लेख : हिंदुस्थानची प्रगती, रेल्वे आणि नाना शंकरशेट


>>सतीश पितळे<<

हिंदुस्थानी रेल्वेमुळे नुसतीच मुंबईची नव्हे तर संपूर्ण देशाची औद्योगिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती झाली. रेल्वे ही मुंबईचा अविभाज्य घटक आहे, नव्हे ती तर मुंबईची लाइफलाइन म्हणूनच ओळखली जाते. मुंबईच्या वैभवसंपन्नतेची, प्रगतीची, मुंबईला औद्योगिक राजधानीचा दर्जा मिळण्याची अनेक कारणे असू शकतील, पण त्यात महत्त्वाचे एक कारण म्हणजे 190 वर्षांपूर्वी मुंबईला लाभलेले नाना शंकरशेट यांचे दूरदृष्टी असलेले, कल्याणकारी व कार्यक्षम नेतृत्व.

हिंदुस्थानात एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत रेल्वेचा पसारा अवाढव्य पसरत गेला. त्यामुळे एक प्रकारे आर्थिक संक्रमण घडत गेले. वर्तमानकाळात तर रेल्वेचे प्रचंड जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात विणले गेले आहे. दुर्गम डोंगरकपाऱ्या, विस्तीर्ण नद्यांवरून रेल्वे अव्याहत धावत असते. विद्यमान हिंदुस्थानी रेल्वे ही जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे म्हणून गौरविली जाते. तिचा कारभार म्हणजे मध्यम आकाराच्या देशाचा कारभारच होय. आज रेल्वे म्हणजे देशातील एक नंबरची नोकऱ्या निर्माण करणारी संस्था ठरली आहे.

अशा या विलक्षण संस्थेचे प्रवर्तक आहेत जगन्नाथ तथा नाना शंकरशेट. ज्यांच्याकडे संपूर्ण देशाला दळणवळणाच्या साधनांनी जोडण्याची दूरदृष्टी व स्वप्न होते. 1830 च्या सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मँचेस्टर रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेट यांच्यापर्यंत पोहोचली. नाना आपल्या ब्रिटिश मित्रांशी सतत संपर्कात राहून वेळोवेळी माहिती घेत. त्यांना सारखे वाटत असे की, अशा प्रकारचे दळणवळणाचे साधन आपल्या देशातसुद्धा असणे गरजेचे आहे, ज्यामुळे देशाचा प्रचंड आर्थिक विकास होऊ शकतो. त्याच वेळी आपल्या देशात असे साधन आणण्यात असलेल्या अडथळ्यांची नानांना पूर्ण जाणीव होती, परंतु ते दूर करता येऊ शकतात हा आत्मविश्वासदेखील होता. अडथळे दूर झाल्यावर देशाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो यावर ते ठाम होते. नाना शंकरशेट इंग्लंडमधील रेल्वेच्या प्रगतीने एवढे भारावून गेले होते की, त्यांच्या मनाने दृढ संकल्प केला की, आपल्या देशात रेल्वे आणायचीच आणि त्यासाठी ते जोमाने कामास लागले. जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतशी नानांना रेल्वेची उपयुक्तता अधिकच भारावून टाकत गेली आणि आपल्या देशाला या साधनाची नितांत आवश्यकता आहे असा ठाम विश्वास त्यांच्यात निर्माण झाला.

नानांनी आपली संकल्पना आपले ज्येष्ठ मित्र जमशेटजी जिजीभॉय- ज्यांच्यावर त्यांचा अतोनात विश्वास होता-त्यांच्याकडे मांडली व त्यांचे अनुमोदन मिळविले. सर थॉमस एरस्किन पेरी, ज्यांनी 1840 च्या सुरुवातीस मुंबईत येण्यापूर्वी इंग्लंडमधील रेल्वेच्या परिणामांचे फलित पाहिले होते, त्यांच्याशीदेखील सल्लामसलत केली. सर थॉमस एरस्किन पेरी यांच्याबरोबर नानांचे घनिष्ठ संबंध होते व खुद्द पेरीसाहेबांना हिंदुस्थानींबद्दल विशेष आपुलकी होती व त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छादेखील. हिंदुस्थानात रेल्वे स्थापन करण्यात तिघांचे एकमत झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांना हिंदुस्थानात रेल्वे सुरू करण्याच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटवण्यात तिघे यशस्वी झाले.

