लेख : आभाळमाया : खरा-खोटा मंगळानुभव

9

>> वैश्विक 

आपला शेजारी असलेल्या मंगळ ग्रहाचा उद्या पर्यटन आणि कदाचित वास्तव्यासाठी उपयोग होईल या दुर्दम्य इच्छेपायी माणसाचं या ग्रहाबद्दलचं आकर्षण वाढतच चाललंय. एका बाजूला या ग्रहाची अधिकाधिक माहिती गोळा करणारं वैज्ञानिक संशोधन आणि दुसरीकडे खरा मंगळानुभव कसा असेल याची जाणीव करून देणारा कृत्रिम मंगळ सिम्युलेशनद्वारे तयार करणे.

पहिल्यांदा मंगळाबद्दलच्या एका वैज्ञानिक संशोधनाचा विचार करू. मंगळावर ‘पाथफाइंडर’सारखी अनेक ‘रोव्हर’ पाठवून त्याचं बाह्यस्वरूप आणि अंतरंग यांचा वेध घेण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. ‘इनसाइट’ हे यान मंगळपृष्ठावर त्याच हेतूने उतरलं आहे.

अमेरिकेतील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी ऊर्फ जेपीएल या संस्थेकडून ‘इनसाइट’ यानाच्या कार्यप्रणालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असतं. ‘इनसाइट’ला मंगळावर उतरून आता जवळ जवळ सहा महिने होतील. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाखाली चाललेल्या भूस्तरीय हालचालींचं सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर आधारित ठोस निष्कर्ष काढणे हा मुळात ‘इनसाइट’चा कार्यक्रम असून त्यात ते यशस्वी होताना दिसतंय. सुमारे पाच महिन्यांनी म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये ‘इनसाइट’ने ‘मंगळकंपा’ची नोंद केली. पृथ्वी सोडून आपल्या ग्रहमालेतल्या इतर कोणत्याही ग्रहावरच्या भूकंपाची ही पहिलीच झलक. यादृष्टीने ‘इनसाइट’चं हे यश खगोल विज्ञानातला ऐतिहासिक क्षण समजायला हवा.

याच मंगळपृष्ठाखाली ‘लिट्ल ग्रीन मेन’ म्हणजे अंगठय़ाएवढे प्राणी राहतात आणि ते पृथ्वीचा कब्जा घेतील अशी विज्ञानकथा एच. जी. वेल्स यांनी 1930 च्या दशकात लिहिली. ती अमेरिकन रेडिओवरून प्रसृत होऊ लागल्यावर ‘‘खरंच, असे कोणी ‘मंगळे’ पृथ्वीवर येतील की काय!’’ याचा धसका अनेक अमेरिकनांनी घेतला. अर्थातच तसं काहीच घडणार नव्हतं.

आता ‘इनसाइट’ या मंगळाचं ‘सिस्मॉलॉजिकल’ म्हणजे भूपरीक्षण करण्याचं दोन वर्षांचं काम सोपवलेल्या यानाने मंगळावर पृथ्वीप्रमाणेच भूकंप होतात असं सिद्ध केलंय. गेल्या 6 एप्रिल रोजी ‘इनसाइट’ मंगळावर उतरलं त्या घटनेचा 128 वा दिवस होता. हा दिवस यानाने करण्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने लक्षणीय ठरला. पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपाच्या तुलनेत 2.5 (अडीच) तीव्रतेचे ‘मंगळकंप’ यानाने नोंदले. ज्या ‘सिस्मॉलॉजिकल’ उपकरणाने (भूकंपशोधक) ही कंपनं नोंदली ते फ्रेंच शास्त्रज्ञांनी बनवलेलं आहे. या ‘सिस्मॉमीटर’ची क्षमता अशी आहे की, हायड्रोजनच्या अणूच्या अर्ध्या स्वरूपाची कंपनलहरसुद्धा ते चटकन ओळखतं. आतापर्यंत या उपकरणात ‘बॅकग्राऊंड लहरीं’ची नोंद होत होती, पण 6 एप्रिलला तो ‘नॉइज’ वजा करून खऱ्या मंगळकंपनाचा शोध लागला आणि पृथ्वीवरचे वैज्ञानिक आनंदले. या कंपनलहरी मंगळपृष्ठावरच्या वाऱ्याच्या किंवा उल्कापाताच्या प्रभावाने निर्माण झाल्या नसून मंगळपृष्ठाखालील सूक्ष्म हालचालींमधूनच निर्माण झाल्याचं निश्चित केल्यावर त्याविषयीची बातमी देण्यात आली. 14 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत ‘मंगळकंपा’चे सिग्नल मिळत होते. त्याची शहानिशा केल्यावरच हा निष्कर्ष काढण्यात आला.

