लेख : कंटाळा… टाळा!

62

>>दिलीप जोशी<<

[email protected]

खूप काम पडलंय. पण काही करावंसंच वाटत नाही. प्रचंड कंटाळा आलाय’ मित्र फोनवरून सांगत होता. ‘कसं चाललंय?’ या प्रश्नाला त्याचं उत्तर होतं ‘प्रचंड कंटाळा!’ ‘कंटाळा आला की तू काय करतोस?’ त्याने उलट प्रश्न केला. खरं तर मला ‘प्रचंड’ म्हणावा असा कंटाळा येतच नाही. अनेक आजारांशी टक्कर देताना आणि वाढत्या वयाचा हिशेब करताना ‘हायकिंग-ट्रेकिंग’ पूर्वीसारखं करता येत नाही याचंच वाईट वाटतं. मध्यंतरी दीड-दोन वर्षं घसाच बसला. लिहिण्या-वाचण्या-बोलण्याच्या चिंतन ‘उद्योगा’त ‘आवाजी’ बंद होणं हे त्रासदायक होतं. पण तो काळ पुस्तकं वाचण्यात घालवला. मित्राला हे सांगितल्यावर तो म्हणाला ‘ग्रेट आहेस.’ वास्तविक या स्तुतीने खूश व्हायला हरकत नव्हती, पण तसं वाटलं नाही. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत न कंटाळता, न कुरकुरता काम करणारी अनेक माणसं पाहात आलोय.

अर्थात कंटाळा केवळ काहीतरी बिनसलंय म्हणून येतो असं नाही. तेच तेच काम करूनही कंटाळा येतो. एखाद्या गोष्टीची चाकोरी झाली की ती गोष्ट कितीही आवडीची असली तरी कंटाण येतोच. काही काळ तरी वेगळा विचार, वेगळं वातावरण हवंसं वाटतं. चार दिवस असे गेले की, आपली नोकरी, उद्योग करण्याचा उत्साह पुन्हा परततो. कुणीतरी म्हटलंय की, ‘खूप काम असतं तेव्हाच कंटाळा करण्यात मजा. कारण उत्साहाच्या वेळी तो नसतोच.’ हे खरं असलं तरी ‘परवडणारं’ नसतं. ठरलेली कामं वेळच्या वेळी करावीच लागतात. ती केली नाहीत आणि त्यांचा ढीग साठला की त्या कल्पनेनेच ‘कंटाळा’ वाढू लागतो.

खूप यशस्वी माणसांना कंटाळाच येत नसेल का? पण ‘सक्सेस इज ऑल्सो बोअरिंग’ असंही म्हणतात. सारं छानच चाललेलं असतं. तरी क्षणभर थबकावंसं वाटतं. मला माणसं नेहमीचं ‘जग’ सोडून बहुदा निसर्गाकडे वळतात. विराट निसर्गाचे चमत्कार दाखवणारा प्रवास हवाहवासा वाटतो. सध्या ‘कंटाळा’ घालवण्यासाठी चांगले दिवस आहेत. त्यासाठी खूप खर्च करून परदेशवारीच करायला पाहिजे असं अजिबात नाही. थोडा प्रवास करून आसपासची निसर्गलीला चालत-फिरत न्याहाळता येते. नाहीतरी धकाधकीच्या जीवनात आपल्याला, आपल्याच माणसांशी निवांतपणे बोलायला मिळत नाही, मग निसर्गाशी संवाद तर दूरची गोष्ट.

अलीकडच्या काळात ‘कंटाळा’ येण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रदूषण आणि ताणतणाव. जगातल्या बहुतेक महानगरांना हवा-पाण्याच्या प्रदूषणाने ग्रासलंय. स्वछ शुद्ध हवेतला प्राणवायू भरभरून देणारा दीर्घ श्वासच दुर्मिळ झालाय. ऊबदार सूर्यप्रकाश उपलब्ध असूनही आपण त्यापासून स्वतःला अनेकदा वंचित ठेवतो. घरातून लगबगीने निघायचं, गडबडीत ‘प्रवास’ करायचा आणि ऑफिसमध्ये ‘एसी’त विसावायचं. उगवता आणि मावळता सूर्य पाहण्याची ‘श्रीमंती’ आपण हरवून बसलो आहोत. ही शहरी भागातली गोष्ट. ग्रामीण भागातले ताण-तणाव वेगळेच आहेत. तिथे निसर्ग अनेकदा ‘रौद्र’ रूप दाखवतो… दुष्काळ किंवा अवकाळी पाऊस, गारपीट या तिथल्या ताण-तणावाच्या गोष्टी. थोडक्यात काय समस्या सार्वत्रिक आणि अनंत आहेत. त्यांची रूपं निराळी इतकंच. या अडचणींवर मात करण्याची उमेद आतूनच आणावी लागते. निरुत्साही वाटावं असं आसपास बरंच काही घडत असताना ‘आत्मबल’ वाढवत राहाणं हाच एक मार्ग असतो… आणि साध्या सोप्या गोष्टींतून जीवनानंद शोधता येतो.

एका परिचित जोडप्याने प्रापंचिक समस्यांनी थकून न जाता, गरजूंसाठी जुने पण चांगले कपडे गोळा करणाऱ्या संस्थेला मदत करायचं ठरवलं. गेल्या वेळी त्यांना इतका प्रतिसाद मिळाला की, ट्रकभर कपडे त्यांनी त्या संस्थेकडे पाठवले. त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या नजरेत समाधान होतं. ‘रोजच्या कटकटी आहेतच पण असं चांगलं काम हातून घडलं की सारी निराशा, कंटाळा निघून जातो’ हे त्यांचं स्वानुभवावर आधारित मनोगत.

कंटाळय़ाचं रूपांतर निराशेत होऊ नये म्हणून ‘चेंज इन वर्क इज रिक्रिएशन’ म्हणजे नेहमीच्या पठडीतल्या कामापेक्षा काही वेगळं काम करणं यातच आनंद मिळतो. मग प्रश्न असा पडतो की, ‘वेगळं काम कोणतं?’ मुळात असा प्रश्न पडायला हवा. तो मनात आला की आपणच ‘आत्मशोध’ घेऊ लागतो. एका चित्रकार मित्राला घरच्या आग्रहामुळे चांगली नोकरी देणारं शिक्षण घ्यावं लागलं. हुशारीमुळे त्यातही प्रावीण्य मिळालं. पण कंटाळा येऊ लागला. नोकरी सोडणं तर शक्य नव्हतं. आपली आवडती चित्रकला त्याने स्वतःवरच ‘चिडून’ बाजूला ठेवली होती हे समजल्यावर त्याला पुन्हा चित्रकलेकडे वळवण्यात यश आलं आणि तब्बल चोवीस वर्षांनी होती पेन्सिल घेऊन त्याने एका विख्यात वैज्ञानिकांचं चित्र चितारलं. ते त्यांना देण्याचाही योग आला आणि याला भरून पावल्यासारखं वाटलं.

आपण योगायोगाने जशी मार्गक्रमणा करीत असतो त्यापेक्षा वेगळय़ा वाटाही असतात. स्वतःचा शोध घेण्याची सवय लावून घेतली की त्या सापडतात. विचार बंद करून स्वतः ‘गुंतवून’ ठेवण्यासाठी एकाने गॅझेटमधल्या खेळांचा आधार घेतला. मग त्याचाही कंटाळा आला आणि आता काय? या प्रश्नाचं उत्तर शोधताना गाण्याची लकेर कंठातून फुटली. अगदी सहज… बरा आहे की आपला आवाज असा ‘साक्षात्कार’ झाल्यावर कधीकाळी थांबलेलं गाणं ‘क्लास’ लावून चौसष्टाव्या वर्षी सुरू केलं! ही सारी साधी माणसं. त्या चित्रकाराची काही प्रदर्शनं भरतील असं नाही आणि तो दुसरा गायक काही मैफली गाजवणार नाही हे त्यांनाही माहितेय, पण आपल्याच गुणांचा ‘शोध’ लागल्याने त्यांचा कंटाळा गेलाय. त्याचा फायदा भोवतीच्या लेकांनाही होतोय. ‘आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपु’ म्हणजे आळस हा शरीरात (मनात) भिनलेला मोठा शत्रू आहे असं एक सुभाषित सांगतं. त्याच मनातील ऊर्जेने या ‘रिपू’ला घालवताही येतं!

आपली प्रतिक्रिया द्या