‘बातमीज्वर’ आणि प्रसारमाध्यमांवरील आचारसंहिता

4

>> राधिका अघोर

खरं तर ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणजे – `तुम्ही पहिल्यांदा एखाद्या महत्त्वाच्या घटनेविषयी बातमी दाखवत असाल, जी आत्ताच घडली आहे किंवाघडते आहे – तपशील हाती यायचे आहेत. मात्र तरीही घटना घडल्याची खात्रीलायक माहिती किंवादृश्य तुमच्याकडे आहेत, तेव्हा तुम्ही जे दाखवता त्याला ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणतात. इथे तर एकच बातमी दिवसभर ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली, नव्हे चघळली जाते! आणि निवेदक/निवेदिका प्रत्येक वेळी तेवढ्याच उत्साहाने आरडाओरडा करत ही ‘ब्रेकिंग न्यूज’ घेऊन आपल्यावर आदळतात. खरोखर दचकायला होतं कधीकधी! शिवाय दिवसभर एकाच बातमीचे गुऱ्हाळ दाखवून तेच तेच सांगण्यामागचे तर्कशास्त्रही कळत नाही. यांचा ‘आयक्यू’ कमी असतो की प्रेक्षकांचा कमी आहे असे हे गृहीत धरतात हेच कळेनासे होते.

काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर एक पोस्ट फिरते आहे, “सध्याच्या परिस्थितीत सर्व प्रसारमाध्यमांवर बंदी घालून केवळ दूरदर्शनच्या बातम्याच दाखवल्या जाव्यात…सहमत असाल तर शेअर करा”…. ही पोस्ट अतिरंजित असली तरी लोकभावना या पातळीपर्यंत का पोहोचली, जनतेमध्ये प्रसारमाध्यमांविषयी इतकी चीड, उबग आणि अविश्वास का आहे, याचा आज गांभीर्याने विचार करण्याची नक्कीच गरज आहे. प्रसारमाध्यमे- मग ती मुद्रित असो वा दृकश्राव्य किंवा नव्याने आलेली वेब माध्यमे…या सर्वानीच याचे आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे.

गेल्या दोन दशकांत, हिंदुस्थाना खासगी दृकश्राव्य (ज्यांना आपण मराठीत इलेक्ट्रॉनिक चॅनेल म्हणतो!) वाहिन्या आल्या आणि विलक्षण वेगाने फोफावल्या. साधारणपणे दर चार महिन्यांनी एक नवी वृत्तवाहिनी आपल्याला बघायला मिळते. टीव्हीची क्रेझ आजही कायम आहे. त्यामुळे नव्याने पत्रकारिता शिकलेल्या मुलामुलींचा यात भरणा झालेला दिसतो. ताज्या दमाचा चमू हातात माईक घेऊन मोठ्या उत्साहात पत्रकारितेची सुरुवात करतो. रोजच्या दिवसाची सुरुवात करताना त्यांच्यासमोर एकच अजेंडा असतो – आज आपल्याला काहीतरी मसालेदार, चमचमीत बातमी द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या वाहिनीचा टीआरपी वाढेल आणि संपादक महोदय खूश होतील! या सर्व वाहिन्यांची टॅगलाईन वेगवेगळी असली तरी त्यांचे ब्रीदवाक्य एकच असते – `ब्रेकिंग न्यूज!’ या ब्रेकिंग न्यूजच्या नादात सच्ची पत्रकारिता कुठे हरवली याचा शोध घेण्याची कोणालाही गरज वाटत नाही आणि यातच पत्रकारितेची आजची शोकांतिका दडली आहे. ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादात आणि असंख्य वाहिन्यांच्या स्पर्धेत आपण देत आहोत त्या बातमीतली तथ्ये, तपशील, संदर्भ आणि अगदी भाषासुद्धा योग्य आहे का, याची काळजी घेतली जात नाही आणि हे एखाद वेळी होत नाही, तर आजकाल ही नित्याची बाब झाली आहे. टीआरपीची गणितं सांभाळायला हरकत नाही. मात्र त्यासाठी आधी आपली विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. ती आज आहे का? नसेल तर कशी निर्माण करता येईल याकडे बघता येईल.

