हिंदुस्थानच्या अँटी सॅटेलाईट मिसाइल परीक्षणावर नासा नाराज

1

>> स्पायडरमॅन

हिंदुस्थानने नुकतीच अँटी सॅटेलाईट मिसाइलची यशस्वी चाचणी घेतली आणि जगातील मोजक्या देशांमध्ये स्थान मिळवले. मात्र ‘नासा’ ने या यशाबद्दल नाराजीच व्यक्त केली आहे. हिंदुस्थानने आपल्या परीक्षणात नष्ट केलेल्या उपग्रहाच्या तुकडय़ांमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला धोका निर्माण झाल्याचे नासाचे म्हणणे आहे. या परीक्षणात निर्माण झालेल्या अनेक लहान मोठय़ा तुकडय़ांचा नासा शोध घेत आहे. 400 पेक्षादेखील या तुकडय़ांची संख्या जास्ती असून यातील अनेक तुकडे हे आकाराने मोठे आहेत. यातील 60 तुकडय़ांना शोधण्यात नासाला यश आले असून त्यातील 24 तुकडे हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून वरती निघून गेले आहेत. मात्र भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी या प्रकारच्या चाचण्या अयोग्य असल्याची तक्रारदेखील नासाने केली आहे. हिंदुस्थानातील अंतराळ तज्ञांनी मात्र नासाच्या या तक्रारीवरती आश्चर्य व्यक्त केले आहे. नासा हिंदुस्थानच्या चाचणीनंतर तयार झालेल्या कचऱयाला 44 टक्के म्हणत असली तरी तो प्रत्यक्षात अत्यंत नगण्य म्हणजे 1.44 असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. मुख्य म्हणजे जगात अंतराळात सर्वात जास्ती कचरा करणारा देश, हा खुद्द अमेरिका आहे. अशावेळी त्यांनी इतर देशांच्या परीक्षणांवरती अशा प्रकारे नाराजगी जाहीर करणे योग्य नसल्याचे मत या क्षेत्रातील अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. हिंदुस्थानच्या या परीक्षणानंतर निर्माण झालेल्या कचऱयाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा धोका 10 दिवसांत 44 टक्के वाढल्याचा दावा नासाच्या प्रमुखांनी केला होता. मात्र हा धोका हळूहळू कमी होत जातो कारण वायूमंडळाच्या क्षेत्रात प्रवेश करताच हे तुकडे जळून नष्ट होत असतात. प्रत्यक्षात अंतराळात 6000 पेक्षादेखील जास्ती कचऱयाचे तुकडे सध्या अस्तित्वात आहेत. चीनसारख्या देशाने 2007 साली अगदी अशाच प्रकारे केलेल्या चाचणीने जो कचरा निर्माण झाला आहे त्याचा धोका तर अजूनदेखील कमी झालेला नाही.