गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत

605

>> अनंत दाभोळकर

सर्वस्व गमविलेल्या मुंबईतील गिरणी कामगारांना मोफत घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे सरकारने मान्य केले. आजच्या स्थितीला एक लाख 71 हजार गिरणी कामगार व वारसदारांनी घरांसाठी म्हाडाकडे रीतसर पुराव्यानिशी अर्ज केले आहेत. मात्र त्यापैकी 25 गिरण्यांच्या जमिनीवरच आणि फक्त नऊ हजार 559 घरे बांधण्यात आली आहेत. पुढील काळात बॉम्बे डाईंगच्या दोन गिरण्या, श्रीनिवास मिल, हिंदुस्थान मिल युनिट नं. 3, इंडिया युनायटेड मिल नं. 4, जाम मिल, मधुसूदन मिल, सीताराम मिळून गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडातर्फे पाच हजार 298 घरांचे बांधकाम होणार आहे. आजपर्यंत एमएमआरडीएच्या सुमारे दोन हजार 418 घरांचे वाटपच करण्यात आले आहे. एकंदरीत घरांच्या आकडेवारीचा विचार करता अर्ज केलेल्या एक लाख 71 हजार गिरणी कामगार व वारसदारांपैकी सुमारे 17 हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत असे दिसते, मग इतरांचे काय? गिरणी कामगार व वारसदारांना 17 हजार घरेच मिळणार असतील तर 90 टक्क्यांहून अधिक कामगार व वारसांना घरे केव्हा व कुठे मिळणार, हा मोठा प्रश्न गिरणी कामगारांसमोर आहे. गेल्या चार वर्षांत एकही नवीन घर बांधलेले नाही. ही सत्यस्थिती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व अर्जदार गिरणी कामगार व वारसांना पथदर्शक आराखडा (रोड मॅप) जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी काही केले नाही ही वस्तुस्थिती आहे. घर हा गिरणी कामगारांचा हक्क आहे. त्याची पूर्तता करावीच लागेल हे सर्वच नेते मान्य करतात. परंतु निर्णयाच्या घोषणा होतात, मात्र मार्ग काहीच निघत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या