श्रीफळ आणि समुद्र


>> अरविंद दोडे

परवा नारळी पौर्णिमा. नारळ आणि समुद्र आपल्या जगण्याचे अविभाज्य घटक. दोहोंचं महत्त्व धार्मिक आणि सामान्यांच्या अगदी जवळचे…

समुद्राकाठी मानव वस्ती करायला लागला. तसा तो नदीकाठी किंवा तळ्याकाठीसुद्धा राहात होता. फरक होता तो खारे पाणी आणि गोडे पाणी असा. सागरी जीवन जगणाऱ्या जातीजमाती प्रामुख्याने मच्छिमार आणि मोतीशोधक होत्या. समुद्राला देवता मानून पुजणाऱ्या लोकांनी वादळी पावसाळ्यात आपला उद्योग त्या ऋतूत बंद ठेवावा. जलदेवतेचा कोप होऊ नये म्हणून प्रार्थना करावी आणि वर्षाऋतूच्या अखेरीस म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्दशीला समुद्र पूजा करावी. या श्रद्धेने सुरू झालेली ही प्रथा अजूनही सुरू आहे. पुढेही राहील.

यंदा 25 ऑगस्टला पौर्णिमेस प्रारंभ होतो आहे तो दुपारी 3.15 वाजता… आणि समाप्ती समय आहे रविवारी 26 ऑगस्टला संध्याकाळी 5.25 वाजता. दोन्ही दिवस शुभ असून संध्याकाळी सूर्यास्तावेळी ही समुद्रपूजा आगरी आणि कोळी समाजबांधव मोठ्या मनोभावे करतात.

ज्याच्या आधाराने आपला घरसंसार चालतो, त्याच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करावी. त्याचे आभार मानावेत. त्याची कृपा आपल्यावर नित्य राहावी हा आपला भक्तीभाव त्याची पूजा करण्यास प्रवृत्त करतो. त्या सागराला गंध, अक्षता, फुले वाहून आराधना करतो. किनाऱ्याला नांगर टाकून ठेवलेल्या होत्या. दुसऱ्या दिवसापासून आपले नाखवा, आपले सारंगा पुन्हा समुद्रावर होड्या घेऊन निघतात. नित्याचा दिनक्रम सुरू होतो. या साऱ्या सोपस्कारांत अनन्यसाधारण महत्त्व आहे ते नारळाला. समुद्रदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीफळच कशाला हवं? इतर फळे शुभ नाहीत का?

समुद्रमंथन केल्यावर जी ‘रत्ने’ बाहेर पडली त्यांच्यात लक्ष्मीदेवी ही एक होती. तिच्या तेजस्वी रंगाला, रूपाला साजेसा एकच सुयोग्य ‘वर’ होता. वैकुंठीचा राणा- विष्णुदेव! लक्ष्मीने त्याला आपला सर्वस्वाचा आधार मानून त्याच्या गळ्यात वरमाळा घातली. लक्ष्मी-नारायणाचा तो स्वरुपसुंदर अवतार आपण पूजतो. लक्ष्मी म्हणजे ‘श्री’! रामाला श्रीराम म्हणतात. कृष्णालाही श्रीकृष्ण म्हणतात. पुरुषाआधी स्त्र्ााrचे पूजन करण्याची ही आदर्श संस्कृती. तिचा आदर नारळीपौर्णिमेच्या दिवशी व्हायलाच हवा.

समुद्र हा लक्ष्मीचा पिता. 

समुद्र हा विष्णूचा सासरा.

फळ विष्णूला अर्पण करायचे, तर ते लक्ष्मीचे ‘श्रीफळ’ अधिक योग्य. असे हे नारळ आणि समुद्राचे अतूट नाते. त्या नात्याचे आपणास स्मरण राहावे, म्हणून ही श्रीफळपूजा. दुसरा मुद्दा आहे नारळीभाताचा. नारळात अ, ई आणि ड जीवनसत्त्वे असल्याने डोळे उत्तम राहातात. दृष्टी (आणि दृष्टिकोनही!) उत्तम राहण्यास मदत होते. शरीराची हाडे बळकट होतात. नित्य भोजनात श्रीफळ हवे, ते उत्तम आरोग्यासाठी.

सीतेचे सीताफळ प्रसिद्ध आहेच. लक्ष्मीच्या फळाला मात्र प्रथम क्रमांकावर स्थान आहे. समुद्राबाबत सांगायचे तर त्याला म्हणतात ‘रत्नाकर’. त्याच्या अथांग पाण्यावर कोटय़वधी जलचर जगतात. त्यात ‘मासा’ हा प्रमुख जलचर. अर्धे जग मत्स्यावताराचे भुकेले आहे. समुद्राच्या शिंपल्यात सापडतात मोती. त्याच्या आत असतात औषधी वनस्पती. त्याच्यापासून मिळते मीठ. एक समुद्र शेकडो उपयुक्त गोष्टी देतो. तसेच श्रीफळ. नारळीच्या बागा असतात सागरतिरी. नारळीपासून मिळणारे फायदे एक नव्हे तर अनेक कुटुंबांना जगवतात.

आपल्या श्रद्धा अशा विज्ञानावर आधारीत असल्याने त्या जर ‘अंधश्रद्धा’ किंवा ‘थोतांड’ म्हणून नाकारल्या, तर नुकसान आपलेच होते. प्राचीन ऋषिमुनींनी सांगितलेल्या विज्ञानाला अध्यात्मिकतेचा भक्कम आधार दिला आणि सणवार निर्माण केले. निसर्गाच्या जवळ जाण्याचा संदेश देणाऱ्या अशा असंख्य क्रतवैकल्याला भगवंताचे अधिष्ठान आहे. रक्षाबंधनाला मात्र बहीण भावाच्या मायेचे प्रतिष्ठान आहे. भाऊबीजेप्रमाणेच ही नारळी पौर्णिमा अतूट आणि निर्मळ नात्याची अमर-गंगा. बहीण ही आदि‘माया’ म्हणून मानतात. ती थोरली असेल तर भाऊरायाचा सांभाळ करते. धाकटी असेल तर भाऊ तिचे समाजातल्या रावणांपासून रक्षण करतो.

पूर्वी सासुरवाशीण बहीण असायची. राखीच्या निमित्ताने भावाशी भेट व्हायची. माहेरची ख्यालीखुशाली कळायची. बहीण सुखी आहे की नाही ही खबरबात प्रत्यक्ष बघायला मिळायची. संपर्क साधने नसताना प्रत्यक्ष गाठीभेटीसाठी जीव तळमळायचा.

आता तसे होते का?

तरीही हे नाते अबाधित आहे.

त्रिकालाबाधित राहील!