मुंबई आणि ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ची गरज

>>राजन वसंत देसाई<<

मुंबईचा श्वास चेंगराचेंगरीत गुदमरतोय. एल्फिन्स्टनची घटना केवळ निमित्तमात्र आहे. माणसाची संवेदना संपत चालली आहे. घटना घडल्यावर काही अंतरातच सामान्य जीवन त्या पुलावरून चालू झाले. ज्या पायऱ्यांवर मानवी देह आणि रक्ताचा सडा पडला होता तो दूर सारून त्यावर फुले वाहिली गेली. पुन्हा ये रे माझ्या मागल्या! खरोखरीच मुंबईसाठी काही करायचे असेल तर मुंबईच्या हृदयाची धडधड ओळखायला हवी. कॅन्सरसारख्या वाढणाऱ्या लोंढय़ांना आवरायला हवे. रस्त्यावरची अतिक्रमणे, फेरीवाले हटवावेत. मुंबईचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करायलाच हवे.

एखादी इमारत कोसळली की स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर येतो. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ हा शब्द एखाद्या वास्तूपुरता मर्यादित असला किंवा असावा, तरी कालपरत्वे यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. २९ सप्टेंबरला झालेल्या एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर किंवा काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये शंभर वर्षे जुनी इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यावर काही प्रश्न अत्यंत गंभीरपणे पुन्हा चव्हाटय़ावर आले आहेत. मुंबई शहरात वेळोवेळी पावसात पाणी तुंबणे, इमारती कोसळणे, चेंगराचेंगरी, पुलांची, रस्त्यांची दैन्यावस्था का झाली आहे? त्या अनुषंगाने भविष्यात येणाऱ्या संकटांचा आताच विचार केला नाही तर मुंबईतले मानवी व एकंदरीत सामाजिक जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी मुंबईची भौगोलिक रचना, त्यात झालेले बदल तसेच मुंबई शहराची प्रत्यक्ष क्षमता, त्यात वातावरणात व भूगर्भात होणारे बदल याचाही अभ्यास व त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मुंबई ही जवळजवळ सात बेटे जोडून झालेली वसाहत आहे. थोडक्यात, सात तुकडे जोडून बनवलेली एक गोधडी आहे. जसजशी वसाहत वाढू लागली तशी भूपृष्ठ भागाची किंवा जमिनीची गरज वाढू लागली. यात नैसर्गिक सखल भाग, डोंगराळ भाग व टेकडय़ा अजूनही आहेत. त्यात समुद्रात भर टाकून रेक्लमेशन्स निर्माण करण्यात आली. समुद्र हटवण्याचे कार्य वास्तुरचनाकारांनी काळाजी गरज म्हणून केले असले तरी वर म्हटल्याप्रमाणे या सात तुकडय़ांतील एक जरी टाका उसवला गेला तर काय हाहाकार उडेल त्याची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. भूगर्भात होणारे बदल व निसर्गाचे असंतुलन (ग्लोबल वॉर्मिंग) हे प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहेत. मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा स्फोटक आलेख विचारात घेतला तर गेल्या पन्नास वर्षांतील जन्म आणि मृत्यू दर, मुंबईत येणाऱ्या लोकसंख्येकडून निर्माण झालेला दर हा अत्यंत भयानक आहे. पन्नास वर्षांपूर्वी मुंबईची लोकसंख्या काही लाखांत होती. ती आता सवा ते दीड कोटीच्या आसपास पोचली आहे. मुंबईची व्याप्ती दहिसर-मुलुंडपर्यंत आहे. नंतरचा जो पट्टा आहे तो नवी मुंबई, वसई, विरार, ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या शहरांना जोडला गेलेला आहे. मुंबईमध्ये कोणीही यावे, आपला उदरनिर्वाह करावा यावर दुमत नाही; पण आरोग्य, पाणीपुरवठा, गृहनिर्माण, रस्ते, वीज, वाहन व्यवस्था, मलनिःसारण, कचरा निर्मूलन याची व्यवस्था काय?

