ठसा : डॉ. जगदीश सामंत


>>मनीष दाभोलकर<<

प्रसिद्धीपासून दूर राहिलेले व कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी आयुष्य समर्पित केलेले डॉ. जगदीश सामंत ही एक चालती फिरती संस्था होती. मनात एकच ध्यास असायचा. कुष्ठरोगी व इतर रुग्णांना लवकर बरे करून घरी सोडण्याचा. सुर्वणपदक मिळवून 1954 मध्ये मुंबई विद्यापीठातून डॉक्टर झालेल्या जगदीश सामंत यांना परदेशात सहज जाता आले असते. परंतु त्यांनी ऐन तारुण्यात वेगळाच विचार केला. त्यांनी 1974 साली स्थापन केलेली लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निवारण संस्था वालीव, वसई येथे कार्यरत आहे. डॉ. सामंत हे केवळ फॅमिली डॉक्टर, सर्जन, कुशल डायग्नोसिस करणारे किंवा वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणारे प्रशासक नव्हते तर त्यांनी या संस्थेच्या सर्व प्रकारच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. डॉक्टर सामंतांनी हे अनेक दशके केले. त्यात भर म्हणून अर्नाळा हेल्थ ट्रस्टच्या महालक्ष्मी हॉस्पिटलची स्थापना 1999 मध्ये अर्नाळा इथे केली. त्यावेळी त्या भागात एकही दवाखाना किवा हॉस्पिटल नव्हते. महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अनेक विभाग सुरू केले. नामांकित डॉक्टर्स, सर्जन यांच्या सहाय्याने छोटय़ा खेडय़ात श्री महालक्ष्मी इस्पितळ सुरू करण्याचे काम जगदीश सामंत यांनी केले. मुंबईमध्ये साधारण 1974 ते1995 पर्यंतच्या काळात बँडबाजा वाजत वरात निघण्याचा आवाज कानावर पडत असे, मात्र खिडकीतून किंवा रस्त्यावरून येऊन पाहिल्यावर समजे की कुष्ठरोग्यांची वरात वाद्ये वाजवीत रस्त्यावरून भिक्षा गोळा करीत जात आहे. रेल्वे स्टेशनजवळही कुष्ठरोगी दिसत. त्यांना जवळ जाऊन भीक द्यायलासुद्धा लोक घाबरत. अशाच कुष्ठरोग्यांसाठी डॉ. सामंत यांनी आयुष्यभर काम केले. 1999 पासून मुंबईतील कुष्ठरोगी गरीबांची संख्या कमी झाली यांचे श्रेय डॉ.जगदीश सामंत यांनाच द्यावे लागेल. त्या काळात डॉक्टरांनी बोरिवली-दहिसरनजीक ‘हेल्प ऑफ मेरी’ संस्थेच्या मदतीने कुष्ठरोग्याच्या वसाहतीमध्ये जाऊन त्यांना बरे करण्याचा विडाच उचलला ते भिक्षा मागणाऱयांना इस्पितळात भरती करून त्यावर मोफत उपचार करीत. कुष्ठारोग्याजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेणे, त्यानंतर स्वतः हाताने शरीरावरील जखमा धुणे व साफ करणे हे सोपे काम नव्हते. अर्थात त्यात त्यांना समाजातील अनेक मान्यवरांनी विविध माध्यामातून मदत केली. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी स्वतः वालीवला राहून सात कार्यक्रम विनामूल्य सादर केले. डॉ. रवी बापट, डॉ.अजित फडके, गानकोकिळा किशोरीताई आमोणकर,  एस. एम. जोशी, भाई वैद्य अशा अनेकांनी सहकार्य केले. कै. बाबुराव सामंत व कमलताई देसाई हे या संस्थेचे ट्रस्टी म्हणून काम पाहत होते. हजारो रुग्ण या हालअपेष्टा व रोगातून मुक्त झाले. आता शेकडो रुग्ण या संस्थांचा फायदा घेत आहेत. स्व.डॉ. जगदीश सामंत यांनी 58 वर्षे कुष्ठरोग्यांची अविरत सेवा केली. याबद्दल त्यांना 2011मध्ये ‘आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. आयुष्याच्या 84 वर्षांपैकी  60 वर्षांहून अधिक काळ दररोज श्री महालक्ष्मी हॉस्पिटल, वालीवचे कुष्ठरोग निवारण संस्था व गोरेगावचा दवाखाना हा त्यांचा नित्यनियम होता. गोरेगावचे ते लाडके फॅमिली डॉक्टरसुद्धा होते. नाडीवरून रोगांचे अचूक निदान ते करीत असत. नुकताच कुष्ठरोगाचे राज्यात अडीच लाख संशयित रुग्ण आहेत असा अहवाल प्रकाशित झाला व त्यात 17 हजार संशयित रुग्णांपैकी काही कुष्ठरुग्ण नव्याने आढळले आहेत. यातील 5 रुग्ण हे पॉसिबॅसेलरी ( बहुजिवाणू) वर्गातील सुद्धा आहेत. त्यांच्यापासून संसर्ग पसरण्याचा धोका आहे. याचाच अर्थ कुष्ठरोगाची लढाई अजून संपलेली नाही. आव्हान अजून कायमच आहे. अशावेळी अलीकडेच ज्यांचा प्रथम स्मृतिदिन झाला त्या डॉ. जगदीश सामंत यांचे कुष्ठरोग्यांसाठी केलेले कार्य नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

(विश्वस्त, लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निवारण संस्था, वालीव)