लेख : मानसीचा चित्रकार

190

>>दिलीप जोशी<<

[email protected]

सहल, प्रवास, हायकिंग, ट्रेकिंग यासाठी सध्याचे दिवस छान आहेत. मुंबईत सुखद थंडी आहे म्हणजे राज्याच्या नि देशाच्या इतर भागात तर चांगलाच गारठा असणार. या काळात वर्षअखेरीची सुट्टी साधून परदेशी स्थिरावलेली मित्रमंडळीही येतात. ‘स्थलांतरित’ पक्ष्यांसारखा त्यांचाही हाच सीझन असतो. मग गप्पागोष्टी, जुन्या आठवणींना उजाळा आणि पर्यटनाचे बेत ठरतात. आमच्या कॉलेजच्या काळात, खिशात खूप पैसे नसलेले आम्ही मित्र, बॅक-पॅक घेऊन डोंगरदऱ्यात, गड-किल्ल्यांवर भ्रमंतीला जायचो. कारवीच्या जंगलातून वाट काढत, घरून नेलेले दोन-तीन दिवस पुरतील असे पदार्थ संपवत भरपूर चाल व्हायची. स्वच्छ, शुद्ध हवाच प्रत्येक क्षण ताजातवाणा करायची. दऱ्या-डोंगरावरलं नैसर्गिक वैभव, कारवीचं रान, पत्थरांची आरास, खळाळते ओढे, कुठे औट घटकेची बोटिंग आणि गुहांमधलं वास्तव्य. मजा असायची. रात्री गाणी म्हणण्यात जायच्या आणि धुकं भरल्या पहाटेला रानातल्या पक्ष्यांचा कलरव डोंगरी पायवाटांवर घेऊन जायचा.

पंधरा-वीस जणांच्या जथ्यात एखाद्याकडेच कॅमेरा असायचा. तोही बहुधा क्लिक-थ्री सारखा किंवा फार तर इलेक्ट्रोथर्टीफाईव्ह. एका रोलमध्ये बारा, सोळा किंवा जास्तीत जास्त पस्तीस फोटो यायचे. तेही कृष्णधवल. जेमतेम बजेट जमवून एखाद-दोन रोल फोटो घेताना खूपच ‘रेशनिंग’ करावं लागायचं. व्यक्तींचे फोटो किती घ्यायचे आणि निसर्गासाठी किती फ्रेम ठेवायच्या यावर चर्चा व्हायची. कालांतराने रंगीत फिल्म सहज उपलब्ध झाल्यावर आणि थोडे प्रगत कॅमेरे हाती आल्यावर काढलेले रंगीत फोटोंचे अल्बम पुनःपुन्हा बघण्यातही मजा असायची. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचे ते फोटो आजही अल्बममध्ये  आहेत, पण बऱ्याच फोटोंचे रंग उडालेत. काही काळसर किंवा एकरंगी दिसायला लागलेत.

नंतर काळ बदलला-विलक्षण झपाटय़ाने बदलला. फिल्मरोल घालण्याचे कॅमेरे मागे पडून डिजिटल कॅमेरे आले. पूर्वी फोटो घेताना तो नीट आलाय की नाही याची शंका तो प्रिंट होईपर्यंत असायची. आता डिजिटल कॅमेऱ्यात शेकडो फोटो येतात. ते लगेच पाहता येतात. ‘सेल्फी’चं अतोनात वेड लागलेलेही अनेकजण आहेत. कोणताही ‘क्षण’ साठवणं आता अगदी सोप्पं झालं झालंय. जगभरात फोटोग्राफीची वेगळीच स्पर्धा लागलेली दिसते. इतकी की फोटो काढण्याच्या नादात अनेक सौंदर्यस्थळांचा एक भाग होऊन त्याचा आस्वाद घेणं हरवून जातंय.

