आभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा

2

>>वैश्विक<<

[email protected]

चंद्र हा पृथ्वीचा अतिशय जवळचा नातेवाईक! त्याच्या नयनरम्य कला आणि पौर्णिमेचं टिपूर चांदणं त्याच्या लख्ख प्रकाशाची ग्वाही देत असताना हा अदृश्य चंद्र कुठला असा प्रश्न नक्कीच पडला असेल. मंडळी, चंद्रावरची पृथ्वीवर आणलेली माती जरी कुट्ट काळी असली तरी आपल्यासाठी चंद्र नेहमीच उजळता ठरलेला आहे. मग अदृश्य चंद्र हे काय प्रकरण? यासाठी चंद्राचं पृथ्वीभोवतीचं आणि स्वतःभोवतीचं भ्रमण समजून घ्यायाला हवं.

पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा तर चंद्राचा त्यानंतर सुमारे काही कोटी वर्षांनंतरचा. पृथ्वी अगदी बाल्यावस्थेत असताना साधारण मंगळासारखा एखाद्या ग्रहाने पृथ्वीला धडक दिली आणि त्यातून चंद्र अस्तित्वात आला. नंतरच्या काळात चंद्रावर सातत्याने कितीतरी अशनी आणि दगडगोटय़ांचा मारा होत राहिला. त्यामुळे चंद्रपृष्ठावर प्रचंड आकाराची तसेच छोटी छोटी विवरे निर्माण झाली. ही मोठी विवरे आणि त्यातील टेकडय़ाही आपल्या दुर्बिणीतून सहज दिसू शकतात.

सुरुवातीच्या काळातील महापाषाणांच्या माऱ्याने तयार झालेल्या खाचखळग्यांमध्ये चंद्रावरचा तप्त लाव्हारस भरला गेला. चंद्रपृष्ठावर त्याचेच काळे खडक सर्वत्र दिसून येता. चांद्रपृष्ठावर उतरता येतं हे 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी सिद्ध केलंच आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळपास एक चतुर्थांश आकाराचा गोळा आहे. त्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या फक्त 27 टक्के इतकाच आहे. चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या तुलनेत 1.23 टक्के एवढेच भरत असले तरी न्यूटनच्या तिसऱ्या सिद्धांतानुसार चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवर तितकाच प्रभाव पडतो. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणण्यापेक्षा पृथ्वी आणि चंद्र त्यांच्या ‘सेंटर ऑफ मास’च्या किंवा गुरुत्वीय मध्याच्या भोवती फिरतात. आता पृथ्वी चंद्रापेक्षा खूपच मोठी असल्याने चंद्र-पृथ्वीचे ‘सेंटर ऑफ मास’ हे पृथ्वीच्या गाभ्याजवळ आहे.

चंद्राचे वारंवार निरीक्षण केल्यावर आपल्याला एक गोष्ट आढळते ती म्हणजे चंद्राच्या एकाच भागाचे आपल्याला दर्शन होते. चंद्रकलांचे निरीक्षण करताना, चंद्रावरचा अंधार व प्रकाश यांच्या सीमारेषेवरील पर्वत वार दऱ्यांचे सातत्याने निरीक्षण केले तर असे दिसते की, पूर्वी पाहिलेला चांद्रपृष्ठाचा भाग आपण पाहत आहोत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चंद्र एकच बाजू सातत्याने पृथ्वीवासीयांना दाखवतो. हे कसं घडतं? तो निसर्गाचा एक ‘चमत्कारच’ म्हणावा लागेल. याचं कारण असं की, चंद्र ज्या वेगाने स्वतःच्या अक्षाभोवती फिरतो (रोटेशन) त्याच वेगाने तो पृथ्वीभोवतीही फिरतो (रेव्हेल्युशन).

चंद्र पृथ्वीभोवती 27.52 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. मात्र त्याला स्वतःभोवती एक गिरकी घ्यायला सुमारे तेवढाच काळ लागतो. त्यामुळे चंद्राचा महिना आणि दिवस साधारण सारखाच होतो. परिणामी आपण पृथ्वीवरून चंद्राकडे पाहत असताना आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते. दुसरी बाजू काळी किंवा काळोखी मात्र नाही. तेथेही सूर्यप्रकाश पडतोच, पण तो आपल्याला कधीच दिसत नाही. त्यामुळे चंद्राच्या या न दिसणाऱ्या अर्ध्या भागाला चंद्राचा दूरस्थ भाग म्हटलं जातं. चंद्राचे सायडेरियल ऑर्बिट म्हणजे त्याला पृथ्वीभोवती फिरायला लागणारा काळ आणि सायनॉडिक ऑर्बिट म्हणजे अमावस्या ते अमावस्या अशा चंद्राकलांचा काळ. हा 20.53 दिवसांचा असतो. त्यामुळे चंद्रावरचा दिवस त्याच्या महिन्यापेक्षा मोठा आहे.

चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्याच्यावरही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असतोच. चंद्र-पृथ्वी ही संपूर्ण ‘सिस्टीम’ सूर्याभोवती फिरते. यातील किचकट वाटणाऱ्या गणिती भागात न जाता एवढं म्हणता येईल की, चंद्राचा एक भाग आपल्याला दिसतो आणि आपण जास्तीत जास्त 59 टक्के चांद्रपृष्ठाचं दर्शन घेऊ शकतो.

मात्र जे पृथ्वीवरून दुर्बिणीतून शक्य नाही ते एखाद्या अवकाशयानाला दिसू शकतं. तीच कामगिरी चीनच्या चॅन्ग-4 या महत्त्वाकांक्षी यानाने केली आहे. चीनचे हे यान नुकतेच चंद्राच्या आपल्याला अदृश्य असलेल्या भागावरील वाँकरमन या प्रचंड विवरात उतरले. तेथून त्याने आसपासची आणि उतरताना अवकाशातून घेतलेली विविध छायाचित्रे पाहिली की, वैज्ञानिकांना चंद्राच्या एरवी न दिसणाऱ्या भागाचे सूक्ष्म निरीक्षण करता येईल. तसे निरीक्षण चंद्राभोवती फिरणाऱ्या यानांनी केलेच आहे, परंतु चंद्राच्या दूरस्थ भागात ठाण मांडून तेथील दगड – माती, असलेच तर पाणी आणि अन्य खनिजांचा खजिना चॅन्ग-4 शोधणार आहे. आपल्या परसदारातला चंद्र आतापर्यंत त्याचा अर्धाच चेहरा आपल्याला दाखवत होता. आता आपण ‘पूर्णचंद्रा’ची छायाचित्रे घेऊ शकतो.