एक अश्रू मेंढ्यांसाठी!

14

>> द्वारकानाथ संझगिरी

संपूर्ण कुटुंब एका गाडीने खूप वर्षांनंतर आठ-दहा दिवस फिरणं, हे एक वेगळंच सुख आहे आणि तुम्ही न्यूझीलंडमध्ये फिरत असाल तर सुखाची कल्पना अधिक विस्तारते.

निळं आकाश, त्यावर कंदिलासारखे लटकवलेले पांढरे ढग, बाजूला दिसणारं निळं पाणी आणि रंगीबेरंगी झाडं हे गाडीच्या प्रवासात ठायी ठायी दिसलं तर ज्याचं मन आनंदत नाही, त्याला आनंद म्हणजे काय हे ठाऊक नाही असं खुशाल समजावं. सूर्यप्रकाशाबरोबर पाण्याचा निळसरपणा बदलतो. कधी ते हिरवं दिसतं, कधी मयूरपंखी, कधी परमेश्वराने पेनात शाई भरताना धांदरटपणा करून शाई पाण्यात सांडली असं वाटतं. सध्या शरद ऋतू न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. पानांनी रंग बदलले आहेत. काही रंगीत पाने गळायला लागली आहेत. डोळे तृप्तच होत नाहीत ही निसर्गाची रंगपंचमी पाहून!

एकेकाळी न्यूझीलंडकडे हिंदुस्थानी पर्यटक ढुंकूनही पाहत नव्हता. मी पहिल्यांदा न्यूझीलंडला 1994 साली क्रिकेटच्या निमित्ताने गेलो. त्यानंतर थेट 2015 ला विश्वचषकाच्या वेळी! 1994 साली क्रिकेटप्रेमी हिंदुस्थानींसाठी न्यूझीलंड हा जॉन रिड, ग्लेन टर्नर, सर रिचर्ड हेडली, मार्टिन क्रो या दर्जेदार क्रिकेटपटूंचा फक्त देश होता. इरसाल पर्यटकसुद्धा तेव्हा युरोप- अमेरिकेत रमले होते. पृथ्वीच्या दक्षिणेस त्यांचा संबंध नव्हता. मी 1994 साली ऑकलंड, नेपियर, हॅमिल्टन, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च वगैरे फिरलो होतो. क्रिकेटव्यतिरिक्त त्या काळातल्या मला तीन गोष्टी आठवतात. ऑकलंडला विमानतळाहून बाहेर पडताना मी अभिमानास्पद पाटी पाहिली होती. “Newzealand is an Aidsfree Country” मला हसू फुटलं होतं. नाही नाही, रान मोकळं आहे म्हणून मी हसलो वगैरे मनातसुद्धा आणू नका. 35 लाख लोकसंख्या असलेल्या देशात एडस् शिरला तर किती हाहाकार माजला असता विचार करा. आजही त्याची लोकसंख्या 2017च्या सेन्ससप्रमाणे फक्त 48 लाख आहे. तेसुद्धा न्यूझीलंडने त्यांचे दरवाजे जगासाठी किलकिले केले म्हणून.

