
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
ब्रह्मपुत्रेवरील चौथ्या मोठ्या बोगिबिलच्या पुलाची निर्मिती चार वर्षांत पूर्ण झाली आहे. ईशान्य हिंदुस्थानातील दळणवळण साधनांची निर्मिती वेगात केली जात आहे. त्यामुळे तेथील आर्थिक प्रगतीला मोठा वाव मिळणार आहे. मात्र हीच गोष्ट नको असल्याने ईशान्य हिंदुस्थान पुन्हा अस्थिर करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान तेथे पुन्हा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात मुख्य भूमिका निभावत आहे तो परेश बरुआ आणि त्याची दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम.
देशाला भेडसावणाऱ्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या चार वर्षांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी आणि हिंसाचार फारच कमी झाला आहे. मात्र हिंदुस्थानचे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे तिथली बंडखोरी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात मुख्य भूमिका निभावत आहे तो परेश बरुआ आणि त्याची दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा). बांगलादेशी घुसखोरी आसाम आणि ईशान्य हिंदुस्थानात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली होती. ती थांबवण्यासाठी ही दहशतवादी संस्था निर्माण झाली. त्यावेळची विद्यार्थ्यांची संघटना आसाम गण परिषदेचीच ती एक संलग्न संस्था होती. त्यांनी बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यासाठी दहशतवाद सुरू केला. या संघटनेचे तळ आणि प्रशिक्षण केंद्रे सुरुवातीला चीनमध्ये होती. तिथून चीनने हाकलून देत त्यांना बांगलादेशात तळ ठोकायला भाग पाडले. बांगलादेशमध्ये हसीना वाजेद यांचे सरकार आल्यापासून त्यांना दम देऊन आपली दहशतवादी कृत्ये, जी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम बांगलादेशी घुसखोरांविरोधात करत होती ती थांबवण्यास भाग पाडले.
शेवटी ते बांगलादेशातील तळ हलवून म्यानमारमध्ये गेले. त्यानंतर एक सामरिक बदल करून उल्फा आता बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध काहीच बोलत नाही. ती बिहारी आणि इतर ईशान्य हिंदुस्थानात स्थायिक झालेले किंवा कामासाठी आलेले इतर हिंदुस्थानीयांविरुद्ध हिंसाचार करते. काही महिन्यांपूर्वी उल्फाच्या बंडखोरांनी सहा बिहारी नागरिकांना मारले होते.
ईशान्य हिंदुस्थानमधील इतर दहशतवादी गटांची क्षमता आता फारच कमी झालेली आहे. विशेषतः दोन मोठे गट आहेत. पहिला म्हणजे एनएससीएन खपलांग, जो हिंदुस्थान सरकारविरुद्ध अजूनही कारवाया करू इच्छितो. त्यांचा नेत खपलांग याचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या जागी कोनयाक हा हिंदुस्थानी नागा आला. हा हिंदुस्थानी नागा वाटाघाटीकरिता तयार होता म्हणून एमएससीएनकेने त्याला संस्थेतून काढून टाकत त्याच्या जागी याँग औग या म्यानमारी नागाला मुख्य बनवले. त्याने पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करायचे ठरवले आहे. चीनने या परिस्थितीचा फायदा घेत नागा बंडखोर आणि मणिपूरमधील बंडखोर गटांना उल्फाच्या बरोबर एकत्र येऊन एक संयुक्त संस्था स्थापन करण्यास भाग पाडले आहे. त्याचे नाव आहे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ वेस्टर्न साऊथ ईस्ट एशिया ( यूएनएलएफडब्ल्यू) ही संस्था ईशान्य हिंदुस्थानातील सर्वच बंडखोर गटांना उल्फाच्या नेतृत्वाखाली आणून हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करण्यास भाग पाडत आहे. त्यांना चीनची मदत आहे.
हिंदुस्थान सरकारने ठरवले आहे की, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सप्रमाणे पकडल्या गेलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांमध्ये बांगलादेशातून आलेले हिंदू आणि इतर अल्पसंख्याक ख्रिश्चन, बौद्ध यांना हिंदुस्थानी नागरिक बनवणार आहे. हे कारण पुढे करून या गटांनी हिंदुस्थानविरोधात हिंसाचार करायचा असे ठरवले आहे. ईशान्य हिंदुस्थानातील हिंसेच्या आकडेवारीकडे पाहिल्यास 2014 सालाआधी प्रत्येक वर्षी 350 ते 500 सुरक्षाकर्मी, बंडखोर आणि सामान्य नागरिक मारले जात. 2018 मध्ये ही संख्या पन्नासहून कमी झाली आहे. म्हणजेच हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. या सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र करून हिंसाचार वाढवण्याचा चीनचा कुटील डाव आहे.
हिंदुस्थानने चीनशी संवाद साधत परेश बरुआ या उल्फाच्या प्रमुखाला हिंदुस्थानच्या स्वाधीन करावे असे सांगितले होते. मात्र चीनने नकारच दिला आहे. माओवादी दहशतवादी (माओवादी नक्षलवादी) संघटना मध्य हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करते. चीन माओवादी आणि ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.
हिंदुस्थानी सैन्य मोठ्या संख्येने ईशान्य हिंदुस्थानात तैनात आहेच. त्यांच्या कारवाया गरज पडेल तेव्हा सुरू असतात. मात्र काही ऑक्टिव्हिस्ट, वाट चुकलेले विचारवंत यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन मणिपूरमध्ये हिंदुस्थानी लष्कर करत असलेल्या कारवाया थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अशा व्यक्ती आणि संस्था यांचा कायदेशीर समाचार घेतला पाहिजे. त्याशिवाय म्यानमारमधील या बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. गेल्या चार वर्षांत ईशान्य हिंदुस्थानात नवीन सरकारे तिथे आली आहेत. ईशान्य हिंदुस्थानात विकासकामांनाही वेग आला आहे. त्यामुळे आर्थिक विकास सुरू झाला आहे. ब्रह्मपुत्रेवरील चौथ्या मोठ्या बोगिबिलच्या पुलाची निर्मिती चार वर्षांत पूर्ण झाली आहे. ईशान्य हिंदुस्थानातील दळणवळण साधनांची निर्मिती वेगात केली जात आहे. त्यामुळे तेथील आर्थिक प्रगतीला मोठा वाव मिळणार आहे. मात्र हीच गोष्ट नको असल्याने ईशान्य हिंदुस्थान पुन्हा अस्थिर करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान तेथे पुन्हा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचाराला अटकाव करण्यासाठी जितक्या सैनिकांना प्राण गमवावे लागले, तितके बळी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढतानादेखील गेलेले नाहीत! 1994 ते 6 जानेवारी 2019 पर्यंत 10 हजार 296 सामान्य नागरिक, दोन हजार 757 सैनिक आणि आठ हजार 535 दहशतवादी/बंडखोर मिळून 21 हजार 588 ईशान्य हिंदुस्थानात मारले गेले. आज त्या प्रदेशाला विकासाची फळे चाखायला न मिळण्याचे प्रमुख कारण हिंसा हेच आहे. मात्र 2018-19 मध्ये हिंसाचार कमी झाला असून 6 जानेवारी 2019 पर्यंत 19 सामान्य नागरिक, 15 सैनिक आणि 38 दहशतवादी/बंडखोर मिळून 72 जण मारले गेले आहेत.