ठसा : तुरेवाले नंदू बरामबुवा…

175

>> दुर्गेश आखाडे 

जाखडीतील कलगीतुरा आजही कोकणातील ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. जाखडी ही कोकणातील लोककलाच आहे. जाखडीतील शक्तीवाले आणि तुरेवाले यांचा जंगी सामना खूपच रंगतो. एकमेकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यावरच खरी लढत असते. अलीकडच्या काळात दूरचित्रवाणी संचामुळे पारंपरिक लोककला मागे पडल्या असल्या तरी नामदेव सदानंद बराम यांच्यासारखे तरुण लोकशाहीर निर्माण झाले. त्यांनी या परंपरेची सेवाही केली. शाहीर क्षेत्रातील गाढे अभ्यासक प्रतिस्पर्धी शाहीरांचे प्रश्न फोडण्यात ज्यांचा हातखंडा होता असे शाहीर नामदेव सदानंद बराम ऊर्फ नंदू बरामबुवा यांचे नुकतेच निधन झाले. नंदू बरामबुवा यांच्या निधनामुळे कोकणातील शाहीर लोककलेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिह्यातील लांजा तालुक्यातील वाकेड गावचे रहिवासी असलेले शाहीर नामदेव सदानंद बराम हे जाखडीतील तुरेवाले म्हणून प्रसिद्ध होते. नामदेव बराम यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वाकेड गावातच झाले. दहावीनंतर ते मुंबईत गेले. 1999 साली मुंबईत तुरेवाले लोकशाहीर तुकाराम मानकर यांचे ते शिष्य झाले. त्यांच्या होतकरू, मनमिळावू स्वभाव आणि अभ्यासू वृत्तीमुळे नामदेव बराम आणि लोकशाहीर तुकाराम मानकर यांचे गुरू-शिष्याचे नाते अधिक घट्ट झाले. गुरू तुकाराम मानकर यांचा नामदेव बराम यांच्यावर प्रचंड विश्वास होता. म्हणून ते त्यांच्याकडे असलेली अनेक पुस्तके वाचण्यास देत असत. ज्याच्या घरामध्ये लोकशाहिरीचा काही संबंध नव्हता किंवा बालपणात केवळ नमन, भजनाची आवड होती. नामदेव बराम यांनी स्वतःला शक्तीतुऱ्याच्या कलेत पूर्णपणे झोकून दिले. पाहता पाहता खूप कमी वयातच त्यांची ओळख नंदू बरामबुवा अशी झाली. सर्वप्रथम त्यांनी वाकेड गावातील गावकऱ्यांना घेऊन तुरावाल्यांचा कार्यक्रम सुरू केला. नवतरुण मित्रमंडळ बरामवाडीच्या माध्यमातून तब्बल 20 वर्षे ते कलगीतुरा-जाखडीचा हा कार्यक्रम सादर करत होते. मुंबईत गेल्यानंतर नोकरी करून नंदू बरामबुवा शाहीरीचे कार्यक्रम करत. वाचनाची आणि शाहीरीची आवड असल्यामुळे केवळ कार्यक्रम सादर करण्याइतपत त्यांनी आपली कला जोपासली नाही तर त्या कलेचा अभ्यास सुरू केला. विविध ग्रंथांचे वाचन केल्यामुळे  त्यांचा गाढा अभ्यास होता. जाखडीतील तुरा पक्षातील एक अभ्यासक शाहीर म्हणून त्यांची ओळख होती. तुरेवाले असोत किंवा शक्तीवाले असोत त्या सर्वांना शास्त्रशुद्ध प्रश्नोत्तरासाठी ते मदत करत. ज्या ठिकाणी कलगीतुऱ्यांचे कार्यक्रम रंगत त्यावेळी एखादा प्रश्न अडचणीचा आला आणि तेथील शाहीरांनी नंदू बरामबुवांना मध्यरात्री दोन वाजताही फोन केला तरी ते उत्तर देत. असे नव्या दमाच्या लोकशाहीरांसाठी नंदू बरामबुवा मार्गदर्शक होते. कलगीतुरा उन्नती समाज मंडळाचे ते सदस्य होते. त्या माध्यमातूनही ते विविध कार्यक्रम करत. नंदू बरामबुवांनी काही शाहीरांसोबत रायगड किल्ल्यावर जाऊन शिवरायांसमोर एक शपथ घेतली होती की, मी या कलेचा पाईक आहे आणि मी ही कला मनापासून जपेन आणि मनात कधीही गर्व करणार नाही. असा गर्व नसलेल्या नंदू बरामबुवा यांना अवघ्या वयाच्या 41 व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनामुळे कोकणातील लोकशाहीरीसाठी खूप मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. नंदू बरामबुवा यांच्याशिवाय आत जाखडीतील कलगीतुरा रंगेल का, या प्रश्नाचे उत्तर शक्तीवाले आणि तुरेवाले शोधत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या