1994 साली पटेल, शहा, मेहता, लाडवा दिसायचे. आता मराठी माणसं भेटतात आणि ते सर्व न्यूझीलंडच्या उत्तर भागात आहेत. कारण हा भाग थंडीत फार गारठत नाही. मे संपला की, न्यूझीलंडचा दक्षिण भाग गारठतो, पण शहरातही न्यूझीलंडच्या छोटय़ा शहरात रस्त्यावर पत्ता विचारायला माणूस भेटत नाही. आता ठीक आहे. जीपीएस असल्यामुळे वाटाडय़ाची गरज नाही, पण 1994 साली फिरताना फार हाल व्हायचे. रस्त्यात कुत्रेसुद्धा दिसत नाहीत. ते असतात मालकाच्या अतिसुंदर बंगल्यात. क्वचितप्रसंगी एखादी मांजर आडवी जाते. ससे फिरताना दिसतात, पण आमच्या दोन-तीन हजार किलोमीटरच्या प्रवासात सातत्याने दिसल्या मेंढय़ा आणि धष्टपुष्ट गाई. मेंढय़ांची आजची तिथली संख्या आहे तीन कोटी! म्हणजे माणशी सात मेंढय़ा. एकेकाळी हे प्रमाण माणशी वीस होतं. त्यातल्या 97 टक्के मेंढय़ा दक्षिण न्यूझीलंडमध्ये दिसतात. दक्षिण न्यूझीलंडमध्ये तुम्ही फिरायला सुरुवात केली तर नजर पोहोचेल तिथपर्यंत बऱयाचदा हिरवं गवत दिसतं आणि त्यात चरणाऱया गलेलठ्ठ मेंढय़ा दिसतात. बऱयाचदा मेंढय़ांची सभा आहे वाटावी इतक्या त्या दाटीवाटीने बसलेल्या असतात. पण गंमत म्हणजे या मेंढय़ांना हाकणारा गुराखी मला दिसलाच नाही. जीन्समधला गुराखी कसा दिसतो हे पाहायची माझी तीक्र इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. क्वचितप्रसंगी एखाददोन कुत्रे दिसायचे. बहुदा ते कुत्रेच तो अवाढव्य कळप सांभाळत असावेत. दक्षिण न्यूझीलंडमध्ये एक टेकॅपो नावाचा नितांतसुंदर तलाव आहे. त्या तलावाच्या काठावर चक्क एका कुत्र्याची समाधी आहे. 1857 साली जॉन आणि बार्बरा या जोडप्याने त्या टेकॅपो तलावाच्या काठावर ‘शीप फार्म’ म्हणजे मेंढय़ांसाठी फार्म सुरू केलं. त्याची राखण कुत्रे करायचे. त्यांना ‘कॉलिज’ (Collies) म्हणतात. ते मूळचे स्कॉटलंड आणि इंग्लंडच्या उत्तरेकडचे. त्यामुळे न्यूझीलंडच्या थंडीत ते घरच्यासारखे राहिले. असं म्हणतात की, कळपांची राखणदारी त्यांच्या रक्तात असते. त्यांच्यामुळे तो मेंढय़ांचा फार्म विस्तारला. त्यांच्या श्रमाचे प्रतीक म्हणून ती कुत्र्याची समाधी 1968 साली बांधली गेली. त्या कुत्र्याच्या समाधीसमोर मी खरोखरच नतमस्तक झालो.

पण तुम्हाला ठाऊक आहे का की, मेंढी हा न्यूझीलंडचा प्राणी नाही? तोसुद्धा इमिग्रंटच आहे. जेम्स कूक या खलाशाने तो 1773 साली न्यूझीलंडमध्ये आणला आणि आजची लोकसंख्या पहा! त्याचा दुहेरी उपयोग होतो. एक म्हणजे लोकर. हा मेंढा दोन देशांना पैसे मिळवून देतो. एक म्हणजे अर्थात न्यूझीलंड आणि दुसरा देश म्हणजे चीन. न्यूझीलंडमधून लोकर चीनमध्ये जाते आणि स्वेटर बनून येतात, पण माणूस हा क्रूर असतो. माणसाला थंडीपासून बचाव करणारी लोकर देणाऱ्या मेंढय़ांची लोकर बऱ्याचदा थंडी संपायच्या किंचित आधी कापली जाते. नाहीतर वसंतात नैसर्गिकरीत्या ती गळायची शक्यता असते. त्यामुळे ती आधीच कापली जाते. बरं, ती कापताना माणसाला मजुरी तासाप्रमाणे न मिळता ‘जेवढी जास्त लोकर तेवढे पैसे जास्त’ या तत्त्वावर मिळते. म्हणूनच बऱ्याचदा मेंढरांना तीव्र इजा होते. लोकर काढल्यावर त्या थंडीने मरू शकतात आणि जखमांनीसुद्धा! मेंढय़ांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, चांगली लोकर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. बरं, माणूस तेव्हा तरी दया दाखवतो का? चला, तिने तिच्या छोटय़ा आयुष्यात आपल्याला भरपूर लोकर दिली म्हणून उर्वरित आयुष्यात पेन्शन म्हणून तिला फुकट गवत चरायची मुभा देऊया. छे, माणूस तिला कापतो आणि मटन म्हणून विकतो.

त्या कुत्र्याच्या पुतळय़ाप्रमाणे कुणीतरी प्राणिप्रेमी उठून मेंढय़ांचा एखादा पुतळा उभारेल का? आयुष्यभर मासे खाणाऱया कवी बोरकरांनी एकदा इच्छा व्यक्त केली होती की, मरणोत्तर त्यांचं शरीर समुद्रात फेकावं. म्हणजे मेल्यावर का होईना, त्यांचा उपयोग माशांना होईल. मेंढय़ांच्या बाबतीत तेही शक्य नाही. देवाने न्यूझीलंडमध्ये तयार केलेल्या निसर्गाच्या कॅलेंडरचा आस्वाद घेत फिरताना एक अश्रू मी नकळत मेंढय़ांसाठी गाळला. त्या दिवसापासून मी मटण बिर्याणी खाल्लेली नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या