ठसा : मधुकर दरेकर

157

>>  नवनाथ दांडेकर 

आयुष्यातली 55 वर्षे फिटनेस आणि व्यायाम प्रशिक्षणाला वाहणारे ‘पॉवरलिफ्टिंग महर्षी’ मधुकर महादेव दरेकर वयाच्या ऐशीव्या वर्षाकडे झुकले आहेत तरी दरेकर सरांची क्रीडा प्रशिक्षणाची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. देशातील युवक आणि युवती शरीराने सुदृढ झाले तरच देश बलवान होईल असे दरेकर यांचे ठाम मत आहे. म्हणूनच आपली 55 वर्षे त्यांनी पॉवरलिफ्टिंगला आणि व्यायाम प्रशिक्षणासाठी वाहून त्यांनी आगळा आदर्शच निर्माण केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले हजारो युवा क्रीडापटू पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव या क्रीडाप्रकारांत देश-विदेशात चमकदार यश मिळवत आहेत. विशेष म्हणजे दिव्यांग क्रीडापटूंतही व्यायामाची आणि शरीरसौष्ठवाची आवड निर्माण करण्यात दरेकर सर कमालीचे यशस्वी झाले आहेत.

मुंबई उपनगर हौशी पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग स्पर्धा भरविण्यात दरेकर यांचा अनेक वर्षे पुढाकार राहिला आहे. व्यायाम क्षेत्रात आपल्या कार्याचा वटवृक्ष उभा करणार्‍या मधुकर दरेकर यांनी परळच्या सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून आपली क्रीडाप्रशिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला. स्वतः नाणावलेले पॉवरलिफ्टर म्हणून दरेकर यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके पटकावली आहेत. वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग खेळातील त्यांच्या बहुमूल्य योगदानामुळेच त्यांना दादोजी कोंडदेव राज्य पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, मुंबई महापौर पुरस्कार, राज्य गुणवंत कामगार पुरस्कार, कामगार रत्न पुरस्कार, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, श्रम गौरव पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

सध्या चैतन्य हेल्थ सेंटरच्या आणि दरेकर जिम्सच्या माध्यमातून दरेकर सरांची व्यायाम प्रशिक्षण कारकीर्द अव्याहतपणे सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, दि पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि गोवा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सल्लागार म्हणूनही दरेकर सरकार कार्यरत आहेत. व्यायाम आणि शरीरसंपदेवरील प्रेमापोटी वयाच्या 79 व्या वर्षीही दरेकर सर तिशीतल्या युवकाप्रमाणे फिट दिसतात. क्रीडा प्रशिक्षणासोबत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमातून गरजूना मदत करण्याचा पायंडा पाळणारे मधुकर दरेकर हे क्रीडा प्रशिक्षणातील महर्षीच ठरले आहेत. पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव क्षेत्रात चमकदार कामगिरीसाठी शारीरिक फिटनेस महत्त्वाचा असतो. त्यासाठीच युवकांत शरीरसंवर्धनाची आवड निर्माण करण्यासाठी दरेकर अनेक वर्षे झटत आहेत. मुंबईतील अनेक जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी बलवान शरीराचे महत्त्व आपल्या हजारो शिष्यांना पटवून देत त्यांना फिटनेस क्षेत्रात कार्य करायला लावले आहे. त्यांचे दोन चिरंजीव तुषार दरेकर आणि अरुण दरेकर त्यांचाच वारसा पुढे चालवताहेत. क्रीडा प्रशिक्षणासोबतच गरजू रुग्णांना मदत, बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असे विविध सेवाभावी उपक्रम दरेकर सर आणि त्यांचे चिरंजीव या उद्योगसमूहाच्या माध्यमातून करीत आहेत. आपण आपल्या अंतिम श्वासापर्यंत फिटनेस प्रशिक्षण व संवर्धनाचे कार्य सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार दरेकर सर बोलून दाखवतात.

आपली प्रतिक्रिया द्या