मोहन जोशी

प्रशांत गौतम

मराठी नाट्यसृष्टीत भरीव योगदान दिल्याबद्दल यंदाचा ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी बालगंधर्व, केशवराव दाते, मामा पेंडसे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, दुर्गा खोटे, प्रभाकर पणशीकर, विद्याधर गोखले, शरद तळवलकर, मोहन वाघ, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, अमोल पालेकर यांना प्राप्त झाला होता. यावरूनच या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकते. मराठी-हिंदी चित्रपट, दूरदर्शन मालिका असोत किंवा मराठी नाट्यक्षेत्र या तिन्ही सशक्त आणि प्रभावी माध्यमांतून आपल्या कार्यकर्तृत्वाची अमीट छाप मोहन जोशी यांनी सोडली आणि सिने, नाट्य रसिकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजविले व आजही गाजवीत आहेत. सिनेमा हिंदी असो की मराठी त्यात आरंभीच्या काळात वाटचाल करताना कुणी गॉडफादर लागतो अशा प्रकारचा समज त्यांनी स्वहिमतीने मोडून काढला. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या कुटुंबातच त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र जपले नि जोपासले. खडतर मेहनतीच्या जोरावर या तिन्ही क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले. मोहन जोशी यांनी विविध भाषांतील पाचशे चित्रपटांत, ६० मालिकांमध्ये आणि जवळपास ५० व्यावसायिक नाटकांत विविधांगी भूमिका साकार केल्या. दर्जेदार अभिनय, कला जोपासत त्यांनी आपला प्रवास संपन्न केला आहे. एवढेच नव्हे तर मराठी नाट्य परिषदेत अध्यक्षपद ही भूमिकाही ते समर्थपणे पार पाडत आहेत. बंगळुरू येथे १२ जुलै १९५३ साली मोहन जोशी यांचा जन्म झाला. घरात साहित्य, कला, नाटक, संस्कृती यांच्यासाठी पोषक वातावरण होते. शिवाय त्यांचे आई-वडील कलागुण जपणारे, प्रोत्साहन देणारे होते. त्यामुळे बालपणापासून त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र जोपासण्यास सुरुवात केली. वडील विष्णू यांनीही मोहन जोशी यांना नाटकात काम करण्याची परवानगी दिली. १९६६ साली सहावीच्या वर्गात असतानाच त्यांना ‘टुणटुण नगरी, खणखण राजा’ या नाटकात पहिल्यांदा भूमिका साकार करण्याची संधी मिळाली. बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी किर्लोस्कर कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी करणे आणि नाटकांचे दौरे सांभाळणे ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरतच होती. शेवटी नाटकात काम करायचे की नोकरी करायची यापैकी एक पर्याय निवडण्यास मालकाने जेव्हा सांगितले तेव्हा मोहन जोशी यांनी शांतपणे नोकरी सोडली व नाट्यक्षेत्रात करींअर करण्याचे ठरविले. अभिनयास पूर्ण वाव मिळावा यासाठी त्यांनी नोकरी सोडली खरी, पण पोटापाण्याचा प्रश्न होताच आणि केवळ नाटकांच्या जिवावर सर्व काही सुरळीत होईल असाही तेव्हाचा काळ नव्हता. त्यामुळे त्यांनी ट्रकचा व्यवसाय सुरू केला. आठ वर्षे त्यांनी हे खडतर परिश्रमाचे काम केले आणि जमेल तेवढा वेळ नाटकांच्या दौऱ्यासाठी दिला. ज्योती जोशी यांच्यासोबत १६ फेब्रुवारी १९७५ साली लग्न झाले आणि अभिनयात कारकीर्द करण्यासाठी मुंबई गाठली. शालेय जीवनात ‘गाणारा मुलूख’ या नाटकात  आणि ‘थीप पोलीस’ या एकांकिकेमध्ये त्यांनी काम केले. कॉमर्स कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘काका किशाचा’, ‘तीन चोक तेरा’, ‘डिअर पिनाक’ आणि ‘पेटली आहे मशाल’ अशा नाटकांत कामे केली. ‘कुर्यात सदा टिंगलम’ या व्यावसायिक नाटकातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर हौशी नाट्य संस्थांची नाटकं, व्यावसायिक नाटक, बालनाट्य, कॉलेज जीवनातील नाटकं आणि एकांकिका, मालिका हिंदी आणि मराठी चित्रपट, जाहिरातपट असा चाळीसेक वर्षांचा प्रवास हा वैविध्यपूर्ण होत गेला. गौरीनंदन या थिएटर्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकं सादर केली. (गौरी आणि नंदन ही त्यांच्या मुलांची नावे). मोहन जोशी यांच्या आई कुसुम भावे. प्रख्यात लेखक पु. भा. भावे यांच्या त्या चुलत भगिनी. वडील खडकी येथे मिलिटरीच्या ईमई वर्कशॉपमध्ये नोकरी करीत असत. आई-वडील पुण्यात नवीपेठ भागातील वाडय़ात राहत असत. आईचे माहेर नागपूर आणि सासर अमरावतीचे. मोहन जोशी यांचे धाकटे मामा भरत नाट्य मंदिरात मेकअपमन म्हणून काम करायचे. अशा चौफेर वातावरणात त्यांची अभिनय कारकीर्द बहरत गेली. हा सर्व चाळीसेक वर्षांचा प्रदीर्घ प्रवास त्यांनी ‘नटखट नटखट’ या आत्मचरित्रात विस्ताराने मांडला आहे. आत्मचरित्राची चौथी आवृत्ती संभाजीनगर येथील साकेत प्रकाशनने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केली. त्याचे शब्दांकन जयंत बेंद्रे यांनी केले होते. प्रख्यात लेखक भारत सासणे यांची प्रस्तावना आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लेखन शुभेच्छा या आत्मचरित्र लेखनास लाभल्या. रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून जे सांगायचे ते तर सांगितलेच आहे. पण हा सर्व प्रदीर्घ प्रवास त्यांनी लेखक म्हणूनही उत्तम प्रकारे अभिव्यक्त केला आहे. नाटकातील अभिनयासाठी त्यांना विपुल पुरस्कार मिळाले. चित्रपटातील भूमिकेचाही विविध पुरस्कारांनी गौरव झाला. तिन्ही क्षेत्रांतील योगदानासाठी दीनानाथ मंगेशकर, पी. सावळाराम, विदर्भ भूषण हे पुरस्कार लाभले. तर ‘नटखट नटखट’ आत्मचरित्र लेखनासाठी महत्त्वाचे पुरस्कार लाभले. या सर्व कारकीर्दीचा सन्मान आता सांगली येथील अत्यंत प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे या पुरस्काराने झाला आहे.