ब्रिटिशांनी केलेला रावलापाणीचा नरसंहार


>> डॉ. कांतीलाल टाटिया

नंदुरबार जिल्हय़ातील रावलापाणी या आदिवासी पाड्यात २ मार्च १९४३ या दिवसाचा सूर्य ब्रिटिशांच्या अमानुष गोळीबारासह उगवला. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. नंदुरबार जिल्हय़ात ब्रिटिशांनी दोन वेळा गोळीबार केला. त्यातील एक गोळीबार बाल स्वातंत्र्यसैनिक शिरीषकुमार याने साथीदारांसह खांद्यावर तिरंगा घेऊन काढलेल्या मिरवणुकीवर झाला. त्याचे स्मृतिस्मारक नंदुरबारमध्ये आहे. दुसरी घटना जालियनवाला बागेची पुनरावृत्ती करणारी रावलापाणी येथील आहे. मात्र या घटनेची साधी नोंदही सरकारदरबारी नाही. भिल्ल समाजाचा हा उठाव चळवळीच्या रूपात येण्याअगोदरच चिरडला गेला.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदे तालुक्यातील अतिशय गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेले आदिवासी संत गुलाम महाराज यांनी १९४० च्या दशकात सामाजिक क्रांती घडविण्याचा प्रयत्न केला. पारतंत्र्याचा तो काळ. त्या वेळी भिल्ल समाजाची रचना अवघड होती. साक्षरता हा प्रकारच नव्हता. भिल्लेतर समाजाकडून भिल्लांना उच्चनीचतेची वागणूक मिळत होती. त्याची झळ स्वतः महाराजही सोसत होते. ही स्थिती बदलावी असे त्यांनी ठरवले. ‘आप’ या शब्दाची नव्याने योजना केली. आपणांस इतर समाजाकडून मानसन्मान हवा असेल तर प्रथम आपण एकमेकांना ‘मान’ दिला पाहिजे. यादृष्टीने एकमेकांना भेटल्यावर ‘आप की जय’ म्हणून संबोधत परस्परांचा जयजयकार करून आत्मसन्मानाची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नास त्यांनी प्रारंभ केला. खरे तर आदिवासींच्या इतिहासात याला ‘क्रांतिकारक’ पर्व म्हटले पाहिजे. आप म्हणजे सर्व जनता असे गुला महाराज प्रवचनांतून सांगत.

गुलाम महाराजांच्या उपक्रमांतर्गत आरतीचा प्रारंभ ११ फेब्रुवारी १९३७ पासून झाला. मात्र गुलाम महाराजांचे १९ जुलै १९३८ रोजी देहावसान झाल्यानंतर त्यांचे लहान बंधू रामदास महाराज यांनी आप समाजाची धुरा सांभाळली. २२ ऑगस्ट १९३८ रोजी झालेल्या आरतीपूजन कार्यक्रमास सवा लाखाचा जनसमुदाय उपस्थित असल्याची नोंद आहे. अर्थात, या चळवळीचे वृद्धिंगत रूप प्रस्थापितांना धडकी भरवणारे होते. संत रामदास महाराज समाजप्रबोधनासाठी गावोगाव प्रवास करत. त्यातून आदिवासींमध्ये निर्माण झालेली जागृती, संघटित होण्याची वृत्ती, आत्मसन्मानाची भावना हे सारे चळवळीस दृष्ट लागणारे ठरले. प्रस्थापित समाज बिथरला. असेच चालले तर आमच्या शेतावर राबायला मजूर मिळणार नाहीत. काम करणारा मजूर गुपचूप काम करणार नाही, प्रत्युत्तर देईल ही भीती त्यांना होती. गावे व्यसनमुक्त होत असल्याने दारूच्या अड्डेवाल्यांना त्यांच्या व्यवसायाची चिंता होती. शिवाय स्वातंत्र्य चळवळीच्या वातावरणात एवढ्या मोठ्या संख्येने भिल्लांसारख्या लढवय्या समाजाचे एकत्र येणे ब्रिटिश राजसत्तेला परवडणारे नव्हते.