याचा अर्थ फोटो काढू नयेत असा मुळीच नाही. कॅमेरा नावाचा ‘तिसरा डोळा’ असतोच त्यासाठी. अविस्मरणीय क्षण चिरंतन करण्याची ही सोय अद्वितीय आहे. जुन्या ब्लॅक ऍण्ड व्हाइट अल्बमपासूनचे फोटो चाळताना किती किती आठवणी जाग्या होतात. मनाला पुनः प्रत्ययाचा आनंद देतात. आपलंच दहा-वीस वर्षांपूर्वीचं रूप चकित करतं.

परंतु सेलफोनवरून क्षणाक्षणाला स्नॅप घेण्याबाबत एक पाहणी केल्यावर एका संस्थेच्या असं लक्षात आलं की, नवं काही पाहताना तनमनाने त्या ‘चित्रा’चा एक भाग होणंही महत्त्वाचं असतं. तसं झालं तरच नेमक्या कोणत्या गोष्टीचा ‘फोटो’ घ्यावा ते अचूक ठरवता येतं. फोनवर फोटो न काढता आधी ट्रीपचा आनंद घ्या असं सांगूनही अनेक पर्यटक या संस्थेकडे आले. अर्थात फोनवर फोटो घेतल्यावर काही बंदी नव्हती, पण डोळय़ांनी पाहा आणि मनात साठवा ही कल्पना अनेकांना आवडली.

मनामध्ये स्मरणशक्तीचा भाग असतोच. डोळे भरभरून पाहिलेल्या गोष्टी वर्षानुवर्षे मनात जशाच्या तशा ताज्या राहतात. त्यांचं केवळ स्मरण ते चित्र पुनःपुन्हा नजरेसमोर उभं करतं. आपण नकळत भूतकाळात, आठवणींच्या वाटेवर विहार करू लागतो. खूप वर्षांपूर्वीच्या आमच्या मागच्या पिढीच्या गप्पा आठवतात. त्यात ‘आठवतं का आपण तिथे गेलो होतो… तो संगमरवरी खडकातला जलप्रवास…’ ‘हो. आठवतं ना. नर्मदा नदीचं जबलपूरजवळचं भेडाघाटचं ते सौंदर्य आजही तसंच ताजं आहे.’ अशा किंवा अनेक प्रसंगांच्या कार्याच्या आठवणी चित्रित होऊन मनाच्या फ्रेममध्ये इतक्या घट्टा बसलेल्या असायच्या की ऐकणाऱ्या इतर श्रोत्यांनाही कल्पनेने ती घटना पाहिल्यासारखी वाटायची.

एखादा ध्यास घेऊन केलेली फोटोग्राफी एक वेगळंच विश्व प्रेक्षकांसमोर उलगडते. असे निष्णात फोटोग्राफर कालातीत कला निर्माण करतात हे खरंच. परंतु प्रत्येक गोष्ट मनाचे ‘डोळे’ बंद करून चित्रित करण्यापेक्षा फोटोग्राफी अर्थपूर्ण असावी… आणि काही गोष्टी स्मरणचित्रांवर सोडाव्या. हा ‘मानसीचा चित्रकार’ विविध क्षण मनाच्या कोषात कायमचे जपून ठेवतो. या साधनविरहित ‘चित्रपटा’चा आनंद डोळे मिटूनही घेता येतो. यंत्रयुगातील उपयुक्तता हवीच, पण त्याचा हव्यास आनंदापेक्षा आपल्याला यंत्रवत बनवतो. माणसासाठी यंत्र आहे, यंत्रासाठी माणूस नव्हे. निसर्गाने आपली जडणघडण अनेक वरदानं देऊन केली आहे. स्मरणचित्रं हा त्याचाच भाग… अर्थात कॅमेऱ्याने घेतलेल्या एका जुन्या फोटोवरूनही त्यावेळी न टिपलेल्या पण मनाने जपलेल्या घटनांचा पट उलगडतोच. प्रश्न फक्त तारतम्याचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या