मोगल राजकन्येची लढाई

>> सुजित पाटकर

पाकिस्तानच्या निवडणुकीचे काय निकाल लागतील ते सांगता येत नाही; पण तुरुंगातल्या ‘राजकन्येकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. ती तुरुंगातून जनतेला आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहीत आहे. राजकीय कैद्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा नाकारून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली. तिची आई ‘कुलसुम’ लंडनच्या इस्तिपळात मृत्यूशी झुंज देत आहे व ‘बेटी’ बापासह तुरुंगातून लढाई करीत आहे. पाकिस्तानशी आपले जन्मजन्मांतरीचे वैर आहे. तरीही तुरुंगातील मोगल राजकन्येच्या पुढच्या पावलांकडे लक्ष ठेवायला हवे!

मोगलांचे राज्य हे विश्वासघाताचे राज्य होते. त्याच विश्वासघाताची अनेक थडगी आजही आपल्या दिल्लीत उभी आहेत. सत्तेसाठी मुलाने बापाला तुरुंगात टाकले. बापाने मुलांचे खून केले. आईला मारले. त्याच मोगली इतिहासाची पुनरावृत्ती ७० वर्षांपासून पाकिस्तानच्या भूमीत घडत आहे.

नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या तुरुंगात पुन्हा गेले. ही आता बातमी नसून त्यांची लाडकी कन्या मरियम हीसुद्धा तुरुंगात गेल्याच्या बातमीने खळबळ उडाली.

मरियम ही मोगल राजकन्येसारखी आहे, अशी टीका इमरान खान करीत असतो. आज हीच मोगल कन्या ऐन निवडणुकीत तुरुंगात असून ती उद्याची बेनझीर भुत्तो बनून तुरुंगातून बाहेर येईल व पाकिस्तानचे नेतृत्व करेल असे वातावरण पाकिस्तानात आहे.

मी अनेकदा ‘आखाता’त कामानिमित्त जातो. दुबईच्या भव्य ‘मॉल’मध्ये मोकळेपणाने फिरत असताना या मोगल राजकन्येचे एकदा ओझरते दर्शन झाले. शारजा विमानतळावर सुरक्षा तपासणीतून बाहेर पडतानाही ही राजकन्या पुन्हा एकदा दिसली. या दोन्ही वेळेस तिचे वडील पाकिस्तानचे सत्ताधीश होते.

वडील पाकिस्तानच्या राजकारणातील महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी सुरुवातीला तिची राजकारणात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. कॉन्व्हेंट शाळेतून शिक्षण घेऊन आलेली, उर्दू ही आपली मातृभाषा असूनही त्यावर फारसे प्रभुत्व नसलेली ही मुलगी पाकिस्तानलासुद्धा नेहमीच परकी वाटत होती. तिची डॉक्टर व्हायची इच्छा होती, परंतु किंग एडवर्ड मेडिकल कॉलेजमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश मिळवल्याच्या आरोपामुळे तिला डॉक्टरकीची पदवी मिळण्यापूर्वीच महाविद्यालयातून बेदखल व्हावे लागले. पुढे शिक्षण अर्धवट न सोडता तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पंजाब विद्यापीठातून पूर्ण केले. इंग्रजी साहित्यातून मास्टर्स ही पदवी संपादित करून राज्यशास्त्रातून पीएच.डी. केली, परंतु तिच्या या दोन्ही पदव्या लाहोर उच्च न्यायालयाने मान्य केल्या नव्हत्या. (पण पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे तिने आपल्या ‘मास्टर्स’ याच पदवीचा उल्लेख केलेला दिसून येतो.)

२०१२ साली मरियमने अधिकृतरीत्या राजकारणात प्रवेश केला. नवाझ शरीफ यांच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेल्या मरियमने आपल्या व्यक्तिगत जीवनशैलीत त्यानंतर अनेक बदल केले. राजकारणात येण्याचे निश्चित केल्यावर तिने उर्दूवर प्रभुत्व मिळवले.

नवाज शरीफ हे खानदानी श्रीमंत आहेत. पंजाब प्रांतातील ते सगळय़ात मोठे जमीनदार. त्यांची श्रीमंती फक्त पाकिस्तानपुरती मर्यादित नाही तर पाकिस्तानच्या सीमा ओलांडून तिने जग जिंकले आहे. ही श्रीमंती पाकिस्तानला लुबाडून निर्माण केल्याचा आरोप शरीफ खानदानावर केला जातो. पाकिस्तानची जनता नवाज शरीफ यांच्या परिवाराचा ‘चोर’, ‘लुटेरे’ म्हणूनच उल्लेख करते. शरीफ परिवाराविषयी ही कटुता व चिखलफेक मरियमच्या वाटय़ास आली, पण तिने ही लोकभावना काही प्रमाणात बदलून दाखवली.