या सात तुकडय़ांच्या गोधडीवर आता अतिरिक्त भार होत आहे. कधीतरी जीर्ण होऊन ताण सहन न झाल्याने टाके उसवणारच. एखादी इमारत कोसळली किंवा वाहनांचे अपघात झाले की तेवढय़ापुरते आकांडतांडव होते. राजकीय अर्थ लावले जातात, कोणाची पोळी भाजली जाते तर कोणाचा बळी जातो. मरणारा जातो, पण त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. दिलेल्या तुटपुंज्या सरकारी मदतीमुळे झालेली पोकळी कधीच भरून येत नाही. मनातल्या जखमा कायम राहतात. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ उक्तीप्रमाणे उरलेले उठून उभे राहतात. कारण प्रत्येकाच्या पाठीवर संसाराचे रहाटगाडगे असते. जगणाऱ्याला मरणयातना भोगत जगावेच लागते; कारण आपला मृत्यू येईपर्यंत वाट पाहावीच लागते. रोज सकाळी उठून पन्नास लाख चाकरमानी लोंबकळत मुंबईकडे धाव घेत असतात. तेवढेच संध्याकाळी वारा, ऊन-पाऊस याची तमा न बाळगता लोंबकळत घरी परततात. हे भीषण सत्य सर्वांनाच अंतर्मुख करणारे आहे. आता मोकळा श्वास घेण्याची जागा उरली नाही. भूगर्भातून मेट्रो धावतील. हादरे बसवीत पोटातून मार्गिका निर्माण होतील. ही व्यवस्था अपुरी पडल्यावर मोनोरेल होतील, पण नैसर्गिक भूरचनेचे काय याचा कधीतरी विचार केला आहे काय? गगनचुंबी इमारती, त्यात पाच-पाच मजली कार पार्किंग… पुढे काय? मुंबईत वाहने किती वेगाने वाहत असतात? सदासर्वकाळ ट्रफिक जाम. वाहनांचा गोंगाट. पर्यायाने ध्वनिप्रदूषण. रस्त्यांची डागडुजी करायला क्षणभर उसंत नसते. मुंबई कधीच झोपत नाही ही अभिमानाने नाही, तर दुःखाने सांगण्याची वेळ आलेली आहे. माणसाला रात्रीची झोप जर काबाडकष्ट करूनही मिळणार नसेल तर रोजीरोटीचा काय फायदा?

रोज नवीन कायदे, नवीन विचार, पण कागदावरच. शेजारच्या राष्ट्रांतून भुकेकंगाल नागरिकांचे लोंढे आले की त्याला धार्मिक स्वरूप दिले जाते. कायदा नेमका कशासाठी आणि कुणासाठी आहे हेच कळेनासे झाले आहे. ९० टक्के जनता वैफल्यग्रस्त आहे. सीमेवर सैनिकांची आणि अंतर्गत सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांची बेअब्रू केली जात आहे. गर्दीत एखादा पडला तर त्याच्या छाती-पोटावर जनता पाय देऊन त्याला तुडवत जाते, पण लोकप्रतिधी शरीररक्षकांच्या गराडय़ात फिरत असतात. अनधिकृत बांधकाम, बेकायदा फेरीवाले यावर कुणाचेच नियंत्रण नाही. हे सारे शंभर रोग एका गोष्टीमुळे निर्माण झालेले आहेत, ती म्हणजे बेकायदा वाढत्या लोकसंख्येचे लोंढे. खोटा मानवतावाद. त्यामुळे मुंबई शहराच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न जटील होत आहे. म्हणून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ या शब्दाचा अर्थ व्यापक दृष्टीने घ्यावा.

गोधडीचा टाका उसवणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही. मुंबईचा श्वास चेंगराचेंगरीत गुदमरतोय. एल्फिन्स्टनची घटना केवळ निमित्तमात्र आहे. माणसाची संवेदना संपत चालली आहे. घटना घडल्यावर काही मिनिटे, तासाच्या अंतरातच सामान्य जीवन त्या पुलावरून हताशपणे चालू झाले. ज्या पायऱ्यांवर मानवी देह आणि रक्ताचा सडा पडला होता तो दूर सारून त्यावर फुले वाहिली गेली, मेणबत्त्या पेटवल्या गेल्या. मीडियाने काहींचे हुंदके कव्हर केले, सर्वांनी एकमेकांवर शिव्या घातल्या. पुन्हा ये रे माझ्या मागल्या! मुंबईकरांचे स्पिरीट लगेच उठून राहणे ही नेहमीचीच बाब झाली आहे. आता मुंबईकराने सगळय़ाच गोष्टींची सवय करून घेतली आहे. कुणालाच त्याची खंत नाही. वास्तवाचे भान आणि खरोखरीच मुंबईसाठी काही करायचे असेल तर मुंबईच्या हृदयाची धडधड ओळखायला हवी. कॅन्सरसारख्या वाढणाऱ्या लोकसंख्येला (लोंढय़ांना) आवरायला हवे. रस्त्यावरची अतिक्रमणे, फेरीवाले हटवावेत. मुंबईचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करायलाच हवे.