मराठवाडा आणि रेल्वे

>> शंतनू डोईफोडे

अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे घोडे अखेर गंगेत न्हाताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच गेल्या आठवडय़ात तशी ग्वाही दिली आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा मंजूर करण्यात आल्याचेही गडकरी यांनी जाहीर केले असून चार वर्षांत हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अर्थात महाराष्ट्रातील इतर रखडलेल्या रेल्वे मार्गांचे आणि प्रकल्पांचे काय, हा प्रश्न उरतोच. हे रखडलेले मार्ग, प्रकल्प योजना यांचा हा थोडक्यात आढावा…

साधारणपणे १९०२ सालच्या आसपास मराठवाडय़ातील मनमाड-सिकंदराबाद, मुदखेड -आदिलाबाद, पूर्णा- अकोला व परभणी-परळी या मार्गांची टप्प्याटप्प्याने निर्मिती झाली असे म्हणतात. नेमक्या कुठल्या वर्षी हे काम सुरू झाले व कधी संपले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही, पण मराठवाडय़ातील सर्व मार्ग मीटरगेज असल्यामुळे देशातील इतर भागात जाण्यासाठी मनमाड किंवा इतर ठिकाणी रेल्वे बदलून जावे लागत असे. १९६० मध्ये मराठवाडय़ाचा भाग संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाल्याने या भागातील जनतेला राजकीय कामासाठी मुंबई तर शैक्षणिक कामासाठी पुण्याला जावे लागू लागले, पण रेल्वेच्या मीटरगेज-ब्रॉडगेज प्रकारामुळे हा प्रवास अत्यंत अवघड होता. १९५४ मध्ये रेल्वे प्रश्नासाठी संघर्ष करणारे सुधाकरराव डोईफोडे यांनी तत्कालीन वाहतूकमंत्री लालबहादूर शास्त्री यांना पत्र लिहून मराठवाडय़ातील मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर करण्याची मागणी सर्वप्रथम केली (ते पत्र सोबत जोडले आहे). त्यानंतर स्व. गोविंदभाई श्रॉफ, स्व. अनंतराव भालेराव मराठवाडय़ातील सर्व राजकीय पक्ष, विकासप्रेमी संघटना यांनी ब्रॉडगेज मिळावी म्हणून मोठा लढा उभा केला. रेल्वे प्रश्नासाठी एवढय़ा प्रमाणावर लढा देण्याचा विक्रम बहुधा मराठवाडय़ाच्या नावावर नोंदवला गेला असणार.

१९९१ मध्ये सी.के.जाफर शरीफ रेल्वेमंत्री झाले. या सरकारने देशभरातील सर्व मार्गांचे युनिगेजमधे रूपांतर करण्याचे धोरण स्वीकारले. १९९४ मधे मराठवाडय़ातील सर्व रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाला सुरुवात झाली. २००६ मध्ये हे काम पूर्ण झाले. मनमाड-सिकंदराबाद, परभणी-पूर्णा-परळी, पूर्णा-अकोला, मुदखेड -अदिलाबाद या सर्व मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्याने मराठवाडा दळणवळणदृष्टय़ा संपूर्ण देशाशी जोडला गेला.

मंजूर झालेले आणि काम सुरू असलेले रेल्वे प्रकल्प

– परळी-बीड-नगर या २५० कि.मी. लांबीच्या या रेल्वेमार्गामुळे बीडसारखा मागास भाग देशाशी जोडला जाणार आहे. शिवाय पश्चिम व मध्य हिंदुस्थानातून दक्षिणेकडे जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

– वर्धा-यवतमाळ-नांदेड वर्धा-यवतमाळ-नांदेड हा विदर्भ व मराठवाडय़ाला नव्याने जोडणारा मार्ग असून शेतीमालाच्या वाहतुकीसाठी या मार्गाचे महत्त्व जास्त असणार आहे.

– मुदखेड-परभणी मार्गाचे दुहेरीकरण काम वेगात सुरू असून हे काम पुढील मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे.

– रेल्वे मंत्रालयाने लातूर येथे रेल्वे बोगी तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून तो तीन वर्षांत सुरू होईल.

मराठवाडय़ाच्या पदरात रेल्वेने खूप काही दिले आहे, परंतु अद्यापि खूप काही देणे बाकी आहे.

[email protected]