पंढरपुरातील मूर्त सांस्कृतिक वारशाचा मागोवा

>> डॉ. वैशाली प्रसाद लाटकर

जुलै महिना आला की वारीची चाहूल लागते आणि सारा महाराष्ट्र वारीमय होऊन जातो. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची ओळख बनली आहे. अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक गोवा प्रांतातल्या लोकांनाही वेड लावणारा विठ्ठल हे महाराष्ट्राचेच दैवत बनून राहिला आहे. या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी ऊन पावसाची तमा न करता अठरा दिवस चालतो. पंढरपुरात पोचल्यावरही चंद्रभागेत स्नान, नगर प्रदक्षिणा आणि दुरून कलश दर्शन यात समाधान मानतो. पंढरपूर म्हणजे विठ्ठलाचे देऊळ आणि चंद्रभागा अशीच लोकांची समजूत आहे, पण या विठ्ठलाच्या पंढरपुरात अनेक संत मंडळी आणि वारकरी परंपरेशी संबंधित अनेक स्थळे जागोजागी विखुरलेली दिसतात. कित्येक शतके या ठेव्याची निर्मिती होत राहिली आहे. सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रदृष्ट्या या मूर्त ठेव्याचे मूल्य खूप उच्च आहे. त्या संबधित स्थळांचा आणि वास्तूंचा मागोवा घेणे उद्बोधक ठरेल. 

गेली हजार वर्षांपेक्षा जास्त काळ पांडुरंगाची वारी चालू आहे. आठव्या शतकापासून पांडुरंग चंद्रभागेतीरी उभा असल्याचे संदर्भ मिळतात. त्याकरिता शंकराचार्यांच्या एका संस्कृत श्लोकाचा आधार दिला जातो. त्याकाळी पांडुरंग हा भीमेतीरी एका टेकाडावर उभा असल्याचे सांगतात. काळाच्या ओघात त्या भोवतीचा परिसर विकसित होत गेला आणि हे टेकाड नागरीकरणाच्या प्रक्रियेत लुप्त झाले. पण आजही महाद्वार घाट चढून वर आल्यावर विठ्ठलाचे मंदिर उंचावर वसल्याचे आढळून येते. पांडुरंग पंढरपूरमध्ये येण्याची चार कारणे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कथाही सांगितल्या गेल्या आहेत. पुराणातून, लोकसाहित्यातून संत वाङ्मयातून पंढरपूरच्या विकासाचा मागोवा घेऊ शकतो.

पुराणात पांडुरंग पंढरपुरी येण्याच्या चार कथा सांगितल्या आहेत. त्यात पहिले कारण सांगणारी कथा ही कृष्णावर रुसून रुक्मिणी दिंडीरवनात जाऊन बसली आणि मग तिला शोधत कृष्ण पंढरपुरात आले. आल्यावर त्यांनी आपली गायी वासरे गोपाळपुरात ठेवली, इथे जवळच विष्णुपदावर आपल्या सवंगड्यांसोबत गोपाळ काला खाल्ला. हे ठिकाण गोपाळपूर म्हणूनच ओळखले जाते. दिंडीरवनातील लखुबाई हीच रुक्मिणी असल्याचे ज्येष्ठ अभ्यासक ढेरे म्हणतात. कृष्णाच्या जीवनाशी निगडीत ठिकाणांचा संचच इथे कल्पिलेला दिसतो. गोपाळपुराची टेकडी हा इथला गोवर्धन पर्वत होतो, तर त्याच्या पायाशी वाहणारी पुष्पावती नदी (जिचे आजचे स्वरूप एका लहान नाल्याचे आहे) ही इथली यमुना होते. ह्या पुष्पावती आणि भीमेच्या संगमा जवळ विष्णुपद आहे. भौगोलिक दृष्टया विचार करता ह्या विष्णुपदाचे गयेच्या विष्णूपदाशी बरेच साधर्म्य आढळून येते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पंढरपूरवासी मार्गशीर्षात विष्णुपदावर सहभोजनाचा आनंद घेण्यास जात. मार्गशीर्षात कार्तिकी वारीनंतर विठ्ठल इथे विश्रांतीसाठी येतात असे मानले जाते. सहभोजन हे कृष्णाच्या गोपाळकाल्यासारखे आहे. गोपजनाशी संबंधित काल्याला वारकरी परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. वारकरीपरंपरेतील कुठलाही कार्यक्रम हा काल्याच्या कीर्तनाने संपन्न होतो.

दुसर्‍या कथेत दिण्डीरवा या असुराचा वध करण्यासाठी विष्णूनी मल्लिकार्जुनाचा अवतार धारण केला व त्याचा निःपात केला. विठ्ठलाचे ज्येष्ठ अभ्यासक ढेरे यांनी दिंडीरवन म्हणजे चिंचेचे वन असल्याचे भाष्य केले आहे. हा भाग लखुबाईच्या देवळाजवळ आहे. आजही या भागात चिंचेची बरीच झाडे आहेत.

