पुरातत्वशास्त्रातील महानायक

>> वरदा खळदकर

महाराष्ट्राला व्यासंगी इतिहासकार आणि पुरातत्ववेत्त्यांचा मोठा वारसा आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, धर्मानंद कोसंबी, रा. चि. ढेरे अशा अनेक विद्वानांनी ही परंपरा मोठी केली. या साखळीत एक नाव होते पद्मश्री प्रा. मधुकर केशव ढवळीकर.

महाराष्ट्राला ज्ञानतपस्वी इतिहासकार-पुरातत्ववेत्त्यांची एक प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. त्या परंपरेतील शेवटचाच म्हणावा असा एक विद्वान संशोधक गेल्या महिन्यात पडद्याआड गेला. त्याचे नाव पद्मश्री प्रा. मधुकर केशव ढवळीकर. सर्वसामान्य जनतेला तुलनेने अपरिचित असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त असलेले हे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या विद्वत्परंपरेचे एक गौरवशाली भूषण होते. उत्तम संशोधक, उत्तम शिक्षक, उत्तम लेखक तसेच कुशल प्रशासक असे त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल.

त्यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथून एमए पदवी मिळवून पुरातत्वमहर्षी प्रा. ह. धी. सांकलियांच्या मार्गदर्शनाखाली अजंठा लेण्यांतील भित्तिचित्रांच्या अभ्यासातून दिसणाऱया दख्खनमधील तत्कालीन लोकजीवनावर पीएच.डी. प्रबंध सादर केला. मात्र प्राचीन कलेतिहासापासून स्वतंत्र संशोधनाची सुरुवात केली असली तरी त्यांनी उर्वरित कार्यकालात बौद्ध स्थापत्य, ऐतिहासिक व मध्ययुगीन कालखंडातील वसाहतींची उत्खनने, इतिहासपूर्व काल, सिंधुसंस्कृती, आर्यप्रश्न, नाणकशास्त्र, दैवतशास्त्र अशा विविध विषयांमध्ये मूलगामी संशोधन व लेखन केले. आजच्या एकेका विषयातील निपुणतेच्या काळात तर हे जवळजवळ अविश्वसनीय वाटावे अशी परिस्थिती आहे.

मात्र त्यांचे सर्वात प्रसिद्ध संशोधन हे इनामगाव येथील उत्खनन व त्यातून मिळणाऱया माहितीच्या आधारे दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या अंतकाळाबद्दल मांडलेले गृहीतक हेच ठरले. इ.स.पू. २२०० ते ७०० अशा काळात अस्तित्वात असलेले हे खेडेगाव नागरीकरणाच्याही आधी अनेक शतके उदयाला आलेल्या दख्खनच्या आद्य शेतकऱ्यांच्या वसाहतीतील एक प्रातिनिधिक स्थळ होते. या ठिकाणी तेरा वर्षे डेक्कन कॉलेजतर्फे ढवळीकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी अतिशय शास्त्रशुद्ध व काटेकोरपणे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन करून अनेक घरे, इमारती, दफने, तांबट – कुंभार – मणिकार – लोणारी इत्यादी कारागीरांच्या कार्यशाळा, प्राण्यांची हाडे, जळलेली धान्ये/बिया इत्यादी पुरावशेषांची तपशीलवार नोंदणी केली.

या माहितीवर आधारित त्यांनी या वसाहतीच्या अंतकाळातले दैनंदिन जीवनातले बदल टिपले आणि वारंवार पडणारे दुष्काळ आणि बेभरवशी पाऊसमान यामुळे येथील समाज हा शेती सोडून भटका पशुपालक समाज झाला असे गृहीतक मांडले. १९८८ ला प्रकाशित झालेला हा उत्खनन अहवाल त्यानंतरही बरीच वर्षे सार्वकालिक सर्वोत्तम अहवाल म्हणून गणला जात असे. त्यांनी इनामगाव खेरीज पवनार,कायथा (मध्य प्रदेश), आपेगाव, पंढरपूर, कंधार, अंबारी (आसाम), वाळकी, कवठे व कुंतासी (गुजरात) येथे यशस्वीरीत्या उत्खनने केली. या सर्व उत्खननांचे तपशीलवार अहवालही प्रसिद्ध केले.

प्रचंड व्यावसयिक लेखनाव्यतिरिक्त त्यांनी मराठी व इंग्लिशमध्ये पाठय़पुस्तकेही लिहिली. तसेच सर्वसामान्य लोकांपर्यंत पुरातत्वीय ज्ञान पोचावे या उद्देशाने मराठीत विविध विषयांवर पुस्तके लिहिली. ते स्वतः अतिशय उत्तम शिक्षक होते. कुठलाही क्लिष्ट विषय सहज सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी होती. डेक्कन कॉलेजचे संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या भारतीय विद्या अभ्यासक्रमांमध्ये ज्ञानदान सुरू ठेवले. बुद्धी प्रामाण्यवाद, कमालीचा वक्तशीरपणा, कडक शिस्त, शेवटपर्यंत राखलेले उत्तम आरोग्य या गुणांमुळे त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत ज्ञानसाधना, संशोधन व लेखन चालूच ठेवले होते. त्यांच्या निधनाने राजवाडे-कोसंबी-ढेरे अशा स्वयंप्रज्ञ विद्वानांच्या मालिकेतील शेवटचा दुवा निखळला. आजतरी त्या तोडीचा विद्वान महाराष्ट्रदेशी दिसत नाही.

(लेखिका पुरातत्त्वतज्ञ आहेत.)