खरं तर `ब्रेकिंग न्यूज’ म्हणजे – `तुम्ही पहिल्यांदा एखाद्या महत्त्वाच्या घटनेविषयी बातमी दाखवत असाल, जी आत्ताच घडली आहे किंवा घडते आहे – तपशील हाती यायचे आहेत. मात्र तरीही घटना घडल्याची खात्रीलायक माहिती किंवा दृश्य तुमच्याकडे आहेत, तेव्हा तुम्ही जे दाखवता त्याला ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणतात. इथे तर एकच बातमी दिवसभर ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली, नव्हे चघळली जाते! आणि निवेदक/निवेदिका प्रत्येक वेळी तेवढ्याच उत्साहाने आरडाओरडा करत ही ‘ब्रेकिंग न्यूज’ घेऊन आपल्यावर आदळतात. खरोखर दचकायला होतं कधीकधी! शिवाय दिवसभर एकाच बातमीचे गुऱ्हाळ दाखवून तेच तेच सांगण्यामागचे तर्कशास्त्रही कळत नाही. यांचा ‘आयक्यू’ कमी असतो की प्रेक्षकांचा कमी आहे असे हे गृहीत धरतात हेच मला कळेनासे होते.

बातमी लिहिताना, वाचताना किंवा सांगतानाही ती तटस्थपणे, संयमित सभ्य भाषेत आणि कुठलेही अभिनिवेश न ठेवता सांगितली जावी हा दुसरा नियम. मात्र खाजगी वृत्तवाहिन्यांच्या अनेक निवेदकांचा याबद्दल नेमका काय समज असतो देव जाणे. कानठळ्या बसतील असा धमकीवजा आवाज, बातमीत एखाद्यावर टीका असेल तर त्यांना अक्षरश: धारेवर धरल्यासारखा अभिनिवेश किंवा याच्या विरुद्ध बाजू म्हणजे एखादी राजकीय व्यक्ती, सेलेब्रिटी, खेळाडू यांच्या नावामागे दादा, ताई, काका असे ‘बातमी’तही म्हटले जाते! ‘उगीचच भावनिक होणे’ तर बहुतेक खासगी वृत्तवाहिनीच्या निवेदकांसाठी क्वालिफिकेशन मानले जात असावे. अनेकदा बातमीचे, विशेषत: आर्थिक बातमीचे ‘सुलभीकरण’ करण्याच्या नादात, ती चुकीचीही दाखवली जाते. घाईघाईत बातमी देण्याच्या नादात भाषा आणि व्याकरणाचा तर पार बोऱ्या वाजवलेला असतो. भाषेबद्दल गेल्या अनेक वर्षात मी निवेदिकांची अनुभवलेली आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे -अनुनासिक स्वर आणि प्रत्येक ‘श’चा उच्चार `ष’ असा करणे. षाळा, षबरी, षास्त्र… असे उच्चार म्हणजे षुद्ध भाषा अशी षिकवण यांना कोणी दिली षीवशंभोच जाणे! शिवाय सगळ्या मराठी निवेदिका ‘फ’चा उच्चार इंग्रजी ‘फुल’मधलाच करतात! ओष्ठ्व्य व्यंजन वगैरे काही सांगायला गेलं तर वेदांमधल्या ऋचा सांगते आहे, असे भाव असतात चेहऱ्यावर!

