नियमित वैद्यकीय तपासणी हवी!


>>डॉ. नेहा सेठ, जनरल फिजिशियन

नियमित व्यायाम, संतुलित आहार, आनंदी राहणं यासोबत आजीआजोबांसाठी नियमित वैद्यकीय चाचणी अत्यंत आवश्यक असते.

काही गोष्टी नियमित करणं केव्हाही चांगलं. उदा. व्यायाम, संतुलीत आहार… दिवसातून किमान एकदा तरी भरपूर हसणं… आणि नियमित वैद्यकीय तपासणी. आपल्या घरातील आजी आजोबांनी तर या सर्व गोष्टी अत्यंत नियमित करायलाच हव्यात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियमित वैद्यकीय तपासणी. आपल्या फॅमिली डॉक्टरच्या मदतीने किमान महिन्यातून एकदा तरी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे ठरते. रक्तदाब, रक्तातील साखर, बदललेल्या आहाराच्या सवयी, आहाराचा तक्ता, वजन, काही सर्वसाधारण चाचण्या… हे सर्व यामध्ये येते.

निवृत्तीनंतर स्वास्थ्य ठीकठाक ठेवायचं तर नियमित डॉक्टरांकडे जाणं, त्यांनी दिलेली औषधं नीट वेळेवर घेणं, औषधांच्या वेळा पाळणं, पथ्य पाळणं हे ओघाने आलंच… आजी आजोबांसाठी तर हे खूपच महत्त्वाचं! कारण प्रकृती कधीही बिघडू शकते. ती नियंत्रणात राहील यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या वैद्यकीय चाचण्याही वेळच्या वेळी करून घेतल्या पाहिजेत.

आजी आजोबांनी बीपीची गोळी दररोज एकदा घेतलीच पाहिजे. तरच ज्येष्ठ नागरीकांचा बीपी नॉर्मल राहातो. पण दररोज गोळी घेऊनही बीपीचा त्रास होऊ लागला तर तो का होतोय हे डॉक्टरांना कसं कळणार? त्यासाठी ते काही वैद्यकीय चाचण्याच सांगणार ना… म्हणून या चाचण्या करून घेणे महत्त्वाचे असते. मुख्य म्हणजे या चाचण्यांचा सर्वात मोठा फायदा असतो तो म्हणजे निदान. योग्य प्रकारचे निदान वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांतूनच होऊ शकते. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. आजारातून मुक्ती होते.

काही विकार २५ वर्षांपूर्वी कमी प्रमाणात होते, पण आता ते जास्त का दिसतात याचा शोध डॉक्टरांना घ्यायचा असतो तेव्हा ते चाचण्याच घेतात. मग त्यानुसार आहार घ्यायला, जीवनशैलीत आवश्यक तो बदल करायला सांगितले जाते. चाचण्यांमुळे रुग्णाचा मेडिकल रेकॉर्ड तयार होतो. त्यातून रुग्णाबाबतची आकडेवारी डॉक्टरांना मिळते. रुग्णाला आणखी कशा प्रकारचा त्रास आहे ते डॉक्टरांना त्या चाचण्यांद्वारे मिळालेल्या आकडेवारीत कळू शकते. त्यानुसार योग्य तो उपचार करणे त्यांना शक्य होते.

इंटरनेटमुळे अलीकडे रुग्ण खूप जागरूक झाले आहेत. त्यांना डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या गरजेच्या आहेत का ते लगेच कळू शकते. त्यामुळे डॉक्टर उगाच चाचण्या करायला सांगतात हा लोकांचा गैरसमज आहे.

चाचण्या का कराव्या?

> महिन्यातून एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरना भेटल्यामुळे आपल्या दैनंदिनीविषयी त्यांना व्यवस्थित माहिती देता येते.

> डॉक्टरनाही योग्य तो सल्ला देता येतो. औषध बदलण्याची गरज असल्यास बदलता येते.

> रक्तदाब, रक्तातील साखर याचे अचूक मोजमाप त्यांच्याकडे राहाते.

> आरोग्यविषयक सकारात्मक विचार ऐकल्याने मनाला उभारी मिळते.

> आरोग्य उत्तम राहिल्याने आत्मविश्वास येतो.

> व्यायाम आवडीने केला जातो.

> स्वतःच्या प्रकृतीचे तापमान आपल्याला बरोबर समजते.

वारंवार रक्ताच्या चाचण्या का?

आजघडीला वातावरण एवढे खराब झाले आहे की चांगल्या धडधाकट माणसालाही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. कारण रोगांचे स्वरूपही आता बदललेले आहे. त्यामुळे आताच्या रुग्णांवर अचूक उपचार करायचे तर अचूक निदान होणे गरजेचे असते. आजी आजोबांच्या स्वास्थ्यासाठी ते महत्त्वाचेच ठरते. त्यासाठी रक्ताच्या चाचण्या वारंवार कराव्या लागतात. कधी कधी सखोल उपचारासाठी तर कधी कधी डॉक्टरांच्या सखोल माहितीसाठी तसं करावं लागतं. रक्ताबाबतही तसंच आहे. काहीवेळा आधी घेतलेले रक्ताचे नमुने अपेक्षेप्रमाणे नसले तर पुन्हा रक्त तपासणी करावी लागते. काहीवेळा डॉक्टर चाचणी न करता उपचार करतात. पण तसे करावे का हे डॉक्टर ठरवू शकतो.

अशी करा तयारी

> तपासणीला जाण्यापूर्वी पॅथॉलॉजिस्ट व लॅबशी संपर्क साधायला हवा. काही तपासण्या उपाशीपोटी कराव्य़ा लागतात, तर काही चाचण्यांच्या आधी काहीतरी खाऊन जाणं गरजेचं असतं. ते पॅथोलॉजिस्टकडून जाणून घ्यायला हवं.

> फास्टिंग शुगर, लुपिड प्रोफाईल या चाचण्या शक्यतो उपाशीपोटी कराव्या लागतात. खाल्लेले असेल तर पोट रिकामं झाल्यानंतर  त्या केल्या जातात.

> आजी आजोबांनी आपला दैनंदिन आहार तसाच ठेवावा. कोणत्याही प्रकारचे व्यासन टाळावं आणि पूर्ण विश्वासाने व शांत मनाने वैद्यकीय तपासण्यांना सामोरं जायला हवं.