लोटा इज लोटा!

>>शिरीष कणेकर

परवा मी कित्येक वर्षांनंतर एक ऑर्केस्ट्रा पाहिला. म्हणजे ऐकला. खरं म्हणजे पाहिला म्हणणंच जास्त बरोबर आहे. हे ऑर्केस्ट्रे ऐकण्यापेक्षा पाहण्यासारखेच जास्त असतात. दिमाखदार नेपथ्य, रंगीबेरंगी दिव्यांची उघडझाप, कानठळय़ा बसवणारे संगीत, वादकांचे भपकेबाज कपडे, निवेदकांच्या शाब्दिक कसरती, गायक-गायिकांच्या अदा या सगळय़ात तुम्हीच सांगा, ऐकण्यासारखं जास्त आहे की पाहण्यासारखं?

गाणारे बिचारे मनापासून गात असतात. आपण डिट्टो मूळ गायकांबरहुकूम गातोय असा स्वतःचा भ्रम करून घेतात. मला सांगा, प्रत्येक ऑर्केस्ट्रात असे रफी आणि किशोर कुमार भेटायला लागले तर काय पाहिजे? ते खरंच तेवढे चांगले असते तर मूळ गायकांना व गायिकांना ‘खो’ देऊन त्यांची जागा घेतली असती.

मी गेलो होतो त्या ऑर्केस्ट्रात एक जोडगोळी लता आणि रफी यांचं जुनं गाजलेलं द्वंद्वगीत म्हणत होती. त्यातला पुरुष गायक ठीकठाक गात होता. रफीला लपवावं व त्याला काढावं असं म्हणण्याइतक्या थराला मी जाणार नाही, पण तो कुठे खटकतही नव्हता. भातात खडा येत नव्हता हे कर्तृत्व कमी नाही असा माझ्या मनाने कौल दिला. प्रॉब्लेम होता बरोबरच्या बाईच्या आवाजाचा, तिच्या गायकीचा. ती लताच्या आसपासही येत नव्हती. आवाजाला फिरक नव्हती, तो चढत नव्हता व लताचा उपजत गोडवा तर नव्हताच. एकटा रफीचा ‘डमी’ काय करणार? गाण्याचा विचका झाला.

अन् एकाएकी मला साक्षात्कार झाला. तसं पूर्वीही माझ्या लक्षात आलं होतं, पण या खेपेला माझे जणू डोळे – आय मीन, कान – उघडले. वेळ निभावून नेण्याइतके प्रति रफी, प्रति किशोरकुमार, प्रति हेमंत कुमार, प्रति मन्ना डे, प्रति तलत महमूद मिळतात; पण कामचलाऊ म्हणून खपून जाईल अशी लता मंगेशकर कंदील घेऊन शोधली तरी सापडणार नाही. ज्या कोणी लताची गाणी म्हणतात त्या कुठल्याही क्षणी लता वाटत नाहीत (नुसत्या नखऱयांनी संजीवनी भेलांडे लता वाटत असती तर प्रीतिबाला मधुबाला झाला असती व साजीद खान दिलीप कुमार झाला असता.). लता अक्षरशः एकमेवाद्वितीय आहे हेच यातून स्पष्ट होते. ‘रफी म्हणजे पुरुषातली लता मंगेशकर’ असे बोलताना आपण बोलून जातो. रफीला काही काळ किशोरनं बाजूला सारलं होतं (त्याला इतकं रिकामपण आलं होतं की, तो ‘हजयात्रा’ वगैरे करून आला.). लताला बाजूला सारणारा आवाज जन्माला आलेला नाही हे आधी समजून घ्या; मग बोला.