हे सगळे मुद्दे वरवरचे आक्षेप असू शकतील, ज्याकडे एकवेळ दुर्लक्ष करणं शक्य आहे. पण यापेक्षा अनेक गंभीर आरोप सध्या केवळ दृकश्राव्यच नव्हे तर सगळ्याच प्रसारमाध्यमांवर होत आहेत आणि दुर्दैवाने त्यात बरेचसे तथ्यही आहे. आम्ही ज्या वेळी पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकलो, तेव्हा पत्रकारितेची सहा मूल्ये – अचूकता, स्वातंत्र्य, निष्पक्षपणा, मानवता, जबाबदारीचे भान आणि सत्याशी बांधिलकी – असतात, असे शिकवले होते. यातली किती मूल्ये आज पाळली जातात, हा प्रश्न प्रत्येक पत्रकाराने स्वत:ला विचारण्याची नितांत गरज आहे. पत्रकारिता ही नागरिकांप्रती उत्तरदायी असते – मग ते तुमचे वाचक असोत, श्रोते किंवा प्रेक्षक! जनता आणि सत्य सोडून इतर कुणाशीही बांधिलकी नसलेली ती खरी पत्रकारिता. आज मात्र वाहिन्यांवरच्या अनेक बातम्या (टक्केवारीत कदाचित ७० टक्क्यांच्या पुढे जातील) `पेड न्यूज’ वाटाव्यात अशा असतात, असे अगदी सर्वसामान्य लोकदेखील सहज बोलतात. ‘पेड न्यूज’चा अर्थ इथे – बातमीसाठी केवळ ‘पैसे घेणे’ असा नाही, तर तो खूप व्यापक झाला आहे आणि म्हणूनच अत्यंत धोकादायकही! पत्रकाराची स्वत:ची मते (मूल्ये नव्हेत), त्याचे हितसंबंध, त्याच्या आवडीनिवडी किंवा आपल्याला सगळ्यातले सगळे कळते असा अहंगंड आजकाल प्रत्येक बातमीत जाणवतो. मग ती वृत्तपत्रातील असो, अथवा इतर माध्यमातील.

बातमीत `संपादकीय भूमिका’ असू नये, त्यासाठी अग्रलेख किंवा इतर लेख लिहिण्याची मुभा असते, याचा विसर आज भल्याभल्या ज्येष्ठ पत्रकारांना पडला आहे. केवळ पत्रकारच नव्हे तर अनेक माध्यम समूहेदेखील पत्रकारिता दावणीला बांधून सर्रास हे करत असतात! आपली मते लादण्यासाठी बातमीची हवी तशी तोडमोड करण्याची प्रवृत्ती आजकाल इतकी वाढली आहे की मूळ `कृष्णधवल’ असलेली वर्तमानपत्रे आज सर्वसामान्य जनतेलाही, `वेगवगेळ्या रंगातील’ दिसू लागली आहेत. बातमी देताना तथ्ये, पुरावे, अचूकता, मांडलेल्या मुद्याला आधार देणारी आकडेवारी, हे तर अगदी दुर्मिळ होत चालले आहे. खरे तर सर्वप्रकारच्या दृष्टिकोनांचे, मतांचे स्वागत करा, ती स्वीकारा, तुमच्या दृष्टीने ती मते योग्य नसतील तरीही त्यांचा विरोध करू नका असे पत्रकारितेचे मूल्य आहे. मात्र ते पाळले जाते का? उदाहरणार्थ एखाद्या राजकीय नेत्याची सभा, पत्रपरिषद किंवा एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीचा कार्यक्रम याची बातमी बघा-कोणत्या वाहिनीवर किंवा वृत्तपत्रात ही बातमी कशी येणार, शब्दयोजना काय असेल, जागा कुठे आणि किती, बातमीची मांडणी कशी असेल, हे आजकाल सगळे लोक आधीच सहज सांगू शकतात आणि ते तंतोतंत तसेच लिहिले असते! काही वर्तमानपत्रे उघडपणे ‘मुखपत्रे’ म्हणून काम करतात, तर काही छुपे अजेंडे चालवतात. यात गळफास लागतो तो मात्र पत्रकारितेला – दुर्दैवाने अगदी मोठमोठी प्रतिष्ठित माध्यमसमूहेही आता या गर्तेत वाहवत चालली आहेत. यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की, प्रत्येकाला आपली मते नसावीत का? तर असावीत. एक व्यक्ती म्हणून आपली मते असणे, एखाद्या विचारसरणीला पाठिंबा असणे किंवानसणे यात काहीही गैर नाही, उलट ते स्वाभाविक आहे आणि व्यक्ती म्हणून अशी मते मांडण्यासाठी आज सोशल मीडिया नावाचे व्यासपीठदेखील उपलब्ध आहे. मात्र, पत्रकार म्हणून तुमची वैयक्तिक मते बातमीत घालणे आणि संपादकीयात आपल्या सोयीची तथ्ये मांडून त्यानुसार मांडणी करणे ही जनतेची दिशाभूल आहे आणि व्यवसायाशी केलेली प्रतारणा! आज दुर्दैवाने ‘आम्ही सांगू तेच खरे’ अहंकारापायी माध्यमांनी जनतेची मानसिकता समजून घेण्याची आकलनशक्ती गमावत, समाजाशी असलेली नाळ तोडून टाकली आहे.