पश्चिम खान्देशच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱयांनी आरतीवर कलम ४६(१) अन्वये १० जून १९४१ रोजी पहिली बंदी आणली. संत रामदास महाराज व अनुयायांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. २४ ऑक्टोबर रोजी जावली येथे खूप मोठी दंगल झाली. आप धर्मीयांवर अत्याचार झाले, जाळपोळ झाली. त्यानंतर पश्चिम खान्देशच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मोरवड येथे (रंजनपूर) १४४ कलम लावून पोलीस बंदोबस्तात आरतीवर सक्तीने बंदी आणली व नंतरच्या काळात संत रामदास महाराज वगैरे ३० अनुयायांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.

त्या काळात ‘चले जाव’ चळवळीचे धुमारे उमटतच होते. तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब ठकार यांनी आप चळवळीचे प्रमुख संत रामदास महाराज यांना हद्दपार असूनही सहभागी होण्यासाठी आवाहन केले. महाराजांनीही हद्दपारीची मुदत संपलेली नसताना ‘चले जाव’ चळवळीला आपल्या संघटन शक्तीतून मोठे बळ मिळावे या हेतूने या चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संकल्प केला. हद्दपारीची मुदत संपण्याअगोदर १८ फेब्रुवारी १९४३ रोजी महाराजांनी आपल्या हजारो अनुयायांसह खान्देशात पाऊल ठेवले. ४ मार्च १९४३ रोजी महाशिवरात्र होती. या दिवशी महाआरतीनंतर ‘चले जाव’ चळवळीत प्रत्यक्ष सहभाग होण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. ब्रिटिशांनी त्यांना मोरवडला पोहोचण्याआधीच बन (ता. तळोदे) येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निझरा नाल्याच्या पात्रात मुक्कामाला असताना घेरले. ती रात्र होती १ मार्च १९४३ ची. महाराज आणि त्यांच्या अनुयायांनी २ मार्च रोजी महाआरतीला मोरवड येथे पोहोचण्याच्या इराद्याने भल्या सकाळीच मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्यावर अमानुष गोळीबार केला. जालियनवाला बाग गोळीबाराच्या संतप्त स्मृती जाग्या व्हाव्यात असाच तो गोळीबार होता. फरक एवढाच होता की, अमृतसरचा गोळीबार करणारा कॅप्टन डायर होता, तर रावलापाणी येथे गोळीबार करणारा कॅप्टन ‘डय़ुमन’ होता. १५ नागरिक मेल्याची नोंद आहे. मात्र त्यांच्या नावांची माहिती नाही. गोळीबार एवढा अमानुष होता की, ७५ वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या खुणा आजही येथील दगडांवर स्पष्ट दिसतात. या खडकांवरील गोळीबाराच्या खुणा जपल्या जाव्यात व या स्वातंत्र्यसंग्रामाचे मोठे स्मारक व्हायला हवे. स्वातंत्र्य चळवळीतील एक संग्राम स्थळ एवढेच रावलापाणीचे महत्त्व नाही. हे स्थळ आदिवासींसाठी प्रेरक जसे आहे तसेच धार्मिकदेखील आहे. आरती कार्यक्रम सुरू करण्याचा दिवस म्हणून तो आजही साजरा होतो. या ठिकाणी वर्षभर भेट देणारे, आरती करणारे आपधर्मी व अभ्यासक येत असतात. म्हणूनच या स्थळाला धार्मिक, सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील शहीद भूमी असे त्रिवेणी महत्त्व आहे. राज्य शासनाने या संग्राम स्थळाचे उचित स्मारक करण्यासाठी दोन कोटी ५८ लाख एवढा निधी मंजूर केला असून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी २ मार्चला रावलापाणी संग्रमातील शहीद स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिक दरवर्षी एकत्र येतात.

[email protected]