लेख : ठसा : कादर खान

2

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी अखेर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. केवळ उत्तम अभिनेताच नव्हे तर तेवढय़ाच ताकदीचे लेखक, पटकथाकार, विनोदी अभिनय आणि उत्तम माणूस अशीही त्यांची ओळख होती. कदाचित जन्मापासून त्यांना जो दाहक जीवनसंघर्ष अनुभवावा लागला त्यामुळे असेल, पण 300 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये काम करूनही चित्रपटसृष्टीत त्यांची प्रतिमा ‘उत्तम माणूस’ अशीच राहिली. त्यांच्या विनोदी अभिनयातही अनेकदा त्यांच्या खडतर आयुष्याची झलक जाणवत असे.

विनोदी अभिनय करताना कोणताही अंगविक्षेप किंवा अचकट-विचकट तऱ्हा त्यांना कराव्या लागल्या नाहीत. फक्त संवादफेक आणि देहबोली यातून ते पडद्यावरील श्रेष्ठ विनोदनिर्मिती करीत असत. त्याबाबतीत त्यांचा हात त्यांच्या काळात कुणीही धरला नाही. त्यामुळेच त्यांच्या वाटय़ाला आलेले अनेक चित्रपटांमधील विनोदी पात्रदेखील मुख्य भूमिकांच्या बरोबरीने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. जवळजवळ पाच दशकांचा त्यांचा चित्रपट प्रवास राहिला. या प्रवासात त्यांनी अनेक छोटय़ामोठ्या भूमिका केल्या. त्यात विनोदी जास्त असल्या तरी सर्व प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या. खलनायकदेखील रंगवले. चरित्र अभिनेतेदेखील बनले. त्यांनी तसे कलाकारांच्या अनेक पिढय़ांबरोबर काम केले पण त्यांची जास्त जोडी जमली ती अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्यासोबत. या त्रिकुटाचा एक वेगळाच ठसा हिंदी रुपेरी पडद्यावर खूप काळ पडला.

गोविंदा आणि कादर खान ही जोडी ‘विनोदी’ म्हणून गाजली तर अभिताभसोबत कादर खान यांनी नायकाचा भाऊ, मित्र, वडील तर कधी शत्रू या स्वरूपातील भूमिका केल्या. अफगाणिस्तानात जन्मलेले कादर खान यांना गरिबी आणि परिस्थितीने मुंबईत आणले. मुंबईतील कामाठीपुरासारख्या वस्तीत लहानपण घालविलेल्या कादरखान यांच्यावर आई-वडिलांचा तलाक, सावत्र बापाचा त्रास, वयाच्या पाचव्या वर्षांपासून बालमजुरी याचा कटू अनुभव घेण्याची वेळ आली. आईने सांभाळलेली जबाबदारी आणि दिलेले प्रोत्साहन यामुळे नंतर कादरखान यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले तरी दारिद्रय़ाचे चटके आणि हालअपेष्टांनी सोसलेले घाव यांनीच बहुधा कादर खान यांच्यातील लेखक आणि अभिनेता घडवला. हेच जीवनानुभव नंतर त्यांच्या अनेक  तुफान लोकप्रिय झालेल्या चित्रपट संवादांमध्ये दिसून येतात. योगायोगाने एक दिवस त्यांच्यासाठी बॉलीवूडचे दार उघडले गेले. आणि नंतर सर्व अडचणी, हालअपेष्टांना भिरकावून देत कादरखान नावाचा अष्टपैलू अभिनेता, भारदस्त संवाद लेखक, पटकथा लेखक पाच-सहा दशके न थांबता चालतच राहिला. विजय दीनानाथ चौहान, कालिया, परवरिश, मिस्टर नटवरलाल, सुहाग, सत्ते पे सत्ता, नसीब, मुकद्दर का सिकंदर, हम, शहेनशहा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे संवादलेखन कादरखान यांचेच होते. त्याशिवाय मनमोहन देसाई-कादरखान जोडीने लिहिलेले अमर अकबर अँथोनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस आदी चित्रपटही प्रचंड गाजले.

गोविंदाच्याही अनेक गाजलेल्या चित्रपटांत कादरखान यांनी काम केले. अमिताभ-कादरखान आणि गोविंदा-कादरखान ही बॉलीवूडमध्ये ‘सुपरहिट’ जोडी म्हटले जाते. 1973 मध्ये ‘दाग’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी पडद्यावर प्रवेश केला आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या संवादांना जशी स्वतःच्या दाहक आयुष्याची किनार होती तशी अभिनयातदेखील होती. विनोदाचं अचूक टायमिंग, हुकमी संवादफेक ही कादरखान यांची बलस्थानं होती. 250 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लिहिले. त्यांचे संवाद तुलनेने साधे, सोपे, सरळ होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘रोटी’ चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी मनमोहन देसाई यांनी त्यांना त्यावेळी सवालाख रुपये मानधन दिले होते. चित्रपटाच्या यशात आणि अभिनेत्यांना मिळणाऱ्या लोकप्रियतेत चित्रपटातील संवादांचा, कथेचा म्हणजेच पर्यायाने संवाद आणि पटकथा लेखक यांचा वाटा मोठा असतो, असे स्पष्ट मत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविले. अनेकदा द्वय़र्थी आणि अश्लीलतेकडे झुकणाऱ्या संवादांवरून कादरखान यांना टीकेलाही तोंड द्यावे लागले. मात्र त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत कमी आली नाही. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेला ताकदीचा विनोदी अभिनेता आणि एक भारदस्त संवादलेखक म्हणून कादरखान यांचे नाव हिंदी सिनेमाच्या इतिहासात कायमचे कोरलेले राहील.