आजकालच्या डिजिटल युगात प्रत्येक वाहिनीचे, वृत्तपत्राचे स्वत:चे वेबपेज किंवा पोर्टल (ई-आवृत्ती) आहे, जिथे वाचक बातमीवर लगेच प्रतिक्रिया देत असतात. यातील काही प्रतिक्रिया खरोखर बातमीवर गंभीर आक्षेप घेणाऱ्या असतात. बातमीतल्या `वस्तुस्थितीत्मक चुका’ दाखवणाऱ्या असतात. त्यापैकी किती प्रतिक्रियांची दखल घेतली जाते? बातमीत सुधारणा करण्याइतकी लवचिकता आणि तयारी का नसते? याला प्रसारमाध्यमांना सर्वज्ञतेच्या भावनेतून आलेला अहंकार तर कारणीभूत नाही ना? याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे.

अचूकता हा कोणत्याही बातमीचा पाया असतो-त्यावर संदर्भ, आकलन/स्पष्टीकरण, समीक्षा, विवाद आणि विश्लेषण अशा विटांच्या आधारे बातमी बांधली जाते. ज्या माहितीवर बातमी आधारलेली असते, त्या माहितीचा स्रोतदेखील नागरिकांना उपलब्ध करून देणे हेही पत्रकारितेचे नैतिक कर्तव्य आहे. बातमी गोळा करताना प्रामाणिकपणा, धैर्य आणि आकलनाची बुद्धी असायला हवी. आपले माहितीचे स्रोत आणि पद्धती याबाबत पत्रकार तटस्थ असायलाच हवा. आपण दिलेल्या बातमीवरून वाचक/प्रेक्षक त्यांना हवा तो निष्कर्ष काढतील, मात्र पत्रकाराने त्यात निष्कर्ष काढू नये. त्याने केवळ `जे आणि जसे घडले ते’ सांगावे असे पत्रकारितेची आचारसंहिता सांगते.

वृत्तवाहिन्यांसाठी छुप्या मार्गाने म्हणजे ‘स्टिंग ऑपरेशन’सारखे प्रकार अगदीच पर्याय नसेल तरच वापरावे असेही संकेत आहेत. जर सर्वसामान्य मार्गाने तथ्ये किंवाहवी ती माहिती मिळत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून `स्टिंग ऑपरेशन’ केले जावे. मात्र आजकाल तेही सर्रास केले जाते आणि अनेकदा त्याचा वापर स्टोरी करण्यासाठी नाही, तर ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो, असा एक गंभीर आरोपही केला जातो. याच अनुषंगाने अलीकडेच मुंबईतल्याचा एका पत्रकार मित्राने सांगितलेला किस्सा सांगायला आवडेल -पत्रकार असल्यामुळे त्याचे लग्न जमत नव्हते, पूर्वीही असे होत असे. मात्र त्या वेळी बहुतेकदा ‘कमी पगार’ हे कारण असायचे, आता मात्र मुलीकडच्यांनी दिलेलं कारण गंभीर आहे – बहुतांश पत्रकार हे ‘खंडणीखोर’ असतात असा त्यांचा अनुभव होता. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणारा हा व्यवसाय इतका रसातळाला गेला आहे का? प्रसारमाध्यमे आणि त्यांचे मालक यावर गांभीर्याने विचार करतील का?

