मुस्लिम खाटीक बांधवांसाठीही घटनादुरुस्ती करावी

सादिक पापामियां खाटीक >  [email protected]

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही समाज घटकांना अनुसूचित जातीची सवलत मिळावी म्हणून घटनादुरुस्ती करून पूर्वीचीच अनुसूचित जातीची सवलत पुढेही कायम दिली जाते. मग पूर्वाश्रमीच्या खाटीक असलेल्या धर्मांतरित कसाई, कसाब यांच्यासाठी घटनादुरुस्ती करून हिंदू खाटीक बांधवांना दिली जाणारी अनुसूचित जातीची सवलत या मुस्लिम खाटीक, कसाई, कसाब, कुरेश या बांधवांना का दिली जात नाही?  याकडे न्यायोचित भूमिकेने पाहणे गरजेचे आहे… बीड येथे आज होणाऱ्या मुस्लिम खाटीक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्व्यानिमित्त या आणि इतर समस्यांचा मागोवा घेणारा हा लेख…

मुस्लीम खाटीक बांधवांच्या जिव्हाळय़ाच्या आणि महत्त्वाच्या काही मागण्या पुढीलप्रमाणे आहेत-

> जोपर्यंत मुस्लिम खाटीक बांधवांसाठी अनुसूचित जातींचे आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत मुस्लिम खाटीक बांधवांसाठी स्पेशल बॅकवर्ड म्हणून ४ टक्के आरक्षणाची तरतूद महाराष्ट्र सरकारने करावी.

> मुस्लिम खाटीक मुलामुलींच्या शिक्षणासाठी विशेष सवलती सुरू कराव्यात.

> मटन विक्रीच्या व्यवसायासाठी सहज लायसन्स मिळेल असे राज्यभरात एकच धोरण आखले जावे. राज्यातल्या सर्व बाजार समित्यांत बोकड व लहान जनावरे खरेदीसाठी राज्यभरात एकच लायसन्स असावे. प्रत्येक बाजार समितीत वेगळे लायसन्स, वेगळी फी याऐवजी एकसारखी रक्कम वर्षातून एकदाच एकाच ठिकाणी भरून घेतली जावी आणि त्याचा उपयोग राज्यभर व्हावा.

> गुडस् कॅरियर म्हणून जनावर वाहतुकीसाठी ऍपे, जीप, ट्रक्स व अन्य वाहनांचा परवाना तसेच जनावर वाहतुकीसाठी जनावरांची संख्या, वजन आणि वाहनांना एक विशिष्ट रंग सर्वत्र मान्य करण्यात यावा.

> राज्यभरात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना मटन मार्केटच्या ऐवजी शहरात व उपनगरात ठरावीक अंतराने विखरून मटन विक्रीचे गाळे उभे करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान द्यावे. ५० वर्षांहून अधिक जुन्या मटन मार्केटच्या जागी अत्याधुनिक नवीन मटन मार्केट बांधावेत.

> बाजारामध्ये होणाऱ्या चोऱ्या आणि विक्रीनंतर खाटकांकडील जनावरे काढून घेण्याच्या प्रकाराला पायबंद येण्यासाठी मार्केट कमिटीने शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या प्रत्येक जनावराची निःशुल्क आणि सक्तीने नोंदणी करावी.

> जनावर खरेदीचा हंगाम आणि दरवाढ लक्षात घेऊन जनावरे महाग होण्याच्या काळात शासनाने प्रत्येक खाटीक परवानाधारकाला वर्षात किमात १०० लहान जनावरे अल्प दरात उपलब्ध करून द्यावीत.

> खाटीक व्यवसायासाठी किमान दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनाजामीन, विनातारण, अत्यल्प व्याजदराने दीर्घ मुदतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना भाग पाडले जावे.