1843 साली रेल्वे स्थापन करण्याची संकल्पना सर्वदूर पसरली. मुंबईतील उच्चभ्रू सभ्य समाज, ब्रिटिश व्यापारी, वर्तमानपत्रे व सामान्य नागरिक याविषयी चर्चा करू लागले. सर्वांना वाटत होते की, हे एक अशक्यप्राय स्वप्न आहे. शिवाय प्रचंड व अवाढव्य स्वरूपामुळे ती एक अशक्य कोटीतील गोष्ट आहे. निरनिराळ्या शंकाकुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. खरोखरच, एवढा मोठा प्रकल्प राबविणे सोपे नव्हते, प्रामुख्याने जेव्हा असा प्रकल्प राबविण्यासाठी देशामध्ये इंजिनीअर, मशिनरी व तंत्रज्ञानाची वानवा होती. त्यासाठी देशाची सर्व मदार ब्रिटिश व्यवस्थेवर होती. सरकारने जरी पुढाकार घेतला तरी धनाढय़ व्यापारी, सावकार ज्यांना प्रकल्प संदिग्ध वाटत होता ते मदतीसाठी पुढे येत नव्हते. अशा या हिंदुस्थानातील प्रकल्पास ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनासुद्धा रस नव्हता. नाना शंकरशेट, ज्यांना देशात रेल्वे स्थापन करण्याची तीव्र आकांक्षा होती, त्यांना वरील सर्व गोष्टी व कंपनी सरकारच्या प्रतिगामी वृत्तीचा अडसर वाटत नव्हता. त्यांना फक्त ध्येयपूर्तीचा ध्यास होता. अगाध बुद्धिमत्ता, प्रचंड आत्मविश्वास, उच्च कोटीचा आदर्शवाद आणि विलक्षण उत्साहाच्या जोरावर नानांनी पाठीमागे न बघण्याचे ठरवून पुढील वाटचालीस प्रारंभ केला. अनुमती मिळताच ग्रेट इंडियन पेनिन्सुलर कंपनी लगेच कामाला लागली. कंपनीवर ईस्ट इंडिया कंपनी आणि वजनदार भांडवलदारांचे नियंत्रण होते. मुंबईत योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यात नाना शंकरशेट व करसेटजी जमशेटजी जिजीभॉय असे दोन नेटिव्ह डायरेक्टर होते. समितीने आपले भांडवल 10 लाख पौंडांपर्यंत वाढविले. सुरुवातीस मुंबई ते ठाणे हा 21 मैलांचा मार्ग मुक्रर करण्यात आला. येथे नमूद करावेसे वाटते की, मुंबई हे राजधानीचे शहर नसतानादेखील केवळ नाना शंकरशेट यांच्या प्रभावामुळे देशातील नव्हे, तर आशिया खंडातील पहिलीवहिली रेल्वे सुरू करण्याचा मान मुंबईला मिळाला. मुंबई आणि देशातील जनतेसाठी तो अविस्मरणीय दिवस उगवला. तो दिवस होता दिनांक 16 एप्रिल 1853. या दिवशी ठीक 3.30 वाजता बोरीबंदरहून ठाण्यासाठी देशाचीच नव्हे, तर आशिया खंडाची पहिली ट्रेन धावली. या ट्रेनला 18 कम्पार्टमेंट आणि 3 लोकोमोटिव्ह इंजिन्स होती. खासकरून फुलांनी शृंगारलेल्या कम्पार्टमेंटमध्ये लेडी फोल्कलंडसमवेत नाना शंकरशेट व जमशेटजी जिजीभॉय होते.

देशात व आशिया खंडात रेल्वेचे पर्व सुरू करण्यासाठी नाना शंकरशेट यांनी दृढनिश्चय, करारीपणाने केलेल्या अलौकिक, असामान्य व स्तुत्य अशा परिश्रमास अभिवादन व त्याचा बहुमान करीत राणी एलिझाबेथने नाना शंकरशेठ यांना रेल्वेने कायमस्वरूपी प्रवास करण्यासाठी सुवर्ण पास प्रदान केला.

हिंदुस्थानी रेल्वेमुळे नुसतीच मुंबईची नव्हे तर संपूर्ण देशाची औद्योगिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती झाली. रेल्वे ही मुंबईचा अविभाज्य घटक आहे, नव्हे ती तर मुंबईची लाइफलाइन म्हणूनच ओळखली जाते. मुंबईच्या वैभवसंपन्नतेची, प्रगतीची, मुंबईला औद्योगिक राजधानीचा दर्जा मिळण्याची अनेक कारणे असू शकतील, पण त्यात महत्त्वाचे एक कारण म्हणजे  190 वर्षांपूर्वी मुंबईला लाभलेले नाना शंकरशेट यांचे दूरदृष्टी असलेले, कल्याणकारी व कार्यक्षम नेतृत्व. ज्यांनी आयुष्यभर सर्व पातळ्यांवर जनतेच्या उत्कर्षाचा घेतलेला ध्यास हे प्रमुख कारण होते, नव्हे आहेच. अशा या थोर विभूतीचे मुंबईमध्ये म्हणावे तसे स्मारक सरकारने उभारलेले नाही. मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस म्हणून नामांतर करण्याचा प्रस्ताव आजही सरकारदरबारी धूळ खात पडलेला आहे. त्यावर तरी लवकर कार्यवाही व्हावी.

(लेखक नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)