ठसा : कविता कुलकर्णी-बंकापुरे

3

 दुर्गेश आखाडे

painter-kavita-kulkarni आकार – उकार, रंग – रेषांची कोणतीही बैठक नसताना कागदावर जे उमटणारं चित्र पूर्ण होताच त्याचे अर्थ मेंदूचा वेध घेऊ लागतात अशी अमूर्त कला. काहीतरी वेगळं, हटके हवं असा विचार करणाऱया मंडळींना ही अमूर्त कला जास्त आकर्षित करते. अमूर्त कलेतील रेखाटलेले चित्र पाहून हे काय, का? असे रंग पसरले आहेत असे प्रश्न डोक्याला झिणझिण्या आणतात, पण त्या चित्राकडे निरखून पाहिलं तर तुमची निरीक्षण शक्ती तुम्हाला काहीतरी नवीन अर्थबोध करून जाते. ‘‘रंगात रंगून रंग माझा वेगळा’’ सांगणारी अमूर्त कला खरंच विचार करायला लावते.

रत्नागिरीसारख्या शहरात चित्रकलेचे धडे गिरवलेल्या कविता कुलकर्णी-बंकापुरे यांनी अमूर्त कलेत नवा शोध सुरू केलाय. चित्रकलेचे शिक्षण घेत असताना त्यांनी रंगांच्या विविध अंगांचा अभ्यास सुरू केला. अमूर्त कलेत काम करताना रंगाशी झालेली मैत्री अधिक उपयुक्त ठरली. काळा रंग आपल्याला अशुभ वाटतो, पण अमूर्त कलेत त्यांनी कागदावर फटकारलेला काळा रंग रात्र दर्शवतो तर कधी प्रणय प्रकट करतो. लाल रंग म्हटला की, धोका असं पहिलं मत असलं तरी अमूर्त कलेत लाल रंग रक्त, वाढत जाणारी गोष्ट, भीषणता तर हाच लाल रंग कधी कधी  प्रेमाचे उत्कट भाव सांगून जातो. रंगाचे अनेक पैलू आहेत. हे पैलू प्रत्येक छटेमधून वेगळे भाव प्रकट करतात. कविताने अमूर्त कलेची दिनदर्शिका तयार केली आहे. जानेवारीपासून डिसेंबर  महिन्याची ओळख रंगाच्या छटा सांगतात. सध्या त्या ‘लहान मुलांमध्ये रंगाचे आकर्षण’ यावर अभ्यास करत असून त्यांच्या निरीक्षणानंतर त्या सांगतात की, लहान मुलांना पिवळा आणि हिरवा रंग आवडतो. अलीकडे पाश्चात्त्य संस्कृतीचे आचरण करत पालक लहान मुलींना गुलाबी आणि मुलांना निळ्या रंगाचे कपडे विकत घेत  असले तरी लहान मुलांमध्ये निसर्गतः हिरवा आणि पिवळा रंग अधिक आवडीचा असतो. त्यामुळे विविध रंगांचा लहान मुलांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करून त्यातून अमूर्त चित्रकला रेखाटण्याचा त्यांचा मानस आहे. अमूर्त कलेने आज घरातील भिंतींची जागा पटकावली आहे ती तिच्यातील वेगळेपणामुळेच. अमूर्त कलेचा आज घरातील सजावटीसाठी मोठय़ा प्रमाणात वापर होत असून त्यातूनच अमूर्त कलेला  अर्थार्जनाचा मार्ग मिळत आहे. कविता आणि त्यांचा पती कौस्तुभ यांनी आर्ट कट्टा ही संस्था सुरू करून चाळीस चित्रकारांचे श्रीलंकेत एक चित्रप्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनातून अनेक चित्रांची विक्री झाली. त्यानंतर पुण्यातही एक राष्ट्रीय स्तरावरचे चित्रप्रदर्शन त्यांनी आयोजित केले. कविताची चित्रे आज लंडन, सिंगापूर आणि दुबईपर्यंत पोहोचली आहेत. भित्तिचित्रांच्या माध्यमातून नवनवीन कल्पना तिने चित्रातून  मांडल्या आहेत. रत्नागिरीतील गोकूळ या दुकानात गाईचे काढलेले भित्तिचित्र त्यांच्या कल्पनाविष्काराची ओळख करून देते. इंटरनेटवर स्वस्त दरात मिळाणाऱया भित्तिचित्रामुळे भित्तिचित्रकारांचे वाईट दिवस आले आहेत. भित्तिचित्रकारांनी सांगितलेले मानधन अधिक वाटते असं सांगताना सध्या कलेविषयी प्रचंड अनास्था असून कलाकारांना वाईट दिवस असल्याची खंत कविता कुलकर्णी-बंकापुरे व्यक्त करतात.