मुद्दा : मराठी माणसांची गळती

12

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

वास्तविक भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर त्या त्या प्रांतांची ओळख तिथे राहणाऱया भाषिकांची ओळख असते, परंतु महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची ओळख मराठी न राहता मराठी माणसांची गळती नि इतरांची चलती झालेली दिसत आहे. अलीकडच्या वर्षांत हिंदी भाषिकांची संख्या इतकी वाढलेली आहे की, मुंबई हे शहर हिंदी भाषिक म्हणून ओळखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात तर 28 टक्के हिंदी भाषिक आहेत. साधी राहणी, अल्प मोबदला यांच्या जोरावर स्थानिकांच्या रोजीरोटीवर डल्ला मारतात अशी स्थिती आहे.

2011 च्या शिरगणतीचे प्रसिद्ध झालेले भाषावार आकडे मुंबईतील मराठी भाषिकांचा घसरलेला टक्का हेच दर्शवितात. मुंबई शहरातील हिंदी भाषिकांची संख्या 2001 च्या शिरगणतीमध्ये 25 लाख 88 हजार होती ती 2011 च्या शिरगणतीमध्ये 35 लाख 98 हजार होत गेलेली आहे. त्याच काळात 2001 मध्ये 45 लाख 23 हजार लोकांनी मराठी भाषिक असल्याची नोंद केली होती ती 2011 मध्ये 44 लाख चार हजार मराठी भाषिक अशी आहे. मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे, रायगड जिह्यांतही हाच कल दिसत आहे. कारण या दोन शेजारी जिह्यांत हिंदी भाषिकांच्या संख्येत 80 टक्के वाढ झाल्याचे दर्शवीत आहे. अशा भाषिक फरकाचा राजकारणावर व समाजकारणावर हळूहळू प्रभाव पडतो. त्याचा विपरीत परिणाम राजकीयदृष्टय़ा जागृत असलेल्या मराठी माणसावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय पुढच्या पिढीबाबत अभ्यास केला तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याची संख्या वीस वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतल्यास मराठी पहिल्या क्रमांकावर होती. गुजराती दोन क्रमांकावर होती, हिंदी तिसऱया क्रमांकावर असायची तर उर्दू चौथ्या क्रमांकावर असायची. आताच्या वर्तमानकाळात मराठी विद्यार्थ्यांची संख्या चौथ्या क्रमांकावर घसरली असून गुजराती संख्या प्रथम चारमध्ये पण नाही, दुसऱया व तिसऱया क्रमांकासाठी हिंदी व उर्दूची चढाओढ लागलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या