हे सर्व आरोप प्रसारमाध्यमांवर गेली अनेक वर्षे होत आहेतच. काही प्रसारमाध्यमांनी त्यावर उत्तरेही दिली आहेत. मात्र पुलवामा हल्ल्यानंतरची स्थिती आणि हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानचा तणाव याच्या पार्श्वभूमीवर वाहिन्यांना जो ‘उत्साह’ आलेला आहे, त्याने प्रेक्षकांना अक्षरश: वात आणला आहे! वर दिलेली पोस्ट प्रेक्षकांचा तो उद्वेग व्यक्त करणारी आहे. एखादा मोठा अपघात असो किंवा मग दहशतवादी हल्ले, वाहिन्यांना जो ऊत येतो, तो सर्वसामान्यांना वैताग आणणारा असतो. मग आरडाओरड, ब्रेकिंग न्यूजचा पाऊस, घटना पुरती न कळताही लोकांकडून आग्रहाने मागितलेल्या प्रतिक्रिया, `ग्राफिकच्या माध्यमातून’ समजावून सांगणे, या सगळ्या प्रकारात ते असंख्य चुका करतात, बेजबाबदार वार्तांकन करतात. देशाची सुरक्षा, राजनैतिक मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरण अशा गंभीर विषयांवरही उथळ, बालिश, भडक, असंवेदनशील आणि आक्षेपार्ह बातम्या सवंग (शिवराळही) भाषेत दिल्या जातात. कोणतीही शहानिशा न करता केवळ ‘टीआरपी’साठी बातम्या चालवल्या जातात. अनेकदा या बेजबाबदार वार्तांकनाचा लाभ शत्रू किंवासमाजकंटकांनी घेतल्याची देखील उदाहरणे समोर आली आहेत. २६/११ चा हल्ला, सावित्री नदीवरचा अपघात, कसाब किंवायाकूब मेमनची फाशी, काश्मीरमधील स्थिती या घटना म्हणजे वाहिन्यांसाठी जणू ‘पर्वणी’ असतात. अशा काळात होणारे वादविवाद हा तर आणखी एका विस्तृत लेखाचा विषय होऊ शकेल! शब्दमर्यादेमुळे याची उदाहरणे देता येत नाहीत, मात्र ती सगळ्यांनाच माहीत आहेतच!

