हवाई दलाची युद्धसज्जता : चिंतेचा विषय

3

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

राफेलच्या न्यायालयीन लढाईचा पाकिस्तान आणि चीनला नक्कीच आनंद होत असेल. त्यामुळे आधुनिक राफेल विमान हिंदुस्थानी हवाई दलामध्ये येण्याची शक्यता अजून कमी होत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हे नक्कीच धोकादायक आहे. कारण हिंदुस्थानी हवाई दलाची युद्धसज्जता एका धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. त्याचे गांभीर्य न्यायालयासह सगळय़ांनीच समजून घ्यायला हवे.

राजस्थानच्या जोधपूर येथे 1 एप्रिल रोजी हवाई दलाचं मिग-27 लढाऊ विमान कोसळलं. हे लढाऊ विमान रूटिन मिशनवर असताना हा अपघात झाला. उत्तरलाई हवाई दलाच्या बेसवरून या विमानाने उड्डाण केलं होतं. मात्र काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान कोसळलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं कळताच विमानातील दोन्ही पायलटनी विमानातून उडय़ा मारल्या. त्यामुळे ते बचावले. यापूर्वीही बिकानेरमध्ये मिग-21 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. काही दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीरच्या बडगाम येथेही हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यात दोन पायलट, चार जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

28 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात टेकऑफनंतर एक हिंदुस्थानी वायुसेनेचे जग्वार लढाऊ जेट दुर्घटनाग्रस्त झाले. 1 फेब्रुवारी रोजी फ्रान्सनिर्मित मिराज -2000 हे विमान काही मिनिटांनी क्रॅश झाले. त्यात दोन हिंदुस्थानी पायलट ठार झाले. 20 फेब्रुवारी 2019ला बंगळुरूमध्ये ‘एरो इंडिया एक्स्पो’मध्ये आयएएफ सूर्यकिरण संघाच्या दोन विमानांची विमानतळावर टक्कर झाली. म्हणजेच 2019 मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या वायुसेनेचे खूपच नुकसान झाले आहे. मुळात आपल्याकडे लढाऊ विमानांची संख्या आधीच कमी आहे, त्यात या अपघातांची भर पडत असल्याने ती आणखी कमी होत आहे. म्हणूनच राफेल विमाने लवकर हवाई दलामध्ये सामील होणे गरजेचे आहे.

चीन आणि पाकिस्तान यांच्याशी एकाच वेळी युद्ध झाले तर या दोन्ही आघाडय़ांशी दोन हात करण्याएवढे आपले हवाई दल सक्षम नाही अशी कबुली हिंदुस्थानी हवाई दलाचे एअर मार्शल बी.एस. धनोआ यांनी अनेक वेळा दिली आहे. मागील तीन-चार दशकांत हवाई दलच नव्हे, तर सर्वच संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाबाबत पूर्वीच्या सरकारांनी अक्षम्य बेफिकिरी दाखवली आहे. त्यामुळे आपले लष्कर, हवाई दल आणि नौदल शत्रूंच्या तुलनेत खूपच मागे पडले आहे. हवाई दलात लढाऊ विमानांच्या 42 स्क्वॉड्रन्सना मंजुरी असली तरी सध्या केवळ 31 स्क्वॉड्रन्सच शिल्लक आहेत. या 31 स्क्वॉड्रन्समध्येसुद्धा कुठल्याही क्षणी फक्त 50 टक्के विमानेच लढाईकरिता उपलब्ध असतात.

‘मेक इन इंडिया’चे धोरण यशस्वी करा!
फक्त तंत्रज्ञानाच्या आघाडीवरच नव्हे; तर कुशल मनुष्यबळाच्या आघाडीवरही आपल्या हवाई दलाची पीछेहाट झाली आहे. रेंगाळलेले करार आणि रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळाल्यास हवाई दलाच्या स्क्वॉड्रन्सची कमी होणारी संख्या रोखता येईल. याशिवाय कुशल मनुष्यबळाकरिता आधुनिक ट्रेनिंग विमानांची तातडीने गरज आहे.