खुद्द सी. रामचंद्र मला एकदा म्हणाले होते, ‘‘लता मंगेशकरसारखं गाणं म्हणजेच चांगलं गाणं असा एक समज सार्वत्रिक पसरलाय. ‘ऐ मेरे वतन के लोगों’ प्रमिला दातार तेवढंच चांगलं गाते व मीदेखील तेवढंच चांगलं गातो.’’
आँ? माझी वाचाच बसली, पण हे त्यांचं खरं मत होतं की नाही मला शंका आहे. एवढी सगळी गाणी लताला देण्यापेक्षा अण्णा रामचंद्रनी ती सुधा मल्होत्रापासून पुष्पा पागधरेंपर्यंत व मीना कपूरपासून कृष्णा कल्लेपर्यंत खिरापतीसारखी सम प्रमाणात का वाटली नाहीत?
संगीतात एम. ए. केलेला एक गृहस्थ लता व आशावर एक भलामोठा ‘थिसिस’ घेऊन अण्णांना भेटायला गेला.
‘‘ते वाचतो मी सवडीनं’’ अण्णा म्हणाले, ‘‘आधी मला सांगा, तुमचा निष्कर्ष काय आहे?’’
‘‘माझा निष्कर्ष हा आहे’’ तो गृहस्थ आढय़तेनं म्हणाला, ‘‘आशा ही एनी डे लतापेक्षा सरस व श्रेष्ठ गायिका आहे.’’
‘‘चालते व्हा’’ अण्णा गरजले. ‘‘तुम्हाला काडीची अक्कल नाही. तुम्हाला संगीतातलं ‘ओ’ की ‘ठो’ कळत नाही. उचला ते बाड आणि निघा.
हे अण्णांचं संतापातून बाहेर पडलेलं खरं मत होतं. आमच्या मृणाल मावशीनं मला बोटाला धरून हिरेमाणकांनी भरलेल्या लता नावाच्या गुहेत नेलं. खडखडाटात ऐकावं लागणारा ‘रेडिओ सिलोन’ सोडून चित्रपट-संगीत ऐकण्याचा दुसरा मार्ग नसताना मृणाल मावशीनं एवढी गाणी कुठून ऐकली असतील? ‘जाओ चमका सुबह का सितारा’ (‘हैद्राबाद की नाजनीन’ – वसंत देसाई), ‘सुनाऊ हाले दिल’ (‘मदमस्त’ – व्ही. बलसारा), ‘मुझे दर्द तुने ये क्या दिया’ (‘सलोनी’ – वसंत प्रकाश) ही लताची अप्रतिम, पण अप्रसिद्ध गाणी तिला तोंडपाठ कशी काय होती? (मीच मृणाल मावशीला लताला ‘इंट्रोडय़ूस’ केलं असं आज मी खुशाल सांगतो.).

लता माझ्याकडे आली तेव्हा मी पलाशरंजन भौमिक हा फोटोग्राफर बोलावून ठेवला होता. मी लताला म्हणालो, ‘‘घरगुती स्वरूपातील तुमच्या भेटीच्या वेळी फोटोग्राफर आणणे उचित नाही हे मला कळते, परंतु हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. फोटोच्या रूपानं ती आठवण आम्ही कायम जतन करणार. आल्यागेल्यांना हिऱयाचा हार दाखवावा त्याप्रमाणे फोटोंचा अल्बम दाखवणार.’’
लता समंजसपणे हसली.
पलाशरंजन पुढे सरसावला व म्हणाला, ‘‘दीदी, माझं नाव कोणी ठेवलं असेल ओळख पाहू.’’
मी घाबरून लताकडे पाठ करून उभा राहिलो. मग माझ्या मनात आलं की, लताला असे नमुने नेहमीच भेटत असणार. तिनं किंवा मी घाबरावं कशाला?
‘‘नॉट माय मदर.’’ पलाश त्याचं नामकरण रहस्य उलगडत म्हणाला, ‘‘नॉट माय आँटी, नॉट माय अंकल, नॉट माय ग्रॅण्ड पॅरेंटस् – इट वॉज माय फादर!’’
आता मी बाल्कनीतून उडी मारावी का? हा विचार करीत होतो.
‘‘दीदी, तुम्हाला आठवतंय का, माझं नाव असलेलं बंगाली गाणं तुम्ही गायला होतात… ‘‘पलाशs पलाशss…’’ आता पलाश रेडय़ासारखा रेकायला लागला होता. लता करण दिवाणसारख्यांबरोबर द्वंद्वगीत कशी गायली असेल हे कोडं मला उलगडलं.
लता गेल्यावर बंगालीत भारावलेला पलाश मला म्हणाला, ‘‘लोटा इज लोटा!’’
मी तत्काळ सहमत झालो. लता म्हणजे लता. लोटा इज लोटा. शिवाय पलाशचं नाव कोणी ठेवलं हेही तिला आता कळलं होतं.

[email protected]