आता मी सुरुवातीला लिहिलेल्या पोस्टच्या दुसऱ्या भागाकडे येते. इतर वाहिन्या बंद करून केवळ दूरदर्शन (आणि आकाशवाणी)च्याच बातम्या दाखवायला हव्यात, ही त्या पोस्टमधील भावना. काय फरक आहे या सरकारी आणि खासगी वाहिन्यांमध्ये? गेली १२ वर्षे मी या दोन्ही सरकारी माध्यमांच्या वृत्तविभागात काम करते आहे. त्यामुळे याविषयी मी स्वानुभावाने अनेक मते सांगू शकते. प्रसारमाध्यमांच्या भाऊगर्दीत या दोन्ही माध्यमांमध्ये बातमीदारीची सर्व मूल्ये आजही तंतोतंत पाळली जातात. कितीही महत्त्वाची बातमी असेल तरी, तथ्ये हाती आल्याशिवाय ती प्रसारित केली जात नाही. एकवेळ बातमी नाही दिली तरी चालेल, पण ती चुकीची किंवाअर्धवट जाता कामा नये, हे तत्त्व पाळले जाते. अगदी महत्त्वाची बातमी, जी जनहितार्थ देणे गरजेचे आहे, ती देतानाही ‘असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे’ अशी ओळ घालूनच दिली जाते. `कथित’ शब्दाचा वापर केला जातो. केवळ सरकारी वृत्तसंस्था आणि आमचे स्वत:चे प्रतिनिधी हेच स्रोत वापरले जातात, इतर कुठले नाही. बातमीपत्रात, राजकीय बातम्यांइतकेच किंबहुना अनेकदा अधिक महत्त्व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, सांस्कृतिक, क्रीडा, समाजप्रबोधन, पर्यावरण, शासकीय धोरणे, योजना, विकासात्मक कार्यक्रम, परदेशातील घडामोडी, हवामान या सगळ्या विषयांना दिले जाते. आणि तेही केवळ अर्ध्या तासाच्या बातमीपत्रात! या सगळ्या विषयांना न्याय मिळेल, श्रोते-प्रेक्षकांना एका बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी कळतील, यावर भर असतो. बातमीची भाषा संयत असते, वृत्तनिवेदनाची शैली संयमी असते.
दूरदर्शन -आकाशवाणीचे निवेदक कधीही आरडाओरडा करताना दिसणार नाहीत. अगदी मुलाखत घेतानाही नाही. न्यायप्रवीष्ट प्रकरणे, धार्मिक, सामुदायिक दंगल किंवा हिंसेच्या घटना, अपघातातील मृतांची आकडेवारी किंवा आता असलेली तणावाची परिस्थती अशा सगळ्या वेळी लोकांसमोर केवळ तथ्ये मांडली जातील आणि तीही कोणत्याही समुदायाचे नाव न घेता, तटस्थपणे जातील याचे भान ठेवले जाते. एखाद्या राजकीय नेत्याने, अगदी सत्ताधारी पक्षाच्याही-प्रचारसभेत आक्षेपार्ह भाषा वापरली असेल, तर त्यातील भडक शब्द किंवा निराधार आरोप टाळून संयमी शब्दात केवळ अन्वयार्थ जनतेपर्यंत पोहोचवला जातो. आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याची दक्षता कायम घेतली जाते. विरोधी पक्षांची मते टीका, दुर्बलांचा आवाज यालाही स्थान दिले जाते. सरकारी माध्यम असल्याने स्वाभाविकपणे सरकारी बातम्यांना प्राधान्य दिले जाणार, हे तर आहेच.