तिसर्‍या कथेत पद्मा नावाची सुंदर युवती योग्य वरासाठी आराधना करत असता साक्षात देव तिच्या समोर चित्तवेधक रूपात उपस्थित झाले. ते रूप पाहाताच ती देवावर भाळून गेली, तिचा केशसंभार मुक्त झाला. यामुळे तिला मुक्तकेशी हे नाव मिळाले. मुक्तकेशी हे पुराणात आढळणार्‍या येथील तीर्थापैकी एक तीर्थ आहे. स्टेशन रस्त्यावरील पद्मावतीच्या मंदिराचे तीर्थ हे असल्याचा कयास आहे.

चौथी कथा ही सर्वज्ञात भक्त पुंडलिकाची आहे. मातृ आणि पितृभक्त पुंडलीकाने त्याला भेटावयास आलेल्या कृष्णाला उभे राहण्यास वीट दिली आणि तेव्हापासून विठ्ठल हा इथे विटेवर उभा आहे असे मानले जाते. या चारही कथेतील उद्धृत ठिकाणे आज पंढरपूरमध्ये शोधता येतात. पौराणिक काळापासून मध्ययुगीन वारकरी परंपरेसकट लोक संस्कृतीचे वेगवेगळे स्तर पंढरपुरात दिसतात. सगळ्याचा केंद्रबिंदू हा विठ्ठलच. पंढरी महात्म्यात पौराणिक पुंडरीक क्षेत्राची व्याप्ती बहिर्द्वारे आणि अंतर्द्वारांनी सीमित झाली आहे. त्यानुसार पूर्वेला तेरचा त्रिविक्रम, दक्षिणेला शूर्पालीचा शिव, पश्चिमेला करवीर महानिवासिनी महालक्ष्मी आणि उत्तरेला नीरा- नरसिंगपूरचा नृसिंह ही बहिर्द्वारे आहेत. तर पूर्वेला देगावची संध्यावळी देवी, पश्चिमेला कासेगाव रस्त्यावरची भुवनेश्वरी देवी, उत्तरेला इसबावी या गावांजवळच्या टेकडीवरील दूर्गादेवी आणि दक्षिणेला सिद्धेश्वर, ही पौण्डरिक क्षेत्राची अंतर्द्वारे आहेत. यातील सिद्धेश्वर कोणता याबाबतीत वेगवेगळी मते आहेत. त्यात ४० किलोमीटरवर असलेल्या माचनूरचा सिद्धेश्वर, गोपाळपूरपासून पुढे असलेला अंतापुरचा महादेव आणि विष्णुपदाजवळील महादेव यांचा समावेश होतो. परंतु भौगोलिक ठिकाणांचा आणि अंतराचा विचार करता प्रसिद्ध डच अभ्यासक एरिक सँड यांनी नारद मंदिराजवळील महादेव हा सिद्धेश्वर असावा असा निष्कर्ष काढला आहे. तो जास्त संयुक्तिक वाटतो. आज हे छोटे देऊळ पाण्यात आहे पण त्याचा कळस दिसतो.

हिंदू धर्मातील तीर्थ क्षेत्रांमध्ये एक वारंवार आढळणारी धार्मिक बाब म्हणजे या धर्मातील अति पवित्र आणि महत्त्वाच्या नद्या, पर्वत आणि संबंधित क्षेत्रे यांचे प्रादेशिक भूभागावर काल्पनिक पुनर्निर्माण केलेले दिसते. म्हणून प्रादेशिक गंगा, काशी अशी ठिकाणे ऐकावयास मिळतात. तसेच पंढरपूर परिसरात विठ्ठल, विष्णुपद आणि कोर्टीचा भास्कर यांचे दर्शन घेतले की, काशी-गया-प्रयाग या यात्रेचे पुण्य लाभते असे पंढरी महात्म्यात सांगितले गेले आहे. यातच पुढे पौन्डरिक क्षेत्राची १२ ज्योर्तिलिंगेही समाविष्ट आहेत. ही सारी देवळे पंढरपूरच्या पंचक्रोशीत आढळतात.

