेशनात बोलताना नुकतेच दिले. या पार्श्वभूमीवर टिलरसन यांची हिंदुस्थान भेट अर्थपूर्ण मानावी लागेल. चीनचा विस्तारवाद आणि पाकपुरस्कृत दहशतवाद ही अमेरिकेची व हिंदुस्थानची चिंता आहे. अमेरिकेच्या मुठीत न जाता या महासत्तेचे लाभ उठवणे हे हिंदुस्थानचे धोरण आहे. हिंदुस्थान व अमेरिकेची अंतिम उद्दिष्टे समान असली तरी त्यांचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत. उभयतांनी राष्ट्रीय हित ध्यानात घेऊनच एकत्र आल्यास हिंदुस्थान-अमेरिका भागीदारी यशस्वी होईल. हिंदुस्थान इराणमधील चाबार बंदर विकसित करण्याचे काम करत आहे. दुसरीकडे इराणबरोबरचा अणुकरार रद्द करण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा आहे; पण हिंदुस्थान-इराण संबंधांमुळे अमेरिकेच्या कपाळावर आठी पडणार नाही हे टिलरसन यांनी स्पष्ट केले,

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हक्कानी नेटवर्कने एक कॅनडियन नागरिक व त्याच्या अमेरिकन पत्नीस ओलीस ठेवले होते. नुकतीच त्यांची मुक्तता करण्यात आली. ट्रम्प यांनी पाकिस्तानला दमात घेतले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांना काही दिवसांपूर्वीच आम्ही अमेरिकेसमवेत दहशतवाद्यांविरुद्ध संयुक्त कारवाई करू, हक्कानी नेटवर्क उद्ध्वस्त करू असे वरवरचे का होईना आश्वासन देणे भाग पडले. अफगाणिस्तानातील ‘इसिस’ व ‘अल कायदा’ला नष्ट करा अशी पाकची मागणी आहे; पण तालिबान व हक्कानीला मात्र धक्का लावायचा नाही. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी हिंदुस्थान व पाकिस्तानला भेट दिली त्यावरून सध्या चीनचा गोंधळ उडाला आहे. कारण दिल्लीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी टिलरसन यांची प्रदीर्घ बोलणी झाली. त्यात टिलरसन यांनी खुलेआम हिंदुस्थानची भूमिकाच अमेरिकेला मान्य असल्याचे बोलून दाखवले. स्वराज व टिलरसन यांनी समान शब्दांत पाकिस्तानातील दहशतवादाचे नंदनवन उद्ध्वस्त करण्याची मागणी केली त्यावरून पाकिस्तान विचलित झाला; पण त्यापेक्षाही चीन अधिक गडबडला असून त्याने थेट जगासमोर पाकिस्तानसाठी पदर पसरला आहे. पाकिस्तान दहशतवादाच्या निर्मूलनासाठी अखंड झटत असून जगाने पाकिस्तानला त्यात मदत केली पाहिजे असे आवाहन चिनी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने जाहीरपणे केले. जगातले अनेक देश पाकच्या दहशतवादी राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात बोलू लागले आहेत. अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या विविध अनुदान वा साहित्याचा झरा आटत गेला आहे. एकमेव पाठीराखा असलेल्या चीनचीही सातत्याने नाचक्कीच झालेली आहे.

हिंदुस्थानी उपखंडातील देशांच्या संस्थेतही पाकिस्तान एकाकी पडलेला आहे. त्याच्या जिहादी उचापती व गुप्तचर खात्याच्या घातपाती कारवायांना बांगलादेश, श्रीलंका वा अन्य देशही कंटाळलेले आहेत. कारण त्यांनी कुठल्याही देशातील मुस्लिम अल्पसंख्य लोकांना हाताशी धरून तिथे जिहादी हिंसाचार माजवायच्या कारवाया सातत्याने चालविल्या आहेत.

अफगाण युद्ध संपून तिथे लोकशाही नांदवण्यासाठी अमेरिकेने अब्जावधी डॉलर्स ओतले आहेत; पण तिथेही तालिबान वा अन्य जिहादी गटांना चिथावण्या व मदत देऊन पाक हेरसंस्थेने कायमचा रक्तपात चालविला आहे, म्यानमार या देशात रोहिंग्या मुस्लिमांना चिथावण्या देऊन अस्थिरता आणली आहे. श्रीलंकेतही मुस्लिम अल्पसंख्य असताना त्यांना धार्मिक उठावाला प्रवृत्त करण्याच्या पाक कारवायांनी तिथेही बौद्ध व मुस्लिम असा संघर्ष धुमसवण्याचे पाप झालेले आहे. बांगलादेशात एक धार्मिक पक्षच पाकिस्तानचा पक्षपाती आहे आणि त्याला हाताशी धरून घातपात चालू असतात. जगभर जिथे म्हणून जिहादी हिंसाचाराचा भडका उडालेला आहे, त्याचे धागेदोरे अखेरीस पाकिस्तानात मिळतात. त्यामुळे जगातल्या सर्व शांतताप्रेमी देशांना पाकिस्तान हीच समस्या वाटू लागली आहे. अमेरिकेने बडगा उचलला तर पाकला दिवाळखोरीत जायला वेळ लागणार नाही. पर्यायाने चिनी गुंतवणूक एका दिवसात बुडीत जाऊ शकेल. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत. तिथल्या दहशतवादी संघटनांचा परस्पर बंदोबस्त केल्यास उद्या दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्रs पडतील, त्याचा ते वापर करतील ही अमेरिकेची भीती आहे. अमेरिका चीनकडून प्रचंड माल आयात करते. त्यामुळे चीन व पाकशी तुटेपर्यंत ताणायचे नाही हे अमेरिकेचे धोरण आहे. परंतु किमान पाकिस्तानला शस्त्रास्त्र न पुरवणे, त्याचा निधी पूर्णतः रोखणे, पाक लष्कराचे महत्त्व कमी करून लोकशाही संस्थांचा प्रभाव वाढवणे यासाठी अमेरिकेने पाकवर दबाव वाढवला पाहिजे. हिंदुस्थानवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हल्ले केल्यास तुम्हाला त्याची चांगलीच किंमत चुकवावी लागेल असे अमेरिकेने स्पष्ट केले पाहिजे. ट्रम्प स्वतःस सामर्थ्यवान नेते म्हणवून घेतात. पाकमध्ये त्यांनी आपली ताकद दाखवावी.