नाना शंकरशेट : द्रष्टे समाजसेवक

>> गौरी घनश्याम
[email protected]

ब्रिटिश सत्तेच्या विळख्यातून हिंदुस्थानची सुटका करण्यासाठी अनेक उठाव झाले. आंदोलने झाली. त्याच ब्रिटिश राजवटीत काही जण देशप्रेमाचा आविष्कार विधायक कार्यातून करीत होते. मनात सुधारणेचे बीज पेरणारे मात्र आपल्या परीनं काम करीत होते. त्यातच एक होते मुंबईचे आद्य शिल्पकार असा गौरवपर उल्लेख होणारे जगन्नाथ (नाना) शंकरशेट. सधन कुटुंबात जन्माला आलेल्या जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्यावर वयाच्या १९ व्या वर्षीच पित्याच्या निधनानंतर व्यावसायिक, कौटुंबिक जबाबदारी येऊन पडली. बदललेल्या समीकरणाने खचून न जाता त्यांच्यातील समाजसेवक आणि द्रष्टा विचारवंत कार्यकर्तृत्वाने दिवसागणिक झळाळत राहिला.

तत्कालीन सामाजिक प्रश्नांच्या वणव्यातून समाजाला वाचवले पाहिजे. किंबहुना हा वणवा विझवून नवनिर्मितीचा शांत दीप प्रज्वलित करण्यासाठी नानांनी पारतंत्र्य काळातच सर्व स्तरांवर सुधारणांचा श्रीगणेशा केला. स्वतंत्र हिंदुस्थानातील सुधारणांचा ऊहापोह करताना आपल्याला आढळून येते की, भविष्याचा वेध घेत नानांनी स्त्री शिक्षण, सार्वजनिक रुग्णालये, औद्योगिक सुधारणा, सतीच्या चालीचे उच्चाटन, बालसुधारगृह, सोनापूर स्मशानभूमी, कायदे मंडळ, धार्मिक तंट्य़ाचे निवारण यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. कृषिप्रधान देशातील लोकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी १८३० साली ‘ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी’ची स्थापना केली.

आज मेट्रो ट्रेनचे उत्साहात स्वागत झाले आहे. पण मुंबईकरांचा हा आनंद १५ एप्रिल १८५३ साली ओसंडून वाहत होता. त्या दिवशी मुंबई ते ठाणे पहिली आगगाडी धावली. त्याचेही श्रेय नानांच्या अथक प्रयत्नाला व आग्रहाला जाते. इंग्लंडहून आलेल्या इंजिनीअर्सना ऑफिस थाटण्यासाठी नानांनी आपल्या राहत्या वाड्य़ात जागा दिली. नानांचा अर्धपुतळा आजही छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागात दिसून येतो. मुंबईतील रेल्वेच्या शुभारंभाचे एक प्रवर्तक म्हणून त्यांचे नाव या स्थानकाला देणे उचित ठरेल.

शिक्षणावर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा असणाऱ्या नानांनी हिंदुस्थानींना कायदे शिक्षण मिळावे म्हणून तसेच त्यांना कोर्टाची सनद मिळून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी सनदशीर मार्गाने आपला लढा सुरू ठेवला. जस्टीस ऑफ द पीस (जेपी) होण्याचा मान मिळविणाऱ्या नानांनी चाणक्य नीतीने न्याय्य नियमांचा आग्रह धरला होता. इंग्रजी आणि संस्कृत भाषेची सुयोग्य सांगड घालून देतानाही संस्कृत भाषेला मानाचे स्थान प्राप्त व्हावे व मातृभाषेतून शिक्षण घ्यावे या आग्रहात त्यांच्यातील शिक्षणतज्ञ दिसून आला. संस्कृत विषयाची गोडी वाढावी याकरिता ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्तीची त्यांनी निर्मिती केली. ‘जगन्नाथ शंकरशेट संस्कृत स्कॉलर’ या बिरुदासाठी हजारो विद्यार्थी प्रयत्नशील होत होते. ही स्कॉलरशिप मिळणे आपले भाग्य समजत होते.
ज्या काळात अंतर्गत दळणवळण फार जिकीरीचे होते त्या काळात नानांनी सागरी मार्गाचाही विचार करून तत्कालीन कलेक्टर जॉर्ज ग्रँट, दादाभाई रुस्तमजी, जिजीभाई दादाभाई, टी.आर. मर्चंट आदी सहकाऱयांसह ‘बॉम्बे स्टीम नेव्हीगेशन कंपनी स्थापन केली. यातील नानांचा विशाल दृष्टिकोन होता की, हिंदुस्थानी गुजराती, मारवाडी, मुसलमानांइतकेच महाराष्ट्रीय व्यापारीही त्यायोगे व्यवसायाभिमुख व्हावेत.

धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन नानांनी प्रत्येक नागरिकाच्या जन्म, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, कला, क्रीडा, दळणवळण इतकेच नव्हे तर मृत्यूनंतरचाही विचार केला. सध्याची सोनापूर स्मशानभूमी व बाणगंगा नानांनीच दिलेल्या जागेत आहेत. हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशातील वैविध्य आज मुंबईतल्या सामाजिक जीवनात दिसून येते. पारतंत्र्यातील अस्थिर वातावरणातही सार्वभौमत्वाचा बारकाईने विचार करणाऱ्या नानांनी बँकिंगसह आर्थिक उन्नतीचे सर्व मार्ग सर्वसामान्य नागरिकांना आखून दिले. आज मुंबई ही हिंदुस्थानची ‘आर्थिक राजधानी’ ओळखली जाते. हिंदुस्थानी संस्कृतीची उदात्तता आणि आधुनिक सुधारणा यांचा समन्वय साधला जाऊन भविष्यकाळात सर्वसामान्य नागरिकांना स्वत्वाचं भान यावं, प्रत्येकाचा उत्कर्ष व्हावा आणि समाज सर्व बाबतीत सजग व्हावा या तळमळीपोटी जगन्नाथ शंकरशेट या थोर विभूतीने आपले अवघे आयुष्य वेचले. मुंबईत दिमाखात उभ्या राहिलेल्या शंभराहून अधिक वर्षे मुंबईला लक्षवेधी करणाऱ्या असंख्य संस्था, असंख्य सार्वजनिक स्थळे नानांच्या विजिगिषु वृत्तीनंच उदयास आल्या आहेत हे वास्तव येणाऱ्या पिढ्य़ांना ज्ञात होणे गरजेचे आहे. या सर्व संस्था आजही सुव्यवस्थितपणे सुरू आहेत. नाना शंकरशेट यांनी ब्रिटिशांकडून पारतंत्र्यात भव्यदिव्य योजना प्रत्यक्षात आणल्या, पण स्वतंत्र हिंदुस्थानात मात्र मुंबई सेंट्रल स्थानकाला त्यांचे नाव देण्यासाठी अर्ज, विनंत्या, आंदोलने, मोर्चे काढावे लागतात हे दुर्दैवी आहे. १६ एप्रिल १८५३ ते १६ एप्रिल २०१८ या १६५ वर्षांत रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दुर्लक्षित होतो हे खेदपूर्ण आहे. मुंबईत पहिली रेल्वे धावली ती नानांच्या प्रयत्नाने व योगदानाने. मुंबई सेंट्रल स्थानकाला या युगपुरुषाचे नाव दिल्यास ते प्रत्येक मुंबईकर नागरिकाला आवडेल.