मात्र इथे हेही आवर्जून नमूद करेन की `अमुक पक्षाच्या, संघटनेच्या बातम्या घ्यायच्या नाहीत’ असा दबाव कधीही नसतो. मी दोन सरकारांच्या काळात काम केले आहे, मात्र हा अनुभव कधीही आला नाही. दोन गोष्टी-सरकारी धोरणांना छेद देणारी बातमी केली जाऊ शकत नाही आणि सरकारी योजना जनतेपर्यत पोहोचवण्याचा आग्रह धरला जातो. तसेच देशविरोधी संघटना किंवाव्यक्तींचे उदात्तीकरण केले जात नाही. माझ्या मते, ही बंधने न्याय्य आणि यथोचित आहेत. जनतेचा सरकारी बातम्यांवर विश्वास असतो, त्यामागे हीच सगळी कारणे आहेत. मग आमच्या वृत्त विभागात काम करणाऱ्यांना स्वत:ची मते नाहीत का? व्यक्ती म्हणून त्यांच्या वेगवगेळ्या भूमिका नाहीत का? तर नक्कीच आहेत. मात्र ही मते बातमीत डोकावणार नाहीत याची दक्षता कायम घेतली जाते आणि हेच या दोन्ही माध्यमांचे वेगळेपण आहे. या दोन्ही माध्यमांमध्ये आजही अनेक उणिवा असल्या तरी `आवश्यकतेपेक्षा जास्त’ असे काही नाही! आधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ या तुलनेत सरकारी वाहिन्या खासगी वाहिन्यांच्या मागे असल्या तरीही त्या लोकप्रिय असण्याचे कारण, लोकांना भडक, मसालेदार नाही तर केवळ ‘बातम्या’ बघायच्या असतात. खासगी वाहिन्यांवरील बातम्या आणि मालिका यांच्यात आज तसा फारसा फरक राहिलेला नाही. पूर्वी 13 भागांच्या मालिका असत, तेव्हा त्यात केवळ ‘कथानक’ प्रभावीपणे मांडण्याचे उद्दिष्ट असे. मग उत्तम मोजके संवाद, अभिनय, दृश्य आणि अचूक संकलन यातून ‘गोष्ट’ प्रेक्षकांना सांगितली जात असे. दूरदर्शन/आकाशवाणीचेही अगदी तसेच आहे. आम्हाला कमीत कमी वेळात नेमकी बातमी लोकांपर्यत पोचवायची असते. आमचे संपादक कायम कात्री हातात घेऊनच बसले असतात! एकही अनावश्यक शब्द जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. 24 तास चालणाऱ्या वाहिन्या मात्र `डेली सोप’ सारख्या बातम्या `चालवत’ असतात! लोकांना हेच बघायला आवडतं असा सोयीस्कर गैरसमज करून घेत वाट्टेल ते प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या या वाहिन्यांनी आणि पत्रकारांनी जनतेची त्यांच्याविषयीची खरी मते ऐकलीत तर अनेक पत्रकारांवर ‘महा’अज्ञातवासात जाण्याची वेळ येईल. सरकारच्या ताब्यात असलेली आणि सरकारवर थेट टीका न करू शकणारी माध्यमेदेखील लोकांना खासगी माध्यमांपेक्षा विश्वासार्ह बातम्या देणारी वाटू लागली आहेत, यातूनच खासगी माध्यमांची अधोगती स्पष्ट होते.

प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. म्हणजे संसद, न्यायपालिका आणि कायदेमंडळ ही तीन स्तंभे जे काम करू शकत नाही, ते काम माध्यमांनी करावं अशी अपेक्षा असते. माध्यमे सरकारला प्रश्न विचारणारे जागले असायला हवे. आजच्या वेगवान युगात, इंटरनेट, मोबाईल अशा साधनातून माध्यमांनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात खूपच व्यापक जागा घेतली आहे. त्यांचा प्रभाव आणि ताकद प्रचंड वाढली आहे, माध्यमसमूहांनी मनात आणले तर एखाद्याचे आयुष्य, करियर घडवू शकतात, किंवा उद्ध्वस्तही करू शकतात! उदाहरणार्थ आर आर पाटील यांचे बडेबडे शहरो मे, हे वाक्य किंवा नरेंद्र मोदी यांचे `परदेशातील काळा पैसा हिंदुस्थानात आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार..” अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकली असतील, प्रत्यक्षात ती तशी खरंच बोलली गेलीत का? याची शहानिशा एकाही पत्रकाराला करावीशी वाटत नाही.

माध्यमे एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली आहेत, हे म्हणणेही फार वरवरचे ठरेल. हे त्याहीपलिकडचे प्रचंड व्यापक आणि खोलवर पोहोचलेले अर्थकारण झालेले आहे. यात अनेकदा संपादक, पत्रकार यांचीदेखील काही प्रमाणात गळचेपी होते, हे ही समजण्यासारखे आहे. मात्र जितकी ताकद जास्त, तेवढी जबाबदारीही अधिक! याचे भान ‘प्रत्येक क्षणी’ ठेवत, आपल्या मर्यादा ओळखणे आणि त्या सांभाळणे, एवढे करता आले तरी खूप बदल होईल. आपण जगाचे तारणहार आहोत, सर्वज्ञ आहोत, न्यायाधीश आहोत, हा समज आधी बाजूला ठेवा. एकदा पत्रकारितेची पदवी आणि नोकरी मिळाली म्हणजे संपलं, असे नाही. आपण जनतेला उत्तरदायी आहोत, हे समजून घेत कठोर परिश्रम, अभ्यास यातून आपली कुवत आणि समज सतत वाढवत ठेवणे पत्रकारासाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे एखाद्या डॉक्टरने अद्यायावत उपचारांचे सतत ज्ञान ठेवणे! पण अभ्यास करण्याचे आजकालच्या पत्रकारांना अगदी वावडे आहे.

