रंगात माखलेला लीओथ्रिक्स

>> विद्या कुलकर्णी

ता ना पि हि नि पा जा लाल, पिवळा, भगवा, हिरवा… सप्तरंगांची उधळण करीत हा चिमुकला पक्षी नैनितालमध्ये बागडत असतो.

नैनितालमधील पक्षी उत्सवाच्या निमित्ताने हिमालयामध्ये माझे बरेच वास्तव्य झाले. दररोज सकाळीच कॅमेरा घेऊन मी व माझ्या मैत्रिणी बाहेर पडायचो. छोटया व रंगीबेरंगी पक्ष्यांची इतकी वर्णने ऐकली होती की त्यांना कॅमेरामध्ये कैद करण्याची खूप उत्सुकता होती. जंगलातील शांततेत फिरत असताना दुरून बारीकशी पण अतिशय मंजुळ शीळ ऐकू आली, कॅमेरामध्ये मात्र मनमोहक पण फारच छोटी छबी दिसत होती. इतक्या सुंदर पक्ष्याचे फोटो कसे बरे काढावेत अशा संभ्रमात आम्ही पडलो होतो, तेवढय़ात आम्हाला गाईडने ‘छोटय़ा हाईड’कडे नेले. पक्ष्यांसाठी पूरक अशी वातावरण निर्मिती केलेली ही जागा होती. इथे मात्र या लाल चोचीच्या लीओथ्रिक्स पक्ष्याचे मनसोक्त फोटो मला काढता आले व सहजच ओठावर शब्द आले.

रंगबिरंगी रूप गोजिरे इवले सुंदर
रुंजी घाली शीळ मनात मंजुळ सुमधुर या पक्ष्याला इतकी मागणी आहे की, जगात सर्वत्र ह्या पक्ष्याचे अस्तित्व आहे. रेड-बिल्ड लीओथ्रिक्स या पक्ष्याची लांबी 15 सें.मी. आहे. या पक्ष्याचे रूप वर्णनातीत आहे. त्याला प्रत्यक्षच बघायला हवे. तो पिवळट हिरव्या रंगाचा पक्षी आहे. गळा पिवळ्या रंगाचा असून छातीवर नारिंगी रंगाच्या छटा आहेत. डोळ्याच्या सभोवतीही फिकट पिवळ्या रंगाची वर्तुळे असून, चोचीपर्यंत पिवळा रंग पसरलेला आहे. पंखांच्या कडांवर पिवळा, नारिंगी, लाल आणि काळा असे विविध रंग आहेत. त्याची काटेरी शेपटी पिवळट–हिरव्या-तपकिरी रंगांची असून तिची टोके काळी आहेत. गाल व मानेची बाजू धूसर राखाडी रंगाची आहे. मादीचा रंग नराच्या रंगापेक्षा फिकट असून तिच्या पंखांवर लाल रंगाचा पट्टा नसतो. हा पक्षी अतिशय चंचल आहे. खुल्या जंगलात त्यांची खूपच हालचाल असते, परंतु झाडाझुडूपात शिरले की त्यांचे दर्शन दुर्मिळ होते.

लीओथ्रिक्स सामान्यतः हिंदुस्थान, भुतान, नेपाळ, बर्मा आणि तिबेटच्या काही भागात आढळतात. याचे वास्तव्य पहाडी जंगलात व इतर जंगलांमध्ये असले तरी त्याला देवदार झाडांच्या जंगलामध्ये राहायला जास्त आवडते. समुद्राच्या पातळीपासून सुमारे 7500 फूटपर्यंतच्या उंचीवरदेखील हे आढळतात. हे पक्षी स्ट्रॉबेरी, पिकलेली पपई, पेरू अशा फळांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कीटकही खातात. ते अन्न सहसा पानांमध्ये, लाकडांमध्ये व वनस्पतीच्या निम्न स्तरावर शोधतात.

अनेक वेळा हे पक्षी दहा ते तीसच्या समूहाने एकत्र आढळतात. प्रजननाच्या काळात मात्र ते जोडी जोडीने फिरतात व एकाच ठिकाणी राहतात. हे पक्षी वर्षभर गात असतात, परंतु प्रजनन ऋतु दरम्यान त्यांचे गाणे अधिकच मधुर होते. नर तर मादीला आकर्षित करण्यासाठी फारच छान गाणी गातो. कोणत्याही संकटाची चाहूल लागताच मात्र ते अतिशय कर्कश आवाजात ओरडतात. प्रजनन ऋतु एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत असतो. ह्या काळात हे पक्षी विहिरी जवळ आढळतात.

लीओथ्रिक्स पक्षी आपले घरटे उघडय़ावरच बांधतात. घरटय़ासाठी ते पाने, काडय़ा-काटक्यांचा उपयोग करतात. त्यांची घरटी सामान्यतः जमिनीपासून 10 फुटांवर आढळतात. हे पक्षी एका वेळेला 2-4 अंडी घालतात. अंडी आकाराने मोठी असून चमकदार असतात. त्यांचा रंग फिकट निळा असतो व त्यावर लाल तपकिरी रंगांचे ठिपके असतात. नवजात पिल्ले फारच गोजिरवाणी दिसतात. त्यांच्या लाल रंगावर नारिंगी रंगाची उधळण असते.
या पक्ष्यांचे फोटो काढताना वेगळीच अनुभूती जाणवली. विविध रंगांनी नटलेले त्याचे रूप हे प्रकाशाच्या झोताप्रमाणे वेगवेगळे भासत होते.

[email protected]