पोलीस डायरी : राजकारणातील आयपीएस

1716

>> प्रभाकर पवार

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली.  पश्चिम बंगाल वगळता निवडणुकीदरम्यान फारशा कुठे हिंसक घटना घडल्या नाहीत. निकाल जाहीर झाल्यावर जातीय दंगली उसळतील असेही काही वाचाळ राजकारण्यांनी भाकीत केले होते, परंतु ते फोल ठरले. नरेंद्र मोदींच्या लाटेत अनेकांची लॉटरी लागली,  तर विरोधी पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचा पालापाचोळा झाला. निवडणुकीला उभे असलेले काही आयएएस-आयपीएस अधिकारीही जमीनदोस्त झाले. देशभरातून दोन डझन आयएएस-आयपीएस अधिकार्‍यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यातील काही उमेदवार यशस्वी झाले, तर काही सनदी अधिकार्‍यांच्या पदरी निराशा आली. निवडून आलेले महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी डॉ. सत्यपाल सिंह, तर ओडिशा कॅडरच्या महिला आयएएस अधिकारी अपराजिता सारंगी या दोन विजयी अधिकार्‍यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी अरुप पटनायक यांचा ओडिशा कॅडरच्या आयएएस अधिकारी श्रीमती सारंगी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव केल्याने त्या जायंट किलर ठरल्या आहेत. पटनायक हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. 2015 साली पटनायक महाराष्ट्र पोलीस सेवेतून रिटायर्ड झाले. त्यानंतर त्यांनी ओडिशात (आपल्या राज्यात जाऊन) नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलात प्रवेश केला. चार वर्षे त्यांनी मेहनत घेतली. दरम्यान ओडिशातील 1994 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या श्रीमती अपराजिता सारंगी यांनी गेल्या वर्षी सेवानिवृत्ती पत्करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची लोकसेवेची इच्छा पूर्ण झाली.

महाराष्ट्र कॅडरचे व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांचीही तीच गत झाली. आयपीएस सेवेची तब्बल सात वर्षे शिल्लक असताना लक्ष्मीनारायण यांनी गेल्या वर्षी सेवेचा राजीनामा दिला. त्यांनी आंध्र प्रदेशातील जनसेवा या पक्षातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, परंतु एक हुशार व फर्डा वक्ता असलेल्या महाराष्ट्राच्या या थेट आयपीएस अधिकार्‍याचा वायएसआर काँग्रेसच्या एम.व्ही. सत्यनारायण यांनी पराभव केला. बुद्धिवान, प्रामाणिक लोकप्रतिनिधीची आम्हाला गरज नाही असेच आंध्रच्या मतदारांनी मतदान पेटीतून दाखवून दिले. समाजाबद्दल आस्था, सद्भावना असणार्‍या लक्ष्मीनारायणसारख्या लोकप्रतिनिधींची वास्तविक या देशाला खरी गरज होती, परंतु आपल्या देशात कार्यक्षमता असलेल्या अशा लोकप्रतिनिधींना दुर्दैवाने घरी बसविले जाते.

सर्वाधिक पदव्या मिळविणार्‍या व महाराष्ट्र पोलीस दलात एक उच्चशिक्षित म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. सत्यपाल सिंह यांना मात्र नशिबाने जोरदार साथ दिली. माजी (दिवंगत) पंतप्रधान चरणसिंग चौधरी यांच्या उत्तर प्रदेशातील बागपत या बालेकिल्ल्याला सिंह यांनी 2014 साली खिंडार पाडले. डॉ. सत्यपाल सिंह यांनी नरेंद्र मोदी लाटेत चरणसिंग यांचा पुत्र व राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार (माजी केंद्रीय मंत्री) अजित सिंग यांचा पराभव केला आणि खासदार म्हणून 2014 साली ते प्रथमच निवडून आले. डॉ. सत्यपाल सिंह यांची सारी आयपीएस सेवा महाराष्ट्रात पार पडली. 2012 ते 2014 पर्यंत (जानेवारीपर्यंत) ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, परंतु निवृत्तीला एक वर्ष शिल्लक असताना (2014च्या एप्रिल महिन्यातील लोकसभा निवडणूक लक्षात ठेवून) त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा राजीनामा दिला व भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. सत्यपाल सिंह राजकारणात उतरणार, भाजपात प्रवेश करणार आहेत याची गुप्तचर यंत्रणांना पुसटशी कल्पना नव्हती. काँग्रेस राज्यकर्त्यांना हा प्रचंड धडा होता. अचानक राजकारणात उतरणार्‍या डॉ. सत्यपाल सिंह यांचे काय होणार याची त्यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांना उत्सुकता वाटत होती. चरणसिंग चौधरी परिवाराच्या गडाला भेदणे सोपे नव्हते, परंतु सिंह यांनी आपला जीव धोक्यात घालून अजित सिंह यांचा पराभव केला.  2014 साली राजकारणात नवखे असलेले मुंबईचे डॉ. सत्यपाल सिंह निवडून आले. निवडणुकीत उभ्या असलेल्या पोलीस अधिकार्‍यांचा मतदार सहसा विचार करीत नाहीत. पोलीस कितीही विचारवंत, निष्कलंक असला तरी त्याची सर्वसामान्यांमध्ये असलेली प्रतिमा त्याच्या मुळावर येते, परंतु डॉ. सत्यपाल सिंह हे त्यास अपवाद ठरले. त्यांनी 2014 साली निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत प्रचंड काम केले. रस्ते, पूल असो अथवा पाण्याचा प्रश्न असो त्यांनी  युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न केला. सात हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळेच त्यांनी याही लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. माजी पंतप्रधान चरणसिंग यांच्या जयंत चौधरी या नातवाचा पराभव केला. त्यामुळे केंद्रात निवडणुकीपूर्वी राज्यमंत्री असलेल्या डॉ. सत्यपाल सिंग यांचा कॅबिनेटसाठी विचार होईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आंध्र प्रदेशच्या वायएसआर काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढविणारा अनंतकुमार गोरंतला हा पोलीस निरीक्षकही वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्या लाटेत निवडून आला, परंतु महाराष्ट्र पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले ऍड. धनराज वंजारी, निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना अलीकडील महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत अपयश आले. अनुक्रमे वंचित बहुजन आघाडी व ‘आप’तर्फे निवडणूक लढविणार्‍या या विद्याविभूषित अधिकार्‍यांना मतदारांनी नाकारले. ऍड. धनराज वंजारी हेही सर्वाधिक पदव्या मिळविणारे हुशार अधिकारी व प्रभावी वक्ते आहेत. तेव्हा निवडून येण्यासाठी परिश्रमाप्रमाणे नशिबाचीही साथ हवी असते. उच्चशिक्षित असून चालत नाही. नशिबाने साथ दिली तर तळागाळातील सामान्य माणूसही पंतप्रधान, राष्ट्रपतीसारख्या उच्चपदी पोहोचू शकतो हे नरेंद्र मोदी, रामनाथ कोविंद यांनी दाखवून दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या