ठसा : नवनाथ गोरे

>>प्रशांत गौतम

संघर्षमय जगण्याचा वास्तवपट मांडणाऱ्या नवनाथ गोरे या तरुण लेखकाच्या ‘फेसाटी’ या पहिल्याच कादंबरीचा सन्मान साहित्य अकादमीच्या युवा साहित्य या अत्यंत प्रतिष्ठsच्या पुरस्काराने झाला आहे. त्याचप्रमाणे या कादंबरीस आजपर्यंत तब्बल 20 पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामुळे अवघ्या साहित्यविश्वाचे लक्ष या प्रतिभावंताच्या लेखनाने वेधून घेतले. ‘फेसाटी’ हा शब्द शहरातल्या लोकांसाठी नवीन असला तरी तो दुष्काळाशी सामना करणाऱ्या समाजाच्या जगण्यातून आला आहे. त्यामुळे नवनाथ यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कादंबरीच्या लक्षवेधी शीर्षकाचीही चर्चा मराठी साहित्यविश्वात होऊ लागली आहे. जगताना इतके कष्ट उपसावेत की तोंडाला फेस यावा असाही एक या शब्दाचा अर्थ होय. सांगली जिल्हय़ातील जत तालुक्यातील मु. निगडी, पोस्ट उमदी हे नवनाथ यांचे गाव. तिथल्या परिसराची दुष्काळी भाग अशी ओळख सांगता येते. या गावाचा नि कर्नाटकचा नित्यनूतन संपर्क असतो. नवनाथ यांचे उमदी हे गाव आणि गावातील कुटुंब मेंढीपालन करून जगणारे आहे. या मेंढपाळ कुटुंबाचा परिस्थितीशी केवळ जगण्यासाठी चाललेला झगडा. तोच नवनाथ यांनी फेसाटीचा नायक बनून कादंबरीच्या पानापानांत मांडला आहे. ‘शिकलास तरच भले होईल’ असा त्याच्या आई&चा आग्रह आणि इच्छा होती आणि ती पूर्ण करणाऱ्या गोरे यांचा प्रयत्न आजही आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत नवनाथ यांनी दहावीत 36 टक्के मिळवले. चार वेळा बारावीत नापास झाल्यानंतर बारावीचा महत्त्वाचा टप्पा पार केला. बी.ए. परीक्षेत प्रथमश्रेणी मिळाल्यावर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ गाठले. या वाटचाटीच्या प्रवासात खाण्यापिण्याचे वांदे होते. निवासाचा आणि पोटापाण्याचा प्रश्न होता आणि महत्त्वाचे  म्हणजे त्याच्या डोळय़ांसमोर सतत घरातले अठराविश्व दारिद्रय़. घरात नऊ भावंडं, आईवडील. चार एकरची शेती असूनही दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणारे. घरात मोठा अपंग भाऊ आणि चार बहिणी हे चित्र असायचे. अशा खडतर परिस्थितीत शिक्षणाचा टप्पा पार करताना ते दिवसा उैसतोडणी काम करायचे आणि रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करायचे नाहीतर आवडीचे पुस्तक वाचायचे. बहुतेक वेळा शाळा आणि अभ्यास बुडायचा. आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा त्यांना दृढनिर्धार केला. आजही नवनाथ यांना पक्की नोकरी नाही. मराठी विषयात एम.ए. केल्यानंतर कोल्हापुरात मराठी विभागात डॉ. रणधीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहत्संशोधन प्रकल्पात काम करीत आहेत. नवनाथ यांना तेथील वास्तव्यात शिंदे यांनीच जगण्याचे बळ दिले व लेखनाची प्रेरणा दिली. आपल्यावर असलेले जगण्याचे ओझे हे कमी तर होणार नाही. किमान हलके व्हावे यासाठी ते वाचन, लेखनाकडे वळले. काही दिवाळी अंक, वाङ्मयीन नियतकालिक यातून कथांचे लेखन केले. हे लेखन ‘काळ’, ‘चपाटा’, ‘इपरित’, ‘वाचा’ या दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाले. ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्यपत्रिका’, ‘समाजप्रबोधन प्रकाशन ज्योती’ यात तमाशा आणि अन्य सामाजिक विषयांवर लेखन प्रसिद्ध झाले. आदिवासींची लोकगीतंही त्यांनी लिहिली, पण आयुष्याचा संघर्षपट आलेले अनुभव कुठे तरी प्रदीर्घ मांडावेत यासाठी कादंबरी लेखन सुरू केले. दिवसा काम आणि रात्री लेखन सुरू केले. त्यात दोन वर्षे खंड पडला. हे सर्व लेखन नवनाथ यांनी शिंदे यांना दाखवले आणि पुढचा प्रवासही सोपा झाला. शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेत ‘फेसाटी’ कादंबरीस साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत मिळाले. या कादंबरीची पहिली आवृत्ती पुण्याच्या पटवर्धन प्रकाशनाने प्रकाशित केली. पहिल्या कादंबरीचा प्रकाशन सोहळाही झाला नाही. त्यानंतर या लेखनाची ताकद, गुणविशेष साहित्य क्षेत्रातील जाणकारांच्या लक्षात आले. पुण्याच्याच अक्षर वाङ्मय प्रकाशनाने पुढील दोन आवृत्त्या छापल्या व हातोहात संपल्या. आता चौथी आवृत्तीही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. जगण्याचा डोंगर एवढा मोठा होता की तो उतरवण्यासाठी लेखनाशिवाय अन्य कोणताही पर्याय नवनाथ यांच्यासमोर नव्हता. त्यामुळे लिखाण हीच त्याला सदैव प्रेरणा आहे. ‘फेसाटी’ ही खरीखुरी गोष्ट आहे. जे सांगायचे ते जर तुम्हाला समजले असेल तर ते लिहिताना वेगळे काहीच करावे लागत नाही. सारे काही आपोआप कागदावर उतरत जाते. नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीच्या बाबतीत हेच घडले.