ठसा : पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे

3
dr-ashok-kukade

>>अभय मिरजकर

सेवाकार्यास प्राधान्य देणारे कर्मयोगी म्हणून महाराष्ट्रात ओळख असणारे लातूर येथील डॉ. अशोक कुकडे यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’  पुरस्कार जाहीर केला. सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तींना यामुळे निश्चितच ऊर्जा मिळणार आहे. लातूर ही कर्मभूमी म्हणून निकडणारे डॉ. अशोक कुकडे यांनी पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून 1962 मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठात ते सर्वप्रथम होते. 1965 मध्ये त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1966 मध्ये स्थापन झालेल्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य, विश्वस्त म्हणून त्यांनी सेवाकार्यास सुरुवात केली. अनेक परिषदांमधून त्यांनी सहभाग घेतला. चर्चासत्रांमधून अभिभाषणे, निबंध वाचन, वैद्यकीय महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापनाचे कार्यही त्यांनी केले. बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. त्यामुळेच त्यांना सेवा, सार्वजनिक कार्याची प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक, प्रांत सेवाप्रमुख, प्रांतसंघचालक, पश्चिम क्षेत्र संघचालक असे कार्यही त्यांनी पार पाडलेले आहे. संघाच्या जनकल्याण समितीच्या कामातही त्यांनी दीर्घकाळ आपले योगदान दिले. आठ वर्षे त्यांनी प्रांत अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अनेक रक्तपेढय़ा, सेवा प्रकल्प, निवासी विद्यालये, रुग्णालये, शिक्षण संस्थांचे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. लातुरातील विवेकानंद रुग्णालयाची आजही ओळख डॉ. कुकडे यांचा दवाखाना म्हणूनच आहे. त्यांच्या सेवाकार्याची दखल महाराष्ट्रात अनेक संस्थांनी यापूर्वी घेतलेली आहे आणि त्यांचा यथोचित सन्मानही केला आहे. शतायुषी (पुणे), एफआयई फाऊंडेशन राष्ट्रीय पुरस्कार, पु.भा. भावे पुरस्कार, म.बा. नातू पुरस्कार, आर.जी. जोशी फाऊंडेशनचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (संभाजीनगर) जीवनगौरव पुरस्कार, मदन गोपाल व्यास पुरस्कार, चिखली अर्बन बँकेचा जीवनगौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा (नांदेड) जीवनगौरव पुरस्कार, संत ईश्वर ऍवॉर्ड (दिल्ली) तसेच जलयुक्त कामासाठी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. 1993 मध्ये लातूर-धाराशीवमधील प्रलयकारी भूकंपानंतर विवेकानंद रुग्णालय आणि जनकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची सर्वांनीच प्रशंसा केलेली आहे. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले. सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट, कसबे तडकळा (जि. धाराशीव), डॉ. हेडगेकार रुग्णालय (संभाजीनगर), श्री गुरुजी रुग्णालय (नाशिक) या संस्थांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्यांना नुकतेच ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल एका निष्काम कर्मयोग्याचा योग्य सन्मान करण्यात आल्याची भाकनाच सर्वत्र व्यक्त होत आहे.