‘मीर’वरील कामगिरी

[email protected]

आपण आतापर्यंत ज्या महिला अंतराळयात्रींची माहिती घेतली, त्यांचं अंतराळकार्य त्या त्या वैज्ञानिक टप्प्यात महत्त्वाचं होतंच, परंतु त्यांचं अंतराळातलं राहणं जास्तीत जास्त एखाद महिन्याचं होतं. आज ज्या शेनॉन ल्युसिड या अंतराळयात्रिकेची ओळख आपण करून घेणार आहोत तिने पाचवेळा अंतराळयात्रा केली, रशियाच्या ‘मीर’ या अंतराळ स्थानकावर प्रदीर्घ वास्तव्य केलं आणि त्या काळात त्या १८८ दिवस अंतराळात राहिल्या!

या अमेरिकन अंतराळयात्रीचा जन्म चीनमधल्या शांघाय येथे झाला. पुढे बालपण आणि शिक्षण अमेरिकेतल्या ओक्लाहोमा राज्यात झालं. १९७३ मध्ये शेनॉन यांनी जैवरसायनशास्त्र्ाात (बायोकेमिस्ट्री) पीएच.डी. मिळवली. याच विषयात त्यांनी ओक्लाहोमा विद्यापीठात काही काळ अध्यापन केलं.

१९७४ मध्ये त्यांची ‘नासा’च्या अंतराळयात्रींसाठीच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झाली. मध्ये काही काळ गेला. त्यानंतर ‘नासा’ने अंतराळात जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना संधी देण्याचं जाहीर केल्यावर शेनॉन यांची सहज निवड झाली. अर्थात प्रत्यक्ष अंतराळवारीसाठीही मध्ये बराच काळ जावा लागला. १९८५ मध्ये ‘डिस्कव्हरी’ यानातून शेनॉन अवकाशात झेपावल्या तेव्हा त्यांनी चाळिशी पार केलेली होती.

त्यांची पहिली स्पेस फ्लाईट सात दिवसांची होती. त्यावेळी त्यांच्या पथकाने मेक्सिको आणि अरब देशांचे उपग्रह अंतराळात स्थापित केले. शिवाय अमेरिकेचे उपग्रह होतेच. या प्रवासात त्यांनी १७ तास स्पेस शटलबाहेर राहून ‘एक्स-रे’ ऍस्ट्रॉनॉमी (क्ष-किरण खगोलशास्त्र्ााचे) प्रयोग केले.

१९८९ मध्ये शेनॉन ल्युसिड यांना ‘ऍटलॅन्टिस’ यानातून पाच दिवसांच्या अंतराळ कामगिरीवर जाण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी प्रसिद्ध ‘गॅलिलिओ’ यान अंतराळात सोडलं. या यानाला ‘गुरू’ ग्रहाचं जवळून निरीक्षण आणि वैज्ञानिक नोंद करण्याचं उद्दिष्ट दिलेलं होतं. पुढे ‘गॅलिलिओ’ने ते पूर्णत्वाला नेलं. याच वेळी शेनॉन यांना ‘सोलर बॅकस्कॅटर अल्ट्राव्हायोलेट इन्स्टमेन्ट’ वापरता आलं. त्याचबरोबर पृथ्वीच्या वातावरणातील नष्ट होणाऱ्या संरक्षक ‘ओझोन’ वायूचंही मापन करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. या काळात ‘ऍटलॅन्टिस’ने पृथ्वीभोवती ७९ परिक्रमा करून १० लाख ८० हजार मैलांचा प्रवास केला.

पुन्हा एकदा ‘ऍटलॅन्टिस’वर स्वार होऊन शेनॉन ल्युसिड यांचा अंतराळ समूह १९९१ मध्ये अवकाशस्थ झाला. यावेळी नऊ दिवसांचा कालावधी होता. या दौऱ्यात त्यांनी भौतिकशास्त्र्ा, शरीरविज्ञान, तंत्रज्ञान असे ३२ प्रयोग केले. २१३ तास अंतराळात असताना त्यांना ३० लाख ७० हजार मैलांचा प्रवास घडला.

१९९३ मध्ये रशिया-अमेरिकेतील शीतयुद्ध (कोल्ड वॉर) थंडावलं होतं. परस्परांच्या अंतराळ कार्यक्रमात सहयोग करण्याचा काळ आला होता. अमेरिकेचा कोलंबिया अंतरार मोहिमेत २२८ दिवस व्यतीत केलेल्या शेनॉन यांची ‘ऍटलॅन्टिस’ने रशियाच्या ‘मीर’ अंतराळ स्थानकाची भेट घेण्याच्या महत्त्वाकांशी कार्यक्रमात निवड झाली. या पाचव्या अंतराळ फेरीत (१९९६) ‘ऍटलॅन्टिस’ने ‘मीर’शी यशस्वी डॉकिंग (जुळणी) केल्यावर शेनॉन विविध वैज्ञानिक प्रयोगांसाठी रशियन अंतराळयात्रींसह काम करू लागल्या. हा काळ १८८ दिवसांचा होता. पुढे शेनॉनचा हा विक्रम हिंदुस्थानी वंशाच्या सुनीता विल्यम्स या अंतराळयात्रीने मोडला. मात्र पहिल्या विक्रमाबद्दल शेनॉन यांना ‘काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर’ लाभले. असा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर!