गणितज्ञ

>> शैलेश माळोदे

गणित आणि संगणक या दोन्ही क्षेत्रात भरीव योगदान दिलेले प्रा.नरेंद्र करमरकर आज तरुणांसाठी खऱ्या अर्थाने आदर्श ठरावेत.

करमरकर ऍल्गॉरिदम म्हणून जगभर नावाजलेल्या ऍल्गोरिदमचं कौतुक 35 वर्षांपूर्वी गणितीय आणि संगणकीय जगात खूप मोठय़ा प्रमाणात झालं. आज आपण विविध प्रकारचा ऍल्गॉरिदमसचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा ऍनालिटिक्सच्या क्षेत्रात खूप मोठय़ा प्रमाणात करत आहोत. ऍमेझॉन, उबेर, ओला इत्यादी ऑनलाइन सेवा देणाऱया कंपन्यांद्वारे विविध प्रकारे त्यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणात आपला बिझनेस वाढविण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरू आहेत. अशावेळी एका महाराष्ट्रीय गणितीने 35 वर्षांपूर्वी संगणकीय क्षेत्रात क्रांती घडवणाऱया गणितीय अल्गॉरिदमचा लावलेला शोध (इन्व्हेन्शन) खूपच महत्त्वाचा आणि क्रांतिकारीच म्हणायला हवा.

1957 साली मध्य प्रदेशात ग्वालियर येथे जन्मलेल्या नरेंद्र कृष्ण करमरकर यांचा समावेश जगामध्ये असलेल्या संशोधकांपैकी सर्वाधिक ‘सायटेड’ म्हणजे त्यांचा संशोधनाचा वापर सर्वाधिक वेळा केला जात असलेल्या वैज्ञानिकांत होतो. शालेय शिक्षण भावे हायस्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत उत्तम क्रमांक मिळवून प्रा.नरेंद्र करमरकर आयआयटी मुंबईत 1974 साली दाखल झाले. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट प्राप्त केली.

त्यांनी 1984 साली त्यांचा प्रसिद्ध करमरकर ऍल्गोरिदम बेल लेबॉरेटरीज (तत्कालीन एटी मॅण्ड टी)मध्ये न्यू जर्सी येथे कार्यरत असताना शोधून काढला. हा पहिला पॉलिनॉमिएल टाइम अल्गोरिदम होता. त्यालाच इंटेरिअर पॉईंट पद्धती म्हणून ओळखण्यात येतं. जगातील बिझनेस क्षेत्रात लॉजिस्टिक मॅनेजमेंटसाठी उपयुक्त असणाऱया ‘ऑपरेशन्स रिसर्च’ या खास गणितीय क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या ‘लिनीअर प्रोग्रॅमिंग’मधील हा ऍल्गोरिदम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याद्वारे ग्राहकाला जलद आणि कमी खर्चात एखादा पदार्थ पुरविण्याची पद्धती त्यातून विकसित होण्यास मदत झाली. हे काल म्हणजे 15 मार्चच्या जागतिक ग्राहक दिनाच्या दृष्टीने करमरकरांनी त्यावेळी दिलेली भेटच म्हणायला हवी.

सध्या ते सुपर कम्प्युटिंगसाठीच्या नवीन आर्किटेक्चरबाबत कार्य करत आहेत. ‘करमरकर ऍल्गोरिदम’चा वापर करून किचकटपणे अधिकाधिक कार्यक्षम आणि पुरेपूर परिणाम अभिप्रेत असलेल्या समस्या सोडविण्यावरच खूपच मोठी मदत होते. याचं एक व्यावहारिक उदाहरण म्हणजे संचार जाळ्याच्या कार्यक्षम वापरासाठी समस्येची उकल करण्याचा कालावधी काही आठवडय़ांवरून काही दिवस आणि आता तासांइतका कमी झाला आहे. म्हणजे त्यांच्या अल्गोरिदममुळे बिझनेस आणि नितीविषयक निर्णय घेणं आता खूपच जलद होतंय. त्यामुळे विविध टेरिरिअर पॉइंट पद्धती विकसित होऊन क्लिनिअर प्रोग्रॅम्ससाठीच्या बोडिंगमध्ये त्याचा वापर केला जातोय. यानंतर प्रा.करमरकर यांनी सुपर कम्प्युटिंगसाठी ‘फायनाईट भूमिती’ (जॉमेट्री) विशेषतः प्रोजेक्टिव्ह जॉमेट्रीचा वापर फायनाईट फिल्डस्वर करून गेलॉईस भूमितीमध्ये मूलभूत योगदान दिलंय.

सध्या ते या संकल्पनांचं संश्लेषण काही नव्या संकल्पनेशी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांनी ‘स्कम्पचरिंग फ्री स्पेस’ (मुक्त क्षेत्राची मूर्तीकला) असं संबोधलंय. त्यामुळे त्यांना मंत्रांची भौतिक रचना करण्यासाठीदेखील संशोधन करणे शक्य झालंय. याबाबतचे अपडेट्स (ताजी माहिती) ते सध्या प्रकाशित करत आहेत.

प्रा.नरेंद्र करमरकर यांच्या गणित आणि संगणक क्षेत्रातील कार्याला विविध संस्थांनी प्रदान केलेल्या फेलोशिप्स, पुरस्कार आणि पारितोषिकांची जागतिक स्तरावर पावती लाभलीय. आज 62 वर्षांचे असलेल्या प्रा.करमरकरांना 1978 मध्ये हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींचं पदक आयआयटी मुंबईने प्रदान केलं. त्याच संस्थेनं त्यांना 1996 साली विशेष कर्तृत्व असलेल्या माजी विद्यार्थी, (ऍल्युमिनस) म्हणून सन्मानित केलं. 1999 साली त्यांना हिंदुस्थानी पंतप्रधानांनी सीनिवासा रामानुजन जन्मशताब्दी पारितोषिकानं सन्मानित केलं. याशिवाय अमेरिका आणि युरोपातील विविध आणि प्रतिष्ठत संस्था, विद्यापीठं आणि कंपन्यांनी त्यांच्या कार्याला सलामी दिली. 2000 साली त्यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा पारितोषिक ‘पॅरिस कनेलेकीस पारितोषिक’ त्यांच्या रेटिरिअर पॉइंट पद्धतीच्या शोधासाठी देण्यात आला. डिस्क्रीट मॅथेमॅटिक्समधील फुल्करसन पारितोषिक त्यांना 1988 साली. तर टेक्सस इन्स्टुमेंटस् प्राईझ 1986 साली देण्यात आलं. त्यांच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांचा सन्मान केला, तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी 1985 साली ‘अमेरिकन ऍकॅडमी ऑफ अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित केलं. ऑपरेशन्स रिसर्च क्षेत्रातील प्रकाशित संशोधनासाठीचं फ्रेडरिक लॅचेंस्टर पारितोषिक त्यांना 1984 साली देण्यात आलं.

अशा विविध पारितोषिकं, पुरस्कारांचे धनी असलेले प्रा.नरेंद्र करमरकर 1987 पासून बेल लॅबॉरेटरीजचे फेलो असून आजही मूलभूत विचार करून कम्प्युटिंगच्या क्षेत्रात स्वतःची नाममुद्रा ठळक करताहेत. तरुणांसाठी हे एक रोल मॉडेल आहेत, कारण कार्य कधीच संपत नसतं. फक्त त्यासाठीची ऊर्जा सतत निर्माण करत राहायला हवं, त्यातच खराखुरा आनंद आहे इति प्रा. नरेंद्र करमरकर, गणिती कम्प्युटर वैज्ञानिक.

[email protected]