त्याशिवाय, केवळ बातमी आणि त्यामागचे अन्वयार्थ उलगडून सांगणे हे आपले काम आहे, याचे भान ठेवले पाहिजे. बातमी देणे आणि व्यक्तीचा सन्मान यात समतोल राखा. बातमी करण्याचा अधिकार म्हणजे कोणाविषयीही उद्धट वागण्याचा, शिक्षा देण्याचा अथवा अवमान करण्याचा परवाना नाही, याचे भान ठेवा. तुमच्या बातमीमुळे ज्यांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, अशा लोकांच्या बाबतीत सहानुभूती बाळगा.विशेषत: बालगुन्हेगार, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या व्यक्ती यांच्याविषयी वार्तांकन करताना माणुसकीचे भान ठेवले पाहिजे. व्यक्तिगत स्वातंत्र्य, प्रत्येक समुदायाची संस्कृती याचेही भान ठेवा. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींच्याही खासगी आयुष्यात हस्तक्षेप नको.

युद्धाच्या, सैनिकी कारवाईच्या बातम्या देताना प्रश्न जरुर विचारले जावेत. मात्र राष्ट्रीय हिताशी तडजोड करू नका. त्याच वेळी दुसऱ्या देशांच्याही -अगदी शत्रुराष्ट्राच्याही सार्वभौमत्वाचा आदर ठेवा. वृत्तपत्रात येणारी व्यंगचित्रेदेखील चांगली सकस विनोदर्नििमती करणारी असावीत, एखाद्याला चिमटा घेणे किंवात्याच्यावर टीका करणे म्हणजे तेजोभंग किंवामानभंग करण्याचा अधिकार नाही. मुख्य म्हणजे -सर्वसामान्य नागरिकांनीदेखील केवळ पटत नसेल तर बघू नका, रिमोट तुमच्या हातात आहे ना?” इतकी मर्यादित भूमिका घेऊ नये. काही चुकीचे, आक्षेपार्ह लिहिले-बोलले गेले असेल, तर त्याची तक्रार करण्याचा अधिकार आणि व्यवस्था दोन्हीही आहे, त्याचा वापर करावा. ज्यांचे कुठलेही हितसंबंध नाहीत, ज्यांना आपली ‘इमेज’ खराब होण्याची भीती नाही, अशी सर्वसामान्य जनताच या भस्मासुराला आवर घालू शकते. त्यावर अंकुश ठेवू शकते!

पत्रकारितेसाठी अशी अनेक नैतिक मूल्ये खरे तर सांगता येतील, पण काही कायदेशीर गोष्टी सोडल्या तर अनेक मूल्ये ‘नैतिक’ आहेत, ज्याचे पालन ज्याने त्याने आपली सदसद्विवेकबुद्धी, व्यवसायाप्रती निष्ठा आणि जनतेशी असलेली बांधिलकी यानुसार करायचे आहे. आपली गेलेली विश्वासार्हता आणि समाजातला आदर आपण परत मिळवू शकू का? याचे आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे. अन्यथा, बातम्या नको, पण वाहिन्या आणि त्यांचे अँकर आवरा! ही सर्वसामान्यांची भावना अधिक घट्ट होत जाईल! माध्यमांनो, जग बदलण्याआधी स्वत:त बदल करा. वेळीच सावध व्हा! उघडा डोळे बघा नीट आणि पुढे जाणारे पाऊल वाकडं पडत नाहीये ना, याची दक्षता घ्या आणि प्रेक्षकांचा विश्वास पुन्हा संपादन करा.