मरियमप्रमाणेच बेनझीर भुत्तोंची कन्या बख्तावर हीदेखील राजकारणात उतरली आहे व तिचेही मातृभाषा ‘उर्दू’चे वांदेच आहेत. शरीफकन्या विरुद्ध बेनझीर कन्येची ही सरळ टक्कर आहे. बेनझीर भुत्तोने मुस्लिम स्त्र्ायांना अधिक स्वातंत्र्य, मोकळेपणाने श्वास घेण्याचा मार्ग दाखवला. चूल, मूल व बुरखा या शृंखला तोडण्याचे आवाहन केले व धर्मांध मुस्लिम मौलवी बेनझीरचे कायमचे दुश्मन झाले. मरियम बेनझीरच्या अवघड मार्गावरून निघाली आहे.

बदलत्या काळानुसार आपल्या वडिलांच्या पक्षातसुद्धा अनेक सुधारणा घडवून आणण्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे. पक्षाच्या पूर्वीच्या उजव्या विचारसरणीला डावलून त्यापेक्षा पक्षाची विचारसरणी अधिकाधिक उदारमतवादी आणि मध्यमार्गी (centrist) असावी याकडे त्यांचा कल दिसून येतो.

मरियम यांनी नवाझ शरीफ यांना जलसाला आपला पाठिंबा दर्शवीत पाकिस्तानातील लोकशाही मूल्यांचा कैवारी बनवले. नवाझ शरीफ आजवर अनेक हालअपेष्टा सोसलेल्या अल्पसंख्याकांना अहमदिस (आपले बांधव) म्हणून संबोधून स्वतःला इतरांच्या टीकेपासून वाचवण्यात यशस्वी ठरले.

दियात कायदा बनवणाऱया राजकीय पक्षानेच पुढे आपल्या कार्यकाळात कुटुंबातील कोणताही सदस्य कुटुंबातील व्यक्तीचा खून माफ करू शकत नाही अशी महत्त्वाची नोंद केली. शिया मुसलमानांबाबत पक्षपात करत असणारे नवाझ स्वतःच पुढे बंडखोर झाले आणि या सर्व प्रवासात मरियम त्यांच्या सतत सोबत होती.

मरियम सुंदर असूनही चतुर आहे. एखाद्या संकटाचे राजकीय भांडवल कसे करायचे ते तिला माहीत आहे. तिने तिला आवडलेल्या तरुणाशी प्रेमविवाह केला व त्याबद्दल तिला टीकेस सामोरे जावे लागले. तिला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. सामुदायिक बलात्काराच्या धमक्या आल्या. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. या सगळय़ा घटनांचा वापर मरियमने पुरेपूर केला. एका बंडखोर, स्वतंत्र बाण्याच्या स्त्र्ााrला कसे जगणे कठीण होत आहे ते तिने लोकांसमोर आणले. इम्रान खान हा स्वतःला पुरोगामी विचारांचा, स्त्र्ायांच्या हक्कांचा पुरस्कारकर्ता असल्याचा आभास निर्माण करतो; पण आपल्या बदनामी मोहिमेमागे इम्रान खानच आहे असे ती सांगत असते.

‘पनामा’ केस प्रकरणात नवाज शरीफ हे निवडणूक लढवण्यासाठी आयुष्यभर अपात्र ठरवले गेले. पुन्हा दहा वर्षांचा तुरुंगवास. हे सर्व आपल्या लालू यादवांप्रमाणेच घडले. राजकन्या मरियमलाही सात वर्षांची सजा ठोठावण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या निवडणुकीचे काय निकाल लागतील ते सांगता येत नाही; पण तुरुंगातल्या ‘शेरदिल’ राजकन्येकडे सगळय़ांचेच डोळे लागले आहेत. ती तुरुंगातून जनतेला आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहीत आहे. राजकीय कैद्यांना मिळणाऱया सर्व सुविधा नाकारून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली. तिची आई ‘कुलसुम’ लंडनच्या इस्तिपळात मृत्यूशी झुंज देत आहे व ‘बेटी’ बापासह तुरुंगातून लढाई करीत आहे.

आज ती राजकन्या कदाचित लोकांसाठी ‘नायक’ नसेल. तिच्या वाटय़ाला आज तिरस्कार आणि आरोप आहेत. तिला लंडनमधून पळूनही जाता आले असते व एखाद्या मुस्लिम अरब राष्ट्रांत, इतकेच काय युरोपात आश्रय घेता आला असता. पण ती पाकिस्तानात परत आली. अराजकाच्या आगडोंबात ती उतरली.

पाकिस्तानशी आपले जन्मजन्मांतरीचे वैर आहे. तरीही तुरुंगातील मोगल राजकन्येच्या पुढच्या पावलांकडे लक्ष ठेवायला हवे!

[email protected]
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आहेत.)