आभाळमाया : पृथ्वीचा शोध बोध!

वैश्विक 

[email protected]

दोन आठवडय़ांपूर्वी आपल्या ‘इस्रो’ या अवकाश संशोधन संस्थेने एकाच वेळी विविध बहुआयामी असे 31 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडून पुन्हा एकदा विक्रम केला. यातील अनेक अमेरिकेसारख्या प्रगत देशाचे आहेत. यावरून आता आपल्या अवकाश संशोधन संस्थेला किती जागतिक महत्त्व प्राप्त झालं आहे हे लक्षात येईल. जगातले अवघे सहा देश कृत्रिम उपग्रहांचं प्रक्षेपण करू शकतात. त्यामध्ये आपल्या इस्रोचं स्थान अव्वल करण्यात आपल्या संशोधकांचा मोलाचा वाटा आहे.

असं प्रक्षेपण करू शकत नसलेले देश ते करणाऱ्या देशांच्या मदतीने त्यांचे उपग्रह अवकाशात पाठवतात. पूर्वी आपणही रशियाच्या मदतीने आपला पहिला कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ 1975 मध्ये अंतराळात पाठवला होता. त्यानंतर रशियन यानातूनच आपले अंतराळवीर राकेश शर्मा अवकाशात फेरफटका मारून आले ते 1984 मध्ये. आता मात्र आपणही अंतराळात स्वतःच्या यानातून माणूस पाठविण्याइतकी प्रगती केली आहे. त्याचं प्रत्यंतर नजीकच्या भविष्यकाळात येईलच.

अनेक देशांच्या अनेक कृत्रिम उपग्रहांनी खरं तर सध्या स्पेसमध्ये दाटी केली आहे. ही गर्दी वाढत गेली तर उपग्रहांची आदळआपट होऊन अपघाताचा आणि त्यांचे अवशेष पृथ्वीवर पडण्याचा धोकाही संभवतो, परंतु संभाव्य धोक्याच्या धास्तीपायी संशोधन थांबवता येत नाही. ते अव्याहत सुरूच राहणार. मात्र त्यासाठी आवश्यक ती सुरक्षेची काळजी घेणं अधिकाधिक अनिवार्य होणार आहे.

अशी काळजी घेऊन विविक्षित कक्षेत पृथ्वीभोवती फेर धरणारे उपग्रह अप्रतिम कामगिरी बजावतात. त्यातील बऱ्याच उपग्रहांचा उपयोग टी.व्ही. प्रक्षेपण, संदेशवहन यासाठी होतो. त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि भूगर्भीय हालचालींचा आणि वातावरणाचा वेध घेण्याचं कामही काही उपग्रह करतात. भूगर्भात पाण्याचा, तेलाचा साठा कुठे, किती आहे तेसुद्धा या उपग्रहांना रिमोट सेन्सिंग म्हणजे दूरसंवेदनाशक्तीने समजतं. त्यातून काही आश्चर्यकारक गोष्टीही आकस्मिकपणे समोर येतात.

‘ग्रॅव्हिटी फिल्ड ऍण्ड स्टेडी स्टेट ओशन सर्क्युलेशन एक्स्प्लोरर’ अशा लांबलचक नावाच्या आणि थोडक्यात ‘गोके’ असं म्हटल्या जाणाऱ्या एक युरोपीय कृत्रिम उपग्रहाने पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाचं म्हणजे अंटार्क्टिका खंडाचे अंतरंग उघडून दाखविण्यास सुरुवात केली आहे.

सुमारे पन्नास कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरचे भूखंड आता आपण पाहतो तशी नव्हते. जवळपास सगळाच भूभाग, पॅन्जिया आणि गोंडवन, रॉडिनिया अशा महाभूखंडांमध्ये एकवटलेला होता. एक अब्ज वर्षांपूर्वी हे महाखंड तयार होऊन पृथ्वीचा भूभाग अस्तित्वात आला. ते रॉडिनिया खंड त्यानंतर कोटय़वधी वर्षांनी म्हणजे अवघ्या पन्नास कोटी वर्षांपूर्वी आपला हिंदुस्थानी उपखंड ज्यातून निर्माण झाला त्या गोंडवन खंडाची निर्मिती झाली. या दोन खंडांचे नंतर एकत्रीकरण झाले. भूगर्भातील या घडामोडींमध्ये काही घडले आणि काही मोडलेसुद्धा!

जे घडले त्यातून हिंदुस्थानी उपखंड वर सरकत सरकत उत्तरेकडील युरेशियाच्या भूभागाला इतक्या वेगाने धडकला की, तेथील सागरतळ वर उचलला जाऊन हिमालय जन्माला आला तो 16 कोटी वर्षांपूर्वी. त्यामुळे हिमालय पर्वत आपल्या सह्याद्रीपेक्षा खूपच तरुण आहे आणि त्यात कित्येक हजार फुटांवर सागरी जीवांचे जीवाष्म (फॉसिल) सापडतात.

या साऱ्या ‘प्लेट टॅक्टोनिक’ किंवा पृथ्वीच्या गाभ्यातील द्रवरूप मॅन्टलवर (लोहरसावर) तरंगणाऱ्या ‘प्लेट टॅक्टॉनिक’ म्हणजे जाड खडकांच्या प्लेटस्. तर त्या केव्हातरी डळमळल्या तर आपल्याला भूकंप जाणवतो. आपण विज्ञानाच्या आधारे केवळ पृथ्वीचाच नव्हे तर संपूर्ण विश्वाचाच धांडोळा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरीसुद्धा आपल्या पृथ्वीचीच रचना किंवा त्यावरील जीवसृष्टीची यथार्थ कल्पना आपल्याला आलेली नाही असे एका प्रसिद्ध युरोपीय खगोल अभ्यासकाने आम्हाला सांगितल्याचं आठवतं ते खरंच आहे. म्हणूनच अवकाशातून उपग्रहांच्या तीक्ष्ण नजरेद्वारे पृथ्वीचे अंतरंग शोधण्याची मोहीम सुरू असते.

रिमोट सेन्सिंग विमानांची नजर अंटार्क्टिकाच्या भूपृष्ठाखाली सुमारे दीड किलोमीटरपर्यंत पाहू शकते, परंतु त्याखाली काय दडलंय ते या गोके उपग्रहाने शोधून काढलं आणि त्यातून पृथ्वीवरच्या आदिम भूखंडाच्या घुसळणीनंतर जे शिल्लक राहिलं ते अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली दडण्याचं शोधून काढलं. असं हे संशोधन जसजसं प्रगत होईल तसतसा आपल्याच ग्रहाचा शोध आणि बोध आपल्याला घेता येईल. हे सारं विस्मयकारी आहे, पण चमत्कारी नव्हे. ते सत्य आहे. विज्ञान आपल्याला उद्याचं विश्व ‘याचि डोळा’ दाखवणार आहे. मात्र त्याचा विधायक उपयोग व्हायला हवा इतकेच.