सोलापूरची मराठमोळी Miss India – धनश्री गोडसे

92


>>नमिता वारणकर<<

सोलापुरातील पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसेंची कन्या. संपूर्ण हिंदुस्थानातील सौंदर्यवतींना मागे टाकत सौंदर्याच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली आहे.

धनश्री गोडसे…  महाराष्ट्र पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची मुलगी. एखाद्या पोलीस अधिकाऱयाची मुलगी मिस इंडिया झाल्याची ही पहिली वेळ आहे. सोलापूर जिह्यातील माढा तालुक्यातील फूट गावी राहणारी. स्वतःतील गुण आणि हुशारीच्या बळावर या मराठमोळ्या मुलीची तब्बल 6000 मुलींतून ‘मिस इंडिया’ या किताबासाठी निवड झाली आहे. सध्या ती सांगलीच्या भारती विद्यापीठात एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.

या स्पर्धेविषयी धनश्री सांगते, 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान जयपूर येथे झालेल्या रोजी इंडियन फॅशन फियास्टा आयोजित ‘मिस इंडिया 2019’ या स्पर्धेत मी सहभागी झाले. यावेळी उंची, शरीरयष्टी आणि बौद्धिक चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये हिंदुस्थानातून विविध राज्यांतून जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांमधून विविध राज्यातून निवडलेले अंतिम 27 स्पर्धक आले होते. मला ‘मिस इंडिया’ हा किताब जाहीर झाला. या यशाचे श्रेय मी माझे आई-वडील धन्यकुमार गोडसे आणि डॉ. राजश्री गोडसे यांना देईन. त्यांच्यामुळेच हे यश मिळवू शकले. व्यक्तीकडे असलेली कोणतीही आवड, मग ती छोटी असो की मोठी, ती योग्यरीत्या जोपासली तर कोणीही प्रगती करू शकतो.

धनश्रीचे वडील धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिह्यातील पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून काम करत होते. पोलीस निरीक्षक असल्याने दहावीपर्यंत वेगवेगळ्या 9 शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याचे धनश्री सांगते. तिला दहावीमध्ये 94 टक्के गुण मिळाले होते. ही स्पर्धा संपताच लखनौ ज्वेलर्स यांनी धनश्रीसोबत दागिन्यांच्या जाहिरातीचा पाच लाख रुपयांचा करार केला आहे. मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड व मिस इंटरनॅशनल अशा तीन वेगवेगळ्या स्पर्धांतून हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व ‘मिस इंडिया’ करत असतात. त्यामुळे या तीनही स्पर्धांसाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करायचं तिने ठरवलं आहे. त्यामुळे यावर्षी जून-जुलैमहिन्यात इंडोनेशियामध्ये होणाऱया मिस इंटरनॅशनल या स्पर्धेत ती हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करेल. अंतिम स्पर्धेत ‘शिक्षण हे तलवारीपेक्षा सामर्थ्यवान आहे.’ या तिच्या उत्तरामुळेच तिच्या डोक्यावर मिस इंडिया विजेतेपदाचा मुकुट विराजमान झाला.

अशी केली स्पर्धेची तयारी

मिस इंडिया स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचं विशिष्ट असं ट्रेनिंग घेतलं नाही, असं धनश्री सांगते. ती म्हणाली, यूटय़ुबवरील मिस इंडिया स्पर्धा पाहत होते. ते सराव केला. खरं तर मॉडेल्स 7 इंच उंचीच्या हील्स वापरतात. प्रत्यक्षात मी 5 इंच हील्सचे शूज वापरून सराव केला. याबरोबरच सामान्य ज्ञानावर भर दिला. त्याकरिता वेगवेगळी पुस्तकं वाचली, टीव्ही चॅनेल्स पाहायचे. माझे बाबा पोलीस निरीक्षक असल्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. त्यामुळे माझी शाळा, त्यानंतर महाविद्यालय बदलत राहायचे. पण त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. नवीन मित्र-मैत्रिणींकडून शिकायला मिळालं. याचा उपयोग  स्वतःचं व्यक्तिमत्त्व चारचौघांत उठून दिसण्यासाठी करता आला.

महत्त्वाकांक्षा

या स्पर्धेदरम्यान स्पर्धकाच्या सौंदर्यासह त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचे व्यक्तिमत्त्व, धाडस व कपडय़ांची निवड अशा सर्व गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार केला जातो. हे गुण वाढीस लागण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी प्रयत्न करत होते. याबरोबर सामान्य ज्ञानात वाढ होण्यासाठी मनन-चिंतनही आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंडोनेशियाची स्पर्धा पार पडल्यानंतर वैद्यकीय शाखेतील शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि या क्षेत्रात मिळालेल्या संधीचाही लाभ घ्यायचा आहे,  असे तिचे म्हणणे आहे.

मिस इंडिया स्पर्धेसाठी नोंदणी केल्यावर धनश्रीची फोनवरून मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर तिची या स्पर्धेसाठी निवड झाली. मग तिला 5-7 दिवस फिनालेसाठी बोलवण्यात येऊ लागले. त्यावेळी स्पर्धकांची जेवायला बसण्याची पद्धत, संभाषण करण्याची पद्धत, कोणता पोषाख परिधान केला आहे, ड्रेसिंग सेन्स कसा आहे, इत्यादी व्यक्तिमत्त्वाशी संबंधित बाबी तपासल्या जातात, अशी माहिती ती या स्पर्धेबाबत देते.

आपली प्रतिक्रिया द्या