प्रासंगिक : नाना शंकरशेटः उपेक्षा कधी थांबणार?

133

>> जयराम नारायण देवजी

हिंदुस्थानी रेल्वेचे जनक, मुंबईचे आद्यशिल्पकार, रेल्वेचे प्रथम प्रवासी, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, उद्याने, शाळा-महाविद्यालये, स्मशानभूमी वगैरेंसारख्या विविध अंगी सुधारणांचा पाया रोवणारे थोर समाजसुधारक, ज्यांनी मुंबईतील आपल्या लाख मोलाच्या जमिनी ‘देणार्‍याने देत जावे’ या उक्तीप्रमाणे दान दिल्या ते थोर दानशूर व्यक्तिमत्त्व, जगन्नाथ ऊर्फ शंकरशेट होय.

नानांनी सन 1848 मध्ये गिरगावात स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली होती. त्याला आज जवळपास 170 वर्षे झाली. तसेच दळणवळणाच्या दृष्टिकोनातून उद्योगधंदे वाढीस लागावेत म्हणून नानांनी आपल्या वाड्यातच रेल्वेची कचेरी सुरू करून सन 16 एप्रिल 1853 रोजी इंग्रज राजवटीत जिद्दीने बोरीबंदर ते ठाणे अशी रेल्वे सेवा सुरू केली. त्या रेल्वेचे जाळे आज जगभर पसरले आहेत. मुंबईतील 40 एकर जमिनीवर उभी असलेली राणीची बाग, त्यालाच लागून असलेले भाऊ दाजी म्युझियम सुरू करण्याची कल्पनादेखील नानांचीच होती. याच माध्यमातून आधुनिक आणि बलशाली हिंदुस्थान उभारण्यात नाना अग्रेसर होते. एलफिन्स्टन कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटी, रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेचे प्रचंड ग्रंथालय ‘टाऊन हॉल’मध्ये आहे त्याला नानांनीच मदत केली. ग्रँट मेडिकल कॉलेज, फ्रामजी कावसजी इन्स्टिटय़ूट आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशा बर्‍याच संस्था स्थापनेकरिता नानांचा पुढाकार होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि जगन्नाथ शंकरशेट स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या नानांच्या स्मारकासाठीच्या जागेच्या मागणीवर प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने वडाळा येथे नानांच्या स्मारकाकरिता जागा  उपलब्ध करून दिली, परंतु आजपर्यंत त्या स्मारकाकरिता राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नाही ही शोकांतिका आहे.

गेली कित्येक वर्षांपासून नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नानांचे नाव देण्याची आग्रही मागणी करीत आहे आणि रास्तही आहे. कारण नानांच्या इतर सामाजिक कार्यातील ठळक कामाशी संबंधित ही मागणी आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी मुंबईतील अनेक नानाप्रेमी जनतेच्या वतीने मूक मोर्चे, आंदोलने, संबंधित मंत्र्यांच्या, मान्यवरांच्या गाठीभेठीही झाल्या तरी हा प्रस्ताव आजपर्यंत मान्य केला जात नाही ही नानाप्रेमी जनतेची चेष्टाच म्हणावी लागेल.

नानांच्या पुण्यतिथीदिवशी मागील वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी ट्विटरद्वारे नानांना आदरयुक्त श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यातही त्यांनी सन्मान मिळविला. कारण आजपर्यंत राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी या अगोदर श्रद्धांजली वाहण्याचे औदार्य दाखविलेले नाही, परंतु केवळ श्रद्धांजली वाहून आपण नानांसाठी खूप काही तरी केले असे न समजता खर्‍या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नानांचे नाव देण्याची मानसिकता दाखवायला हवी आणि स्वतःच्या अधिकारांचा वापर करून नामांतर करून द्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर आपल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करून केवळ सहा महिन्यांत रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास सुरुवात केली, तर महाराष्ट्राचे संबंधित मंत्री मुहूर्त शोधत आहेत का?

नानांविषयी हल्ली रोजच वर्तमानपत्रातून पत्रकार मंडळी आपल्या लेखणीतून नानांच्या समाजकार्याचा, योगदानाचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करून राज्यकर्त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु महाभारतातल्या धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधून राजकारण करणार्‍यांना नाना अजूनही कळलेले नाहीत ही राज्याची शोकांतिका आहे. नानांची यंदा 216 वी जयंती राज्यात प्रतिष्ठानच्या वतीने साजरी झाली. तसेच 31 जुलै रोजी 154 वी पुण्यतिथीही साजरी होणार आहे. मुंबईच्या या आद्यशिल्पकार, थोर समाजसुधारकास रेल्वे टर्मिनसच्या नामांतरापासून अजूनही उपेक्षित ठेवीत आहोत, ही बाब राज्यकर्त्यांना लांच्छनास्पद वाटत नाही का?

ब्रिटिशांनी जर एका मराठी कर्तृत्ववान समाजसुधारकाचा गौरव म्हणून नानांचे प्रतीकात्मक शिल्प छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर कोरले तर आपण या मुंबईच्या आद्यशिल्पकाराला उपेक्षित का ठेवावे, याचे भान या राज्यकर्त्यांना हवे. आजही ते शिल्प नानांच्या थोर कार्याची साक्ष देत आहे. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, नानांचे मुंबई शहरावर उपकार आहेत. 10 फेब्रुवारी रोजी नानांची 216 वी जयंतीदेखील झाली. त्यानिमित्त ‘मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस’ला ‘जगन्नाथ शंकरशेट टर्मिनस, मुंबई’ असे नामांतर करून नानांना उचित गौरव करावा.

आपली प्रतिक्रिया द्या