लेख : निवडणूक, निकाल आणि नवलाई

192

>>वैजनाथ महाजन<<

दिल्लीची निवडणूक ही सर्वांची असते. पण गल्लीची निवडणूक ही गल्लीपुरतीच असते. ज्यांना निवडणुकीचा सराव असतो त्यांना यात फारसा रस असत नाही. एक निवडणूक झाली की ते दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला सिद्ध होत असतात. नवलाई असते ती वातावरणाची आणि निवडणूक कोणत्या प्रकाराने तडीस जाणार याबद्दलची. एकूणच आपण सर्वांनी निवडणूक हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनविलेला असल्यामुळे त्याची नवलाई मात्र किमानपक्षी टिकून राहील असे वाटते. म्हणून जेवढय़ा निवडणुका महत्त्वाच्या तितकाच निकाल पण महत्त्वाचा.

निवडणुका म्हटल्या की हिंदुस्थानातील असंख्य नव्हे तर अगणित माणसांच्या अंगात नवेच वारे संचारू लागतात. निवडणुका हा आपल्या प्रत्येकाच्या काळजातला आणि त्याच वेळी काळजीचा पण विषय असतो. उमेदवार कोण, आणि त्याची कुणाशी लढत, याबाबतच्या चर्चांना नेहमीच ऊत येत असतो. पैजा लागतात. एकमेकांना गालीप्रदान करणे हे तर नित्याचे होऊन बसत असते. अगदी शाळकरी मुलेसुद्धा वेगवेगळे झेंडे घेऊन घरादारात नाचत असतात आणि प्रौढ मंडळी प्रचारफेऱ्यात आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत असतात. यातून बऱ्यापैकी कमाईही होत असते. अलीकडेच झालेल्या निवडणुकीबाबत एक मजेशीर पाटी वाचण्यात आली. पाटीवर असे लिहिले होते की, ‘‘इथे प्रचारफेऱयांकरिता माणसे पुरविली जातील’’ अर्थात खाली वयोगटानुसार दर पण लिहिलेले होत़े  हो, म्हणजे यात कसलीही लपवाछपवी नाही. माणसे पाहिजेत ही राजकारण्यांची गरज आणि माणसांना पैसे पाहिजे आहेत ही त्यांची गरज. त्यामुळे अशा समन्वयाची भूमिका खरोखर दाद देण्यासारखीच म्हटली पाहिजे. आचारसंहिता ही फार अलीकडची गोष्ट आहे. पण त्याच्या अगोदर हा सारा मामला दोन-अडीच महिने अगदी बिनधास्तपणे चालू असायचा. बहुसंख्य उमेदवार ‘तात्या’, ‘बापू’, ‘दादा’, ‘अण्णा’ अशा आदरार्थी टोपण नावानेच ओळखले जात असायचे आणि मग कोण, कुणाच्या विरुद्ध शड्डू ठोकणार याच्या चर्चा झडू लागायच्या. आता यात खूप मानला तर एकसुरीपणा आणि मानली तर शिस्त आलेली आहे. तरी पण निकालाची धास्ती आणि निकालाची नवलाई मात्र तसूभरही कमी झालेली नाही. एकदा का निवडणूक म्हटली किंवा परीक्षा म्हटली की त्यानंतर निकाल हा अपरिहार्यच असतो. आपली उत्सुकता आपण किती ताणणार यावर आपली मनाची घालमेल आपोआप तयार होत असते. यात मनस्वी अधिरपणा आणि कमालीची उत्सुकता याचे बेमालूम मिश्रण होत असते. कोणीतरी निवडून येणार, कोणीतरी पराभूत होणार, हे अटळ असते. त्यामुळे जे निवडून येणार ते गुलालाचे धनी होणार आणि जे पराभूत होणार ते चार दिवसांसाठी ‘रिलॅक्स‘ होण्याकरिता कुठेतरी अज्ञातवासात निघून जाणार हे पण आता जवळपास ठरून गेलेले आहे. यात कुणाला कधीच पराभव ठाऊक नसतो. तर एखाद्या दुर्दैवी उमेदवाराला यशाची चव कधीच चाखता आलेली नसते. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री सदैव सहजासहजी निवडून येत असत. त्यांचा एवढा लौकिक होता की, त्यांनी जर दगड उभा केला तर तोसुद्धा निवडून येईल असे लोक म्हणत असत. अशा मुख्यमंत्र्याविरुद्ध एक अत्यंत सामान्य माणूस उभा राहिला. लोक त्याची टिंगलटवाळी करू लागले. तेव्हा तो शांतपणे म्हणाला की, मी त्यांच्याविरुद्ध उभा राहिलेलो नाही तर ते माझ्याविरुद्ध उभे राहिलेले आहेत. आता बोला! आपल्याकडे अशाही ‘वल्ली’ गावोगावी असतात आणि त्या अशा पद्धतीने राजकारणामुळे पुरत्या झपाटून गेलेल्या असतात. यात आपणाला कधीतरी किमान विधानसभा दिसली नाही तरी जिल्हा परिषद तरी दिसावी हीच ओढ असते. त्याकरिता हवी ती धावाधाव केली जाते आणि निकालाकडे लक्ष आपोआपच वळत असते. त्यामुळे जसेजसे निकालाचे दिवस जवळ येऊ लागतात तशीतशी आपल्या माणसांची मनःस्थिती पराकोटीची अधिर होत असते. आणि आपला उमेदवार ठीक आहे ना, हे पण सतत विचारले जात असते. अलीकडे ‘रोड-शो’ होत असतात. त्याचे खर्च कागदोपत्री नोंदवले पण जात असतात, पण निकालाच्या बाबतीत असा काही काटेकोर कागदी व्यवहार नसतो आणि नसावा. कारण इतक्या दिवसाची मेहनत करून निवडून आलेल्या उमदेवाराला जरा सढळ हाताने खर्च करण्याची मुभा असायला हवी. त्याशिवाय त्याचा आणि त्याच्या कार्यकर्त्यांना श्रमपरिहार कसा होणार? दिल्लीची निवडणूक ही सर्वांची असते. पण गल्लीची निवडणूक ही गल्लीपुरतीच असते. म्हणजे, गणेशोत्सवातील मंडळाच्या निवडणुकीसारखी म्हणा ना! पण कुठेही माणूस निवडून आला की, तो स्वतःचा चेहरा पुनःपुन्हा आरशात पाहू लागतो आणि आपण इतरेजनापेक्षा वेगळे आहोत असे उगाच म्हणू लागतो. पण ज्यांना निवडणुकीचा सराव असतो त्यांना यात फारसा रस असत नाही. एक निवडणूक झाली की ते दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला सिद्ध होत असतात. नवलाई असते ती वातावरणाची आणि निवडणूक कोणत्या प्रकाराने तडीस जाणार याबद्दलची. एकूणच आपण सर्वांनी निवडणूक हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनविलेला असल्यामुळे त्याची नवलाई मात्र किमानपक्षी टिकून राहील असे वाटते. म्हणून जेवढय़ा निवडणुका महत्त्वाच्या तितकाच निकाल पण महत्त्वाचा. ‘पंत गेले की राव चढणार’ हे स्पष्ट आहे. पण हे कसे झाले हे समजून घेणे म्हणजेच निकालाची नवलाई आपलीशी करून घेणे असाच त्याचा अर्थ नाही काय?

आपली प्रतिक्रिया द्या