पुराणातील या पंढरपुरापेक्षा आज संतांचे पंढरपूर जास्त ज्ञात आहे. ज्ञानेश्वरांपासून पंढरपूरचा इतिहास हा संत परंपरेने व्यापलेला आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावतामाळी, चोखोबा, नरहरी सोनार अशा वेगवेगळ्या वर्गातील संतांनी समाजाला भक्तीचा साधा मार्ग दाखवला. जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा या स्त्री संतांचेही योगदान महत्त्वाचे आहे. कर्मकांडाला आणि जुलमी राजवटीला कंटाळलेल्या सामान्य जनतेला तो आपलासा वाटला. भजन कीर्तनासारख्या सामूहिक धार्मिक परंपरांचा विकास झाला. चारशे वर्षाच्या या काळात नवीन धार्मिक वास्तू फार प्रमाणात निर्मिल्या गेल्या नाहीत. निळोबारायानंतर संतांची परंपरा खंडित होऊन शिष्य परंपरा चालू झालेली दिसते. याचेच प्रतिबिंब इथल्या वास्तुवैभवात बघण्यास मिळते. मठ आणि फड या वास्तूंचा विकासही याच काळात झाला. कर्मकांड सोडून जेव्हा भक्तिमार्ग प्रचलित झाला तेव्हा वैयक्तिक साधनेपेक्षा सामूहिक भजन, कीर्तनाला महत्त्व आले. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मठ हा वास्तू प्रकार. काळानुसार अठराव्या शतकात पंढरपूरचा नगर रचना व वास्तुशास्त्राचा विकास झालेला आढळतो. तुकाराम महाराजांच्या वंशाजांपैकी एक शाखा पंढरपूरमध्ये येऊन स्थायिक झाली. तुकारामांच्या वंशजांनी नगर प्रदक्षिणेला सुरुवात केली आणि आज नगर प्रदक्षिणा हा एक महत्त्वाचा सोहोळा बनला आहे. नगर प्रदक्षिणा मार्गावर नंतरच्या काळात महत्त्वाचे मठ आणि फड बांधले गेले. तुकाराम, नामदेव, एकनाथ या संतांची देवळे हे वास्तू रचनेच्या दृष्टीने उत्कृष्ट नमुने आहेत. रामबागेतील मंदिरही वास्तू रचनेचा चांगला आविष्कार आहे.

मराठा काळात पंढरपुरात मोठ्या प्रमाणात वास्तू निर्मिती झालेली दिसते. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले राम मंदिर आणि धर्मशाळा आजही महाद्वार घाटावर उभी आहेत. याच्याच समोर शिंदे सरकारांनी बांधलेले द्वारकाधीशाचे दगडी देऊळ आहे. या काळात नदी काठावर मातब्बर मराठा सरदारांचे वाडे बांधले गेले यातील बरेचसे वाडे नंतर मठामध्ये रुपांतरित झाले. उत्तम प्रतीचे वीटकाम असणारा वासकर फड, कबीर मठ तसेच अंमळनेरकर मठाची तसेच होळकर धर्मशाळेची वास्तू हे पंढरपूरचे वास्तुवैभवच आहे. फड या पूर्वी मोकळ्या जागाच होत्या. तिथे एकादशीची भजने, कीर्तने आणि जागर होई. कालानुरूप तिथेही वास्तू उभारल्या गेल्या. आजही कार्तिकी एकादशीला नदीपात्रातील वाळवंटात उभे राहतात. मानाच्या फडांच्या जागाही निर्धारित आहेत. स्वयंशिस्तीचे उत्तम दर्शन या पारंपारिक प्रकारात होते.

शिष्य परंपरेने निर्माण केलेला अजून एक वास्तू प्रकार म्हणजे समाधी मंदिरे. छोट्या दगडापासून मोठ्या मंदिरांपर्यंत समाधी प्रकार पहावयास मिळतो. नदी पात्रातील बेलापूरकर महाराज, देहूकर महाराज, धुंडा आणि गुंडामहाराज, पुंडलिक मायबाप, अमळनेरकर महाराज यांची समाधी मंदिरे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. विसाव्या शतकात पर्यावरणीय पैलूंचा विचार करून नदी पात्रात समाधी घेण्यास बंदी घालण्यात आली.

खुद्द विठ्ठलाच्या देवळाची वास्तूही अनेक शतक विकसित होत राहिली. आज या देवळात विठ्ठल रुक्मिणी व्यतिरिक्त पस्तीस एक देव आणि सहा संतांची स्थाने आहेत. त्यात राम–लक्ष्मण, सूर्य नारायण, खंडोबा, राही, सत्यभामा, महालक्ष्मी, नृसिंह, गणपती यांचा समावेश आहे. पंढरपूरच्या पंचक्रोशीत साठ एक जुनी देवळे आहेत. त्यात ताकपिठ्या विठोबा, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जुन, चंद्रभागा, द्वारकाधीश, होळकर राम मंदिर, पद्मावती, नगरेश्वर, विष्णुपद, पंचगंगा, नामदेव, एकनाथ, नंद यशोदा, संध्यावळीदेवीचे मंदिर यासारखी मंदिरे वास्तुकलेची उत्तम उदाहरणे आहेत.

या सर्वव्यापी संत परंपरेखेरीज एक लोक संस्कृतीचाही पदर पंढरपुरामध्ये आढळतो. नदीकाठाची अनेक शंकराची देवळे कोळी समाजाच्या पुजारी लोकांकडे आहेत. रेल्वे आणि गाड्यांच्या काळात कोळी समाजाचे पंढरपूरच्या विकासातील स्थान लक्षात येणे अवघड आहे, पण प्रगत दळणवळणाची साधने नसताना नदीपलीकडे जाण्यासाठी होडीचाच वापर होत असणार. हे कोळी नाव वल्हवताना गुणगुणत,

‘सावळ्या ये रे सावळ्या ये रे

सावळ्या रामाच्या ढवळ्या गायी

घुसळण घुसळी रखमा बाई

लोणी खातो पंढरीनाथ

नको खाऊ कच्चे लोणