फ्रेंचचा वसा


>> माधव डोळे

‘एकला चलो रे’च्या धर्तीवर खारमध्ये राहणारे अशोक डहाणूकर तरुणांना फ्रेंच भाषेचे धडे देत आहेत.

महाराष्ट्रात काही कोसांवर भाषा बदलते. माणूस भाषेच्या इतक्या प्रेमात पडतो की त्याचे सारे आयुष्यच भाषामय होऊन जाते. तशीच अवस्था खारमध्ये राहणारे अशोक डहाणूकर यांची आहे. त्यांची मातृभाषा मराठी, पण शाळेत असताना फ्रेंच भाषेची गोडी निर्माण झाली आणि मोठय़ा निर्धाराने ते ही भाषा शिकले. केवळ फ्रेंच भाषा ते शिकलेच नाहीत तर ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ या समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणुकीनुसार त्यांनी मुंबईतील विद्यार्थ्यांना फ्रेंच भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली. गेली ३५ वर्षे ते भाषा शिकविण्याचे काम करीत आहेत. कोणाचाही पाठिंबा नसताना ‘एकला चलो रे’च्या धर्तीवर एक मिशन म्हणून ते हे काम करीत आहेत. एखाद्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय कंपनीत बडय़ा पदावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करू शकले असते, पण आपल्याकडील भाषेचे ज्ञान दुसऱयाला देण्यासाठी ते धडपडत आहेत. आज त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठय़ा हुद्यावर काम करीत आहेत.

अशोक डहाणूकर यांची भाषा शिकवण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. अतिशय सोप्या पद्धतीने ते फ्रेंच शिकवतात. परकीय भाषेचे ज्ञानार्जन करीत असतानाच त्यांनी फ्रेंच भाषेसंबंधित आतापर्यंत आठ पुस्तके लिहिली. कलोकियल फ्रेंच, स्पोकन फ्रेंच, इर्ररेग्युलर व्हर्ब्स, एव्हरी डे फ्रेंच, फ्रेंच मेड इझी फॉर इंडियन्स ही त्यांची पुस्तके अतिशय गाजली. विशेष म्हणजे ही सारी पुस्तके त्यांनी स्वत: पदरमोड करून छापली आहेत. ही भाषा शिकल्यास तुम्हाला भाषांतराची तर कामे मिळतीलच, पण हिंदुस्थान व फ्रेंच सरकार यांच्यातील चांगले संबंध लक्षात घेता फ्रेंच काऊन्सिलेट, ऍम्बेसी तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय येथे नोकरी निश्चित मिळेल, असा विश्वास डहाणूकर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करतात. विशेषत: मराठी मुलांनी ही भाषा शिकून महाराष्ट्राचा झेंडा सातासमुद्रापल्याड रोवावा, असा मोलाचा सल्ला ते देतात. डहाणूकर यांनी केवळ फ्रेंचची पुस्तकेच नव्हे तर सीडीदेखील तयार केली आहे. त्यांच्याशी ९७०२३०७३९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.