2015 मध्ये सरकारने अंगीकारलेले ‘मेक इन इंडिया’चे क्रांतिकारक धोरण तोकडे पडले आहे. अनेक घोषणा करूनही एकसुद्धा प्रकल्प ड्रॉइंग बोर्डाच्या चौकटीबाहेर अद्यापि पडू शकला नाही. राफेल आणि ऑगस्टासारखे वायदे हीन राजकारणाला किंवा नोकरशाहीच्या लाल फितीला बळी पडले. पहिल्या नियोजनाप्रमाणे 36 नवी राफेल विमाने नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2022 दरम्यान हिंदुस्थानी हवाई दलात प्रवेश करतील. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत सहा देश अत्याधुनिक लढाऊ विमाने हिंदुस्थानात बनवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. याविषयी होणारा निर्णय पुढील एक ते दोन वर्षात घेतला जाईल आणि अत्याधुनिक विमाने हिंदुस्थानातच तयार होतील.

एका बाजूला हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होत असताना हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघातामुळे या घटनेचं गांभीर्य वाढतं. वैमानिकांची व विमानांची सुरक्षा आणि हवाई दलाची युद्धसज्जता हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. हिंदुस्थानी हवाई दलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून हवाई दलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत, तर भविष्यात चीन आणि पाकिस्तानकडून उद्भवणाऱया संकटाला तोंड देणे अवघड होईल. मी आशावादी वृत्तीचा असल्याने मला असे वाटते की, नवीन सरकार हिंदुस्थानी हवाई दलाचे ब्रीदवाक्य ‘नभ अवकाश स्पृशं दीप्तं’ पूर्ण करतील व हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढेल.

हिंदुस्थानी हवाई दलातील लढाऊ विमाने
मिग 21 – सध्या एकूण 125 सेवेत. सर्वात जुने म्हणजे 1960 साली सेवेत दाखल झालेले. 2020 पर्यंत त्यांना सेवानिवृत्त करून त्यांच्या जागी हिंदुस्थानी बनावटीची ‘तेजस’ विमाने आणण्याचा मनोदय आहे. n मिग 27 (बहादूर) – सध्या एकूण 100 सेवेत. 50 ते 55 वर्षे जुनी. n जॅग्वार (समशेर) ः सध्या एकूण 139 सेवेत. ही विमाने चाळिसेक वर्षे जुनी असून त्यांचे आधुनिकीकरण चालू आहे. n मिग 29 (बाज) – सध्या 66 सेवेत. त्यांचेही आधुनिकीकरण चालू आहे. n मिराज (वज्र) – सध्या केवळ 51 सेवेत. त्यांचेही आधुनिकीकरण चालू आहे.

सुखोई 31 एमकेआय – हवाई दलातील सर्वात आधुनिक आणि कोणत्याही कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त. सध्या अशी 204 विमाने हवाई दलात दाखल झाली असून आणखी 68 पुढील दोन वर्षांत दाखल होणे अपेक्षित आहे.

– कालबाहय़ होत चाललेल्या विमानांच्या जागी ‘तेजस’व्यतिरिक्त फ्रेंच बनावटीची ‘राफेल’ ही बहुउद्देशीय विमाने प्राप्त करण्याचे सरकारने मान्य केले आहे.

– हिंदुस्थानी हवाई दलाने आधी जॅग्वार आणि मिराज वापरणाऱया देशांशी संवाद साधून त्यांच्याकडील सेवानिवृत्त विमानांचे तांत्रिकदृष्टय़ा सक्षम भाग काढून हिंदुस्थानी विमानांमध्ये वापरण्याचे ठरवले आहे. आपल्याकडे 118 जॅग्वार विमाने आहेत, पण त्यांच्या सुटय़ा भागांची कमतरता असल्याने जी विमाने हवेत उडू शकतात, त्यांची संख्या खूप कमी आहे.