जॅक मा


>> सुजित पाटकर

जॅक मा यांचा उद्योगसमूह ‘अलिबाबा’ नावाने प्रसिद्ध आहे, पण हा उद्योग चोरांचा नव्हे तर प्रामाणिकपणाचा ‘ब्रॅण्ड’ आहे. जॅक मा यांनी अलिबाबाचे नेतृत्व केले, कंपनी शिखरावर नेली, पण वयाच्या 54 व्या वर्षी जॅक मा यांनी निवृत्ती पत्करली आहे. यश, पैसा, कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावर असताना ते खाली उतरले. आपण चीनचा तिरस्कार करतो, पण जॅक मा हे जगातील नव्या पिढीने व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तेजन देणारे आणि मार्गदर्शन करणारे रोल मॉडेल आहेत.

जॅक मा हे जगातील एक श्रीमंत उद्योगपती आहेत. चीन ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. चीनमध्ये श्रीमंतीचा बाजार मांडणे गुन्हा आहे. पण ‘चीन’च्या जॅक मा यांनी दुनिया खऱया अर्थाने मुठीत घेतली. जगप्रसिद्ध ‘अलिबाबा’ कंपनी त्यांनी स्थापन केली. ती शिखरावर नेली, पण वयाच्या 54 व्या वर्षी जॅक मा यांनी निवृत्ती पत्करली आहे. यश, पैसा, कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावर असताना जॅक खाली उतरले. निवृत्त कधी होणार हे विचारण्याआधीच निवृत्त व्हावं. अरे, निवृत्त का झालात? असे लोकांनी विचारावे. जॅक माच्या बाबतीत तेच घडले आहे. जॅक मा हे यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांचा उद्योगसमूह 420 अब्ज डॉलर्सची उलाढाल करत आहे. 86 हजार कर्मचाऱयांचे जॅक मा अन्नदाता आहेत.

निवृत्त होताना जॅक हसत हसत म्हणाले, “मला पुनर्जन्म मिळाला तर मी व्यवसाय कधीच करणार नाही. व्यावसायिकाचे आयुष्य हे माझे नव्हते. मी त्यात ओढला गेलो.’’ जॅक माचे तत्त्वज्ञान जगातील किती उद्योगपती मान्य करतील हा प्रश्नच आहे. जॅक म्हणतो A real entrepreneur not only knows how to make money, but how to spend money. पैसे कसे कमवायचे त्यापेक्षा पैसे कसे खर्च करायचे हे ज्याला समजले तो खरा उद्योगपती. फक्त पैशासाठी जगू नका व पैसा कमावण्यासाठीच काम करू नका असे जॅकसारखा उद्योगपती सांगतो तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका. त्यांचे स्पष्टीकरण तितकेच सरळसोट आहे. माणसाला जगण्यासाठी किती पैसे हवेत? जेव्हा तुमच्याकडे एक मिलियन डॉलर्स असतात तेव्हा ते तुमचे पैसे आहेत. जेव्हा त्याचे 10 मिलियन होतात तेथे problems सुरू होतात. 100 मिलियन डॉलर्स होतील तेव्हा ते तुमचे पैसे नाहीत हे लक्षात घ्या. Thats the trust the society gives to you. That they believe you can spent the money better इतके पैसे तुमच्याकडे येणे हा लोकांनी तुमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. खरा उद्योगपती लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी पैसे कमावतो व खर्च करतो.

जॅक मा यांनी दहा वेळा हार्वर्ड इन्टिटय़ूटमध्ये शिकण्यासाठी अर्ज केला आणि तो दहाही वेळा नाकारला गेला. त्याने केएफसीमध्येसुद्धा नोकरीसाठी अर्ज केला. चोवीस पैकी तेवीस लोकांना नोकरी मिळाली, परंतु मा यांना नाकारले गेले.

शेवटी त्यांनी ते ज्या इन्स्टिटय़ूटमधून शिकले तिथेच इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. त्याच दरम्यान दुभाषी म्हणून पहिल्यांदा अमेरिकेत गेले असताना त्यांना इंटरनेटबद्दल समजले. त्याबद्दल अभ्यास करत असताना त्यांना चीनमध्ये इंटरनेटसंबंधीच्या कोणत्याच गोष्टी आढळल्या नाहीत. हीच त्यांना उत्तम व्यवसायासाठीची एक संधी वाटली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं. शिक्षकी पेशातील आयुष्याचा त्यांनी मनापासून आनंद लुटला. ‘माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी क्षण हा एक गरीब शिक्षक म्हणून दर महिन्याला 91 यान(चिनी चलन) कमावणं हा आहे’ असं ते अभिमानाने सांगतात.
मा यांना कुत्र्यांचीसुद्धा आवड आहे. त्यांच्याकडे अपोलो नावाचा एक गोंडस पाळीव कुत्रासुद्धा आहे. मा यांना भविष्यात चित्रपट बनवायला सुद्धा आवडतील. त्यांच्या मते त्यांना हॉलीवूडने फार प्रेरणा दिली. हॉलीवूडचे हीरो हे नेहमीच अपयशापासून सुरुवात करून यशाकडे मार्गक्रमण करतात; परंतु चायनीज हीरोज मात्र नेहमी अपयशाकडे मार्गक्रमण करताना दाखवले जातात म्हणून मा गंमतीत म्हणतात की, ‘चिनी लोक हे हीरो बनण्याची स्वप्ने बघत नाहीत.’

‘मी व्यवहाराचं शिक्षण कधीच घेतलं नाही. मी कधीच अकाऊंटंट किंवा प्रोग्रामर नव्हतो. मी एकच काम करत आलो शिकायचं आणि ते शिकवायचं.एक उद्योजक म्हणूनही मी हे शिक्षकाचंच काम करत आलो आहे,’ असा उद्योगासाठीचा नवा दृष्टिकोन मा नव्या पिढीला देत आहेत.

जी कंपनी नेहमीच सरकारकडून पैसे कसे कमावता येतील याचा विचार करते ती कधीच यशस्वी कंपनी असू शकत नाही. मा यांनी आपलं सरकारबरोबरचं नातं ‘लव्ह गव्हरमेंट बट डोंट मॅरी गव्हर्मेंट’ म्हणजेच प्रेम करा पण लग्न करू नका या पद्धतीचं ठेवलं आहे. ‘जो मनुष्य एखादं अपयश पदरात आल्यावर त्या अपयशाचं खापर दुसऱयांवर फोडतो तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला एक माणूस म्हणून आणि एक उद्योगपती म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर फक्त पैसे कमावण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी एकनिष्ठ राहायला हवं’, असं मा आपल्या अनुभवातून सांगतात. ‘आम्ही तीन गोष्टींमुळे टिकाव धरू शकलो. एकतर आमच्याकडे पैसा नव्हता, आमच्याकडे तंत्रज्ञान नव्हते आणि आमच्याकडे कोणताही आराखडा तयार नव्हता. त्यामुळे आम्ही प्रत्येक डॉलर हा अत्यंत काळजीपूर्वक वापरला’, ‘असा मंत्र’ही जॅक मा देतात.

आपला वर्षभरानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय त्यांच्या कर्मचाऱयांना आणि गुंतवणूकदारांना जॅक मा यांनी एका पत्रातून कळविला आहे. निवृत्त झाल्यानंतर मी काही न करता बसणं अशक्य आहे. माझी आणखीही बरीच स्वप्ने आहेत जी आता मला पूर्ण करायची आहेत असे ते म्हणतात. त्यांच्या लाडक्या शैक्षणिक क्षेत्राकडे त्यांना पुन्हा वळायचे आहे. जिद्द आणि चिकाटीवर मा यांनी नेहमीच भर दिला आहे. ते तरुणांना सांगतात की, आज समोरील स्थिती भलेही खूप कठीण असेल, उद्या कदाचित आणखी कठीण असेल, पण परवा नक्कीच यशाचा सूर्य उगवेल. तुम्ही उद्या हार मानलीत तर परवाचा सूर्य तुम्हाला दिसणार नाही, अशा फार मोजक्या शब्दांत जॅक मा यशाचं गमक सांगतात.

जॅक मा यांचा उद्योगसमूह ‘अलिबाबा’ नावाने प्रसिद्ध आहे, पण हा उद्योग चोरांचा नव्हता तर प्रामाणिकपणाचा ‘ब्रॅण्ड’ आहे. जॅक मा यांनी अलिबाबाचे नेतृत्व केले. ‘अलिबाबा आणि चाळीस चोरां’ची गोष्ट आम्हाला माहीत आहे. जॅक माच्या अलिबाबाने जगाला प्रेरणा दिली. आपण चीनचा तिरस्कार करतो, पण जॅक मा हा जगातील तरुणांचे हिरो आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तेजन देणारे आणि मार्गदर्शन करणारे मा हे नव्या पिढीचे रोल मॉडेल आहेत.

[email protected]
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आहेत.)