> खाटीक बांधवांना सध्या दिले जाणारे कसाई, कसाब, खाटीक या ओबीसी प्रवर्गातले दाखले देताना पूर्वी दाखला मिळविलेल्या कोणत्याही  खाटीक बांधवाने शपथपत्रावर संबंधित व्यक्ती खाटीक, कसाई, कसाब असल्याचे सांगितल्यास संबंधितांना तो दाखला त्वरित दिला जावा. याच प्रमाणाच्या आधारावर व्हॅलिडेटीही (जातपडताळणी) केली जावी, दिली जावी.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुस्लिम खाटीक समाजाला व इतर मुस्लिम मागासांना अनुसूचित जातीची सवलत मिळत होती. इंग्रजांनी ३० एप्रिल १९३६ रोजी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले होते की, हिंदुस्थानातील ख्रिश्चन आणि बंगालचे बौद्ध यांना सोडून इतर मुस्लिम मागासांना अनुसूचित जातीच्या सवलती देण्यात येतील. तशा सुमारे १४ वर्षे मुस्लीम खाटीक बांधवांसह इतर मुस्लिम मागासांना अनुसूचित जातीच्या सवलती प्राप्तही झाल्या होत्या. मात्र स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये अध्यादेश निघाला आणि अनुसूचित जातीच्या सवलती मिळविण्यासाठी हिंदू मागास असणे अनिवार्य केले गेले आणि मागास मुस्लिमांवर अन्याय झाला. मुस्लिम समाज हा मुळातच अल्पशिक्षित राहिल्याने आपल्या हक्काविषयी जागृत नव्हता. त्याचा परिणाम ६७ वर्षे खाटीक म्हणून हिंदू खाटीक बांधव अनुसूचित जातीच्या सवलती घेतो. मात्र तेच काम करणारा मुस्लिम खाटीक ओबीसीच्या विशाल प्रवर्गात ढकलला गेला आहे, जिथे त्याला हक्काने काही मिळणे फारच मुश्कील झाले आहे. एकाच कर्मासाठी, एकाच व्यवसायातील दोन वेगवेगळय़ा धर्माच्या समाजांना दोन वेगवेगळे निकष लावणे चुकीचे आहे. सर्व समाजाची जी भावना हिंदू खाटीक यांच्या बाबतीत आहे तीच मुस्लिम खाटीक यांच्या बाबतही आहे.

आम्ही पाठपुरावा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) यांना या समाजाच्या हालअपेष्टा आणि आजच्या प्रश्नांची जाणीव करून दिली आहे. गेली ११ वर्षे महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील लोकप्रतिनिधींना अर्ज, विनंत्या, निवेदने याद्वारे आमच्या प्रश्नात लक्ष घालण्याची आणि घटनादुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करण्याची  विनंती केली आहे. मात्र याबाबतीत आम्हाला निराशाच हाती आली आहे.

हा विषय घटनादुरुस्तीशी संबंधित आहे. यापूर्वी शीख आणि नवबौद्ध यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी घटनादुरुस्ती झाली आणि नंतर अनुसूचित जमातीच्या सवलती निधर्मी बनविण्यासाठी घटनादुरुस्ती झाली. मात्र मुस्लिम खाटीक व इतर मुस्लिम मागास यांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासाठी हालचाल झालेली नाही.

आमच्या मागच्या पिढय़ा कोण होत्या याचा शोध आम्ही घेत आहोत. आम्ही का वेगळे झालो हे सर्वज्ञात आहे. मात्र आम्ही आमचे कार्य सोडलेले नाही. माळी हा बागवान झाला, नाभिकाचा हजाम झाला, चांभार मोची झाला, परीट धोबी बनला. याच न्यायाने ज्यांनी ज्यांनी धर्म बदलला त्यांची पूर्वीची जातच दुसऱ्या धर्मातील त्यांची ओळख बनली. विविध आयोग, समिती, संशोधन कमिटय़ांनी आपल्या संशोधनातून हे पुढेही आणले आहे. खाटिकाचाच कसाई झाल्याचे त्यांनीच ठासून सांगितले आहे. शीख, नवबौद्ध झाल्यानंतर अनुसूचित जातीची सवलत मिळावी म्हणून घटनादुरुस्ती करून पूर्वीचीच एससीची सवलत पुढेही कायम दिली जाते. मग पूर्वाश्रमीच्या खाटीक असलेल्या धर्मांतरित कसाई, कसाब यांच्यासाठी घटनादुरुस्ती करून हिंदू खाटीक बांधवांना दिली जाणारी अनुसूचित जातीची सवलत या मुस्लिम खाटीक, कसाई, कसाब, कुरेश या बांधवांना का दिली जात नाही  याकडे न्यायोचित भूमिकेने पाहणे गरजेचे आहे.