लायगो (किंवा लिगो) प्रकल्पाद्वारे, गुरुत्वीय लहरींचा शोध लागल्यावर तो नीट तपासून वर्षभराने जाहीर करण्यात आला (2017) आणि कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) खरा फोटोसुद्धा असाच कालांतराने प्रसिद्ध केला गेला. महत्त्वाच्या वैज्ञानिक संशोधनात अशा प्रकारची काळजी घ्यावी लागते. सावधगिरी बाळगावी लागते. (‘सावधगिरी’ हा चांगला मराठी शब्द असताना ‘सतर्कता’ हा हिंदीवरून घेतलेला शब्द कशाला वापरायचा? ते असो), तर अशी सावधानता ठेवून सत्याच्या कसोटीवर उतरणारं संशोधन पुढच्या वैज्ञानिक प्रगतीमधला महत्त्वाचा टप्पा ठरतं.

आता मंगळाविषयीची थोडी गमतीची बातमी. मध्य चीनमधल्या ‘मोबी’ वाळवंटात एक मंगळानुभव देणारा कृत्रिम ‘सिम्युलेटर’ उभारण्यात आला आहे. तो मंगळावर पाठवल्या जाणाऱ्या अंराळवीरांसाठी किंवा संभाव्य प्रवाशांसाठी नसून लहान मुलांना मौजमजा करण्यासाठी आहे. या विज्ञानोद्यानातील हा ‘सिम्युलेटर’ उभारून चीनच्या पुढच्या पिढीला मंगळ ग्रहाविषयी जागरूक करण्याचं काम आपोआप होणार आहे.

बालपणापासूनच मुलांना वैज्ञानिक गोष्टींची जाणीव झाली तर ती पुढच्या जीवनात उपयोगी ठरते. विश्वाचा पसारा जाणून घेण्याचे प्रयत्न यशस्वी होत असताना आता आपलं ज्ञान केवळ भूगोलापुरतं मर्यादित न ठेवला ‘ख’गोलापर्यंत वाढवायला हवं. याची सुरुवात बालवयात हसत-खेळत विज्ञान अशा स्वरूपात झाली तर वैज्ञानिक गोष्टींबद्दलची अढी किंवा धास्ती पुढच्या पिढीत निर्माणच होणार नाही. सेल फोन आणि कॉम्प्युटरबाबत प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा अधिक ‘टेक्नोसॅव्ही’ कशी असते ते आपण रोजच पाहत असतो. वैज्ञानिक जाणिवा बालपणी जागृत झाल्या तर त्यातील काही गोष्टींचा फोलपणा, त्यामागचं अवास्तव वेड आणि दुरुपयोग यालाही आळा बसेल. त्यादृष्टीने चीनमधलं खोटा मंगळानुभव तिथल्या मुलांना बरंच काही शिकवून जाईल. चीनमधल्या सीस्पेस या कंपनीने बनवलेला हा कृत्रिम ‘मंगळ’ पुढच्या वर्षी पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल आणि जगभरच्या पर्यटकांना कृत्रिम का होईना, पण मंगळानुभव मिळेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या