चिमणीच्या मनात काय सुरू आहे

8

अलीकडे यूटय़ुबवर एका चिमुरडय़ा मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तीन साडेतीन वर्षांची ही मुलगी आपल्या आईशी अक्षरशः कचाकचा भांडतेयतिच्या इवल्याशा मेंदूला न झेपणारे शब्द सहज वापरतेयअर्थात हा व्हिडीओ आपण कौतुक म्हणून घेऊच शकत नाहीपण इतक्या छोटय़ा मुलामुलींना अशा पद्धतीने आईशी का भांडावेसे वाटत असेलएवढे त्यांच्या मनाविरुद्ध काय घडते की आपल्या अत्यंत आवडत्या मॉमशी ही निरागस बाळं अचानक मोठय़ा माणसांसारखं भांडायला लागतात

 संस्कारांचे प्रतिबिंब – शिल्पा कुऱहाडे (समुपदेशक)

shilpa-kurhade

पालकांच्या सवयी आणि संस्कारांचे प्रतिबिंब मुलांमध्ये दिसत असतात. त्यामुळे पालकांची वागणूक चांगली असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम मुलांवर दिसतात. बऱ्याचदा मुलं ही मोठय़ा माणसांचे निरीक्षण करत असतात. त्यातून ती शिकत असतात. लहान मुलांना चूक की बरोबर ते कळत नाही. त्यांची पाटी कोरी असते. त्यावर काय लिहायचे हे पालकांनी ठरवायचे असते. मुलांनी केलेली एखादी चूक पाहून पालकांना गंमत वाटते आणि ते त्यांना तीच चूक पुन्हा गंमत म्हणून सगळ्यांसमोर करायला लावतात. सगळ्यांना मजा वाटते. पण यामुळे मुलांची मानसिकता हळूहळू बदलते आणि मग ते पुनः पुन्हा तसेच करतात आणि हाताबाहेर परिस्थिती गेली की मग ओरडायचे, मारायचे आणि मुलांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करायचा. पण तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे वेळीच त्यांच्या चुका त्यांना समजावून, प्रेमाने दाखवून द्या. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करा, पण त्यांचे सगळेच हट्ट पुरवू नये किंवा त्यांना उगाच प्रलोभने दाखवू नयेत. गरज असेल तीच वस्तू त्यांच्या हातात द्यावी. मुलांसमोर भांडणे करू नयेत. त्यांच्यासमोर नेहमी सकारात्मक वागावे. शेवटी मुलांच्या कोणत्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे आणि कोणत्या नाही हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहे.

प्रेरणादायी कथा सांगते – दीप्ती बापट (ठाणे)

dipti-bapat

माझी मुलगी आर्या ही पाच वर्षांची आहे. एकुलती एक असल्यामुळे सगळ्यांचीच ती लाडकी आहे. जे हवे ते तिला दिले जाते. त्यामुळे थोडी हट्टीही आहे. पण प्रेमाने समजावल्यावर लगेच ती ऐकते. एक आई म्हणून तिला चांगल्या सवयी लावण्याचा माझा अट्टहास असतो. लहान मुले सगळ्या गोष्टींचे अनुकरण करत असतात. म्हणून आई-वडील म्हणून आम्ही शक्यतो तिच्यासमोर सकारात्मक असेच बोलतो. जसे तू खूप हुशार आहेस, तिने चित्र काढले तर खूप छान काढलस असे कौतुक करतो. आई म्हणून माझ्याकडून काही चूक झाली तर लगेच सॉरी हा बाळ, माझ्याकडून चूक झाली अशी चूक मान्य करते. मग आर्या चुकल्यावर तीही सॉरी बोलून चूक मान्य करते. आर्याच्या शाळेतून दर शुक्रवारी गोष्टीचे पुस्तक दिले जाते. तिला मी आवर्जून गोष्ट सांगते. त्याचे तात्पर्य सांगते. मुलं गोष्टींमध्ये रमतात. शिवाय आर्याच्या वर्तणुकीचा शिक्षकांकडून पाठपुरावा करून घेते. आ़र्याने हट्ट केला तर पहिलं तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतो, मुलांना मारून ती कोडगी होतात.

आई म्हणजे मैत्रीणच – अश्विनी दराडे (कांदिवली)

ashwini-darade

माझा मुलगा वियान पाच वर्षांचा आहे. हसरा, खोडकर मनमिळावू आहे. घरात सगळ्यांचा लाडोबा आहे. पण त्यामुळे हट्टीही तेवढाच आहे. पण आमचा प्रयत्न असतो त्याला चांगल्या गोष्टी शिकविण्याचा. घरात आम्ही मालिका, चित्रपट त्याच्यासमोर पाहणं शक्यतो टाळतोच, तो असताना डिस्कव्हरी, हिस्ट्रीसारखे चॅनल लावतो, यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडते. शिवाय इतिहास, प्राणी, पक्षी याच्यामध्ये रुची निर्माण होते. वियानला शाळेत सोडायला गेल्यानंतर अधूनमधून शिक्षकांची भेट घेऊन त्याच्या अभ्यासातल्या प्रगतीची माहिती घेते. शूरकथा त्याला सांगत असते. चांगल्या सवयी त्याला लावण्याचा माझा प्रयत्न असतो. अनेकदा तो चिडचिड करायला लागला की त्याच्यासोबत त्याची मैत्रीण होऊन त्याचे आवडते खेळ खेळते. त्यामुळे माझ्यावरचा राग तो विसरतो. आईपेक्षा मी त्याची मैत्रीण होते तेव्हा त्याला आवडते. तो चुकला की त्याला ओरडते, पण नंतर प्रेमाने कुशीत घेऊन समजावते. तंत्रज्ञानाचे फायदे आहेत तसे तोटेही. पण मुलांना त्यातले काय द्यायचे हे पालकांवर अवलंबून असते.