शेकडो मुस्लिम खाटीक बांधवांत ‘खाटीक’ आडनाव आजही सापडून येते. मात्र हिंदू खाटीक बांधवांत ‘खाटीक’ आडनाव शोधूनही सापडणार नाही. मुस्लिम खाटीक बांधवांसाठीचे वेगळे कब्रस्तान, मशिदी शेकडो गावांत आढळून येतील. मात्र हिंदू खाटीक बांधवांसाठीचे वेगळे मंदिर अथवा स्मशानभूमी देशात कुठेही आढळून येणार नाही. सामाजिक विषमतेच्या दाहकतेचे चटके आजही मुस्लिम खाटीक बांधव पदोपदी अनुभवतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘शिवचरित्रा’मध्ये मालोजीराजांना गुरुपदेश देणारे श्रीगोंद्याचे शेख बाबा महंमद यांचा उल्लेख ते ‘खाटीक’ असल्याचाच केला गेला आहे, तर जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या गाथेत २८२०व्या अभंगात ‘सजन कसाया विकू लागे मास’ असा उल्लेख आढळतो. साक्षात श्री पांडुरंगाने सजन कसायाच्या व्यवसायात मदत केल्याचे तुकाराम महाराजांनी नमूद केलेले आहे. आज राज्यातल्या, देशातल्या लाखो खाटीक बांधवांची चौफेर होरपळ सुरू असताना शासनकर्त्यांनी जबाबदार सत्ताधारी, विरोधक लोकप्रतिनिधींनी श्री विठ्ठलाचे रूप बनून मुस्लिम खाटीक बांधवांच्या मदतीला धावावे. बिहार आणि झारखंड सरकारने दलित मुस्लिमांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाची सवलत मिळावी म्हणून २००० साली राज्याचा प्रस्ताव संमत करून केंद्राकडे पाठविला होता. शेजारच्या कर्नाटक राज्यात बॅकवर्ड क्लास नं. १ म्हणून मुस्लिमांना ४ टक्के आणि मुस्लिम, खाटीक, कसाई, कसाब यांना बॅकवर्ड क्लास नं. २ म्हणून वेगळे ४ टक्के आरक्षण दिले गेले आहे.

(अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक समाज)

……………………

प्रतिक्रिया – 

शिवसेना धर्म नाही, तर कर्म मानते

अल्ताफ शेख (शिवसेना उपनेते)

कोनगाव (कल्याण) – २३ ऑक्टोबरच्या दै. ‘सामना’मध्ये मुस्लिम (खाटीक) आरक्षणाबाबतच्या सादिक पापामियाँ खाटीक यांचा लेख वाचला. शिवसेना मुस्लिमविरोधी कधीच नव्हती, आजही नाही. शिवसेना ही धर्माच्या नाही तर अधर्माच्या विरोधात आहे आणि जो धर्म अधर्माचा नाश करण्यास शिकवितो तो धर्म शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेनेचा आणि भगव्याचा असतो. त्याचा प्रत्ययच सादिक यांच्या ‘सामना’तील लेखामुळे आला. ज्येष्ठ पत्रकार मुजफ्फर हुसैन आणि सादिक खाटीक यांचे लेख ‘सामना’मध्ये येतात हे कित्येक मुस्लिम बांधवांना माहीत नाही. शिवसेना जातीयवादी आहे असे म्हणणाऱयांना हे उत्तरच आहे. या देशाचे नागरिक म्हणविणाऱया प्रत्येकाने, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो, त्याने आपल्या राष्ट्राशी प्रामाणिक राहायलाच हवे. काही वर्षांपूर्वी अजमेर शरीफ दर्ग्याला पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी भेट दिली होती. त्यावेळी तत्कालीन सरकारने त्यांच्या स्वागतासाठी पायघडय़ा अंथरल्या होत्या आणि दरवाजावर अजमेर शरीफ दर्ग्याचे पुजारी (मुजावर) यांना स्वागत करण्यासाठी बोलावले होते, पण त्या राष्ट्रभक्त मुजावरांना सांगितले की, आमच्या देशातील निरपराध्यांवर अतिरेकी हल्ले करणाऱया, सीमा रक्षणासाठी असणाऱया जवानांवर आणि सीमेवर बेछूट गोळीबार करून निरपराध लोकांना मारणाऱया देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागताला मी जाणार नाही, असे निधडय़ा छातीने म्हणणाऱया मुजावरांचा त्यावेळी ‘सामना’ने गौरवच केला होता. राष्ट्राभिमानी मुस्लिमांच्या विरोधात शिवसेना नाहीच याचा यापेक्षा भक्कम पुरावा तो कोणता? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. शिवसेना मुस्लिमविरोधी नाही हे मुस्लिम बांधवांनी समजून घ्यावे. सादिक खाटीक यांनी ‘सामना’मधून मुस्लिम खाटीक समाजबांधवांसाठी घटना दुरुस्तीची मागणी केली. मुस्लिम खाटीक समाजाच्या मागे कोणी राहो अथवा न राहो, पण शिवसेना श्री पांडुरंगाप्रमाणे राष्ट्रप्रेमी मुस्लिम खाटीक समाजाच्या मागे नक्कीच उभी राहील याची खात्री मुस्लिम खाटीक समाजाने बाळगावी.