जुनं ते सोनं!

1

>> क्षितिज झारापकर

आमच्याकडे जुनं सोनं असलं की, सोनाराच्या दुकानात तुम्हाला वेगळा रिस्पेक्ट मिळतो. कारण प्युअर म्हणतात तसं ते सोनं असतं. आजीचा चपलाहार आणि आईचं मंगळसूत्र आजच्या महिलांना भुरळ घालतंच. अगदी हेच मराठी नाटकांचं आहे. निर्मात्यांसाठी जुनी मराठी नाटकं ही प्रेक्षक पसंतीत पास असतात आणि प्रेक्षकांच्या मते जुन्या मराठी नाटकात पैसा वसुलीची गॅरेन्टी असते. म्हणूनच जुनी नाटकं रंगभूमीवर पुनः पुन्हा येत राहतात.

‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक नाटक सध्या जोरात चालू आहे. नाटक विनोदी आहे. त्यामुळे ते कुठल्याही प्रेक्षकाच्या पसंतीस उतरतं. ‘टूरटूर’नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना सुपरस्टार बनवणारं हे नाटक. निखळ प्रासंगिक विनोद आणि त्यावर सभोवतालच्या घडामोडींची खमंग फोडणी अशी या नाटकाची जातकुळी आहे. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करून जातं.

शिरवाडकरांचं ‘नटसम्राट’ हे मराठीतलं सर्वात गाजलेलं नाटक. मुळात शिरवाडकरांनी याच्यात एका नटाची शोकांतिका सांगून समस्त नट मंडळीच या नाटकाच्या प्रेमात पडली. नाटकातले नट त्या नाटकाच्या प्रेमात पडले की मग प्रेक्षक प्रेमात पडायला वेळ लागत नाही. सध्या मोहन जोशी ‘नटसम्राट’ करताहेत.

‘अलबत्या गलबत्या’ हे मराठी रसिकांना सर्वात भावलेलं बालनाटय़. झी मराठीच्या जिवावर आजही ही चेटकीण उंच उडते आहे. आपली संस्कृती जपण्याचं कार्य बालनाटय़ करतात. त्यात आताच्या ‘अलबत्या गलबत्या’मध्ये चेटकीण अक्षरशः उडते आणि हे बालप्रेक्षकांना थक्क करून टाकते. घरातल्या फादरला त्रास नको म्हणून मराठी पालकांनी मुलांना कॉन्व्हेन्टमधल्या फादरच्या ताब्यात दिलं. पण मतकरींचं ‘अलबत्या गलबत्या’ पुन्हा आलं आणि आपली भाषा आपला वारसा जोपासण्याचा मार्ग मराठी पालकांना मिळाला. लहान मुलांना परीकथा आवडतात. उडणे हा पऱयांचा आणि चेटकीणींचा कॉमन गुणधर्म असल्याने हल्लीची लहान मुलंदेखील ‘अलबत्या गलबत्या’मध्ये खूश आहेत आणि हाऊसफुल्ल गर्दीत ‘अलबत्या गलबत्या’चे प्रयोग सुरू आहेत.

‘आरण्यक’ हे एक विलक्षण नाटक पुन्हा जोमात सुरू आहे. हिंदुस्थानींना महाभारत खूप प्रिय आहे. ‘आरण्यक’ आपल्याला महाभारतातली गोष्ट सांगते. सध्या सगळय़ा पुरस्कार सोहळय़ात अनेक बक्षिसं मिळवून आरण्यक दिमाखात उभं आहे. महाभारताची पार्श्वभूमी असल्याने त्यात दिमाखदारपणा ठासून भरला आहे. ही गंमत प्रेक्षकांना भावणारी आहे. ‘आरण्यक’ भव्यता राखून सादर होतंय. तसंच दुसरं नाटक आहे ‘हॅम्लेट’. ‘हॅम्लेट’ मातब्बर नावाजलेले कलाकार घेऊन सामोरं आलेलं आहे. ग्लॅमर आणि पाश्चिमात्य ग्रॅन्जर घेऊन ‘हॅम्लेट’ उभं ठाकतं आणि प्रेक्षकांना तितकंच भावतं.

परत सादर झालेल्या मराठी नाटकांची यादी तशी मोठी आहे. लेकरे उदंड झाली, संकेत मिलनाचा, षड्यंत्र, प्रेमाच्या गावा जावे, ती फुलराणी, वाऱयावरची वरात अशी बरीच नाटकं आहेत. मराठी मनाला रुचणारी ही नाटकं नवीन वेष्टनात गुंडाळून पुन्हा येणार आणि मायबाप प्रक्षकांच्या सेवेत रुजू होत राहणार. आचार्य अत्रेंचं ‘मोरूची मावशी’सुद्धा पुन्हा रुजू झालंय. सुपरस्टार भरत जाधव मावशी झालाय. प्रयोग नुकतेच सुरू झालेत आणि मस्त चाललेत. आजवर 2500 पेक्षा जास्त प्रयोग करून ‘मोरूची मावशी’ हे एक विक्रमी मराठी नाटक आहे.

नाटय़सृष्टीत रिमेकचा रेकॉर्ड मात्र वसंत कानेटकर यांच्याकडे आहे. त्यांचं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे दरवर्षी शिवजयंतीला, म्हणजे वर्षातून दोनदा प्रत्येक मराठी शाळेतून तरी होतंच. कानेटकरांचं ‘मत्स्यगंधा’ हे नाटक गाजलं ते त्यातील संगीतामुळे. सध्या हे नाटक पुन्हा एकदा संगीतनाटकांची आठवण देत सुरू आहे. ‘तू तर चाफेकळी’सारखी गाणी प्रेक्षकांना रिझवताहेत आणि नव्या दमाचे गायक कलाकार ती ताकदीने सादर करताहेत. परंतु कानेटकरांचं एकदम कडक नाटक म्हणजे ‘अश्रूंची झाली फुले’. आज हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येतंय. काशीनाथ घाणेकरांना अजरामर करणारं हे नाटक रसिकांनी ज्याला साक्षात घाणेकर म्हणून स्वीकारलं तो सुबोध भावे करणार आहे. नाटक, नट, निर्माता प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत आणि म्हणूनच नाटय़सृष्टी पुन्हा एका सुपरहीटसाठी सज्ज झालीये.

[email protected]