वैज्ञानिक वारसा

167

काल राष्ट्रीय विज्ञान दिवस होता. विज्ञानाच्या क्षेत्रात हिंदुस्थानींनी पूर्वापार जे कार्य केलं त्याचं स्मरण करता येतं आणि सध्या आपल्याकडे या क्षेत्रात काय चाललंय त्याचा आढावा अशा वेळी घेता येतो.

स्थापत्यकला, धातुकला, चित्रकला, वैद्यकीय ज्ञान तसंच गणित आणि खगोलशास्त्राचा विचार आपल्या देशात अनेक शतकांपूर्वी झाला. त्याविषयी लिखित माहिती काही विद्यांबाबतच स्पष्टपणे नोंदलेली आढळत असली तरी वैज्ञानिक आधार असलेल्या अनेक कलांचं जतन केलं गेलं.

खगोलशास्त्रापुरता विचार करायचा तर आपल्याकडे हे विज्ञान ज्योतिःशास्त्र म्हणून विकसित झालं. ज्योती म्हणजे आकाशातील चमचमणारे तारे आणि त्यांचं शास्त्र ते खऱ्या अर्थाने ज्योतिःशास्त्र यातून ग्रहगणित जन्माला आलं. नुसत्या डोळय़ांनी केलेल्या आकाश निरीक्षणाच्या आधारे काही आडाखे, सिद्धांत मांडण्यात आले.

वेदांग ज्योतिषाचा काळ इसवी सनाचा आधीचा मानला जातो. सिंधू संस्कृतीच्या काळात आपल्याकडे ग्रहताऱयांचा गणिती अभ्यास केला जात असे असं म्हटलं जातं. त्या काळात आपल्याकडच्या खगोलविदांचा ग्रीक संस्कृतीशी संबंध आल्याचंही म्हटलं जातं. विविध संस्कृतींमध्ये व्यापाराप्रमाणेच तेव्हा ज्ञान-विज्ञानाचंही आदान-प्रदान होत असणार असं याबाबत रोमन सिद्धांत यावरून ध्वनित होतं.

गुप्त काळ हे हिंदुस्थानातील सुवर्णयुग मानलं जातं. राजकीय स्थैर्याबरोबर येणाऱ्या समृद्धीने कला विज्ञानाचा विकास या काळात मोठ्या प्रमाणावर झाला. आर्यभट्टच्या काळात ‘सूर्यसिद्धांत’सारखी ग्रंथरचना झाली. वराहमिहिराच्या काळात सौर तबकडीचा शोध लागला. आर्यभट्टने ग्रहांचा कक्षा वर्तुळाकार नव्हे तर लंबवर्तुळाकार असल्याचे सांगितले. सूर्य-चंद्र-पृथ्वीची गती आणि ग्रहणं तसंच अवकाशातील ताऱयांच्या आकारांवरून नक्षत्रांची कल्पना अभ्यासकांनी मांडली.

लगाधाच्या काळात सौर ऋतुमानाशी चांद्रमासांची सांगड घालणाऱ्या दर तीन वर्षांनी एकदा येणाऱ्या अधिक महिन्याची गणिती रचना मांडली गेली. ग्रह, नक्षत्र, राशींचा परिचय झाला. नंतर आर्यभट्टाच्या आणि वराहमिहिरांच्या काळात खगोलीय अभ्यासात भर पडली. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पूर्वेला सर्व ग्रहताऱयांचा उदय आणि पश्चिमेला अस्त जाणवतो याचं ज्ञान या काळात झालं. पृथ्वीचा परीघ आणि चंद्रप्रकाश हा सूर्याचाच परावर्तित प्रकाश आहे यांचा शोध लागला. ब्रह्मगुप्ताच्या संहितेत पराशयाची (पॅरलॅक्स) कल्पना मांडली गेली. दरम्यान, ग्रीस तसंच अरबस्तान येथेही खगोलीय अभ्यास होत होत त्याचाही अभ्यास वराहमिहिराच्या काळात झाला असं म्हटलं जातं. पहिल्या भास्कराचार्यांनी लिहिलेल्या ‘महाभास्करीय’ आणि ‘लघुभास्करीय’ या ग्रंथांबरोबरच ‘आर्यभटीय भाष्य’ या ग्रंथात आर्यभट्टाच्या संशोधनाविषयी भाष्य केलं गेलं. या भास्कराचार्यांनी चंद्राच्या कला आणि चंद्र-सूर्यांच्या ग्रहणाविषयीचं गणित विकसित केलं. त्यांच्या नंतर नटेश्वरांनी त्यांच्या ‘सिद्धांता’त अक्षांश-रेखांश आणि संपातबिंदूची चर्चा केली.

आठव्या शतकातील लल्ल या संशोधकाने ग्रहाध्याय आणि गोलाध्याय यातून ग्रहगतीविषयीचं गणित मांडलं. ग्रहांच्या युती-प्रतियुती, चंद्र-सूर्याच्या गती इत्यादीचा विचार केला गेला. दुसरे भास्कराचार्य आपल्या महाराष्ट्रातील चाळीसगावजवळचे. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी खगोलशास्त्राचा साकल्याने अभ्यास करणारा सिद्धांतशिरोमणी हा ग्रंथ लिहिला. त्यातही ग्रहगणित, गोलाध्याय, बीजगणित इत्यादींचा समावेश होता. पितळखोऱ्याच्या डोंगरावरून ते आकाश निरीक्षण करीत असत. त्यांच्या नंतरच्या काळात श्रीपतीने ‘सिद्धांतशेखर’ हा ग्रंथ लिहिला तर पंधराव्या शतकात महेंद्र सुरी यांनी ‘यंत्र-राजा’ या ग्रंथात अक्षांश-रेखांश आणि ताऱ्यांचे स्थान निश्चित करणाऱ्या संदर्भपध्दतीची चर्चा केली. सोळाव्या शतकात नीलकंठ यांनी ‘तंत्रसंग्रह’ लिहून बुध व शुक्र या सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या अंतर्ग्रहांविषयी विशेष विचार केला. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील गणेश दैवज्ञ यांचा उल्लेख केला पाहिजे. खगोल विज्ञानाचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी ‘आभाळमाया’ जाणून घेण्याचे जे प्रयत्न केले होते त्याचा हा धावता आढावा. हिंदुस्थानी खगोलविदांच्या अभ्यासावर आधारित सवाई जयसिंग या राजाने जयपूर, उज्जैन, दिल्ली, काशी आणि मथुरा येथे ‘जंतर मंतर’ या खगोलीय ज्ञान देणाऱया वेधशाळांची निर्मिती केली.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या