मुद्दा : नक्षलवादी हा एक शत्रूच!

2
फाईल फोटो

>> विवेक तवटे

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला 48 तास उरले असतानाच छत्तीसगढमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी आमदार भीमा मांडवी यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू व तीन जवानांना वीरमरण आले आहे. आमदार भीमा मांडवी यांच्यासारखा निष्ठावान कार्यकर्ता गमावल्याने अतीव दुःख होत असल्याच्या भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. 4 एप्रिल रोजी कांकेर जिह्यात नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 4 जवान शहीद तर 2 जवान जखमी झाले होते. देशातील नऊ राज्यांतील 35 जिह्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया होत आहेत. देशात नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात मोठय़ा संख्येत सुरक्षा दलांतील जवान व निष्पाप नागरिकांची हत्या झालेली आहे. ही संख्या पाकिस्तानशी सुरू असलेल्या छुप्या युद्धापेक्षा जास्त आहे. नक्षलग्रस्त जिह्यातून विविध विकासकामे केली. पोलीस, सुरक्षा दलांच्या दळणवळणासाठीच्या गरजा, दुर्गम भागातील रस्त्यांची बांधणी, हिंसाचारग्रस्त भागातील पोलीस ठाणी, चौक्यांची सुरक्षा वाढवणे आदी कामे करूनही कारवाया थांबल्या नाहीत. दहशतवादी कारवाया रोखण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे, पण नक्षलवादी कारवाया रोखण्यास केंद्र सरकारला अपयश येत आहे. नक्षलवाद संपवणे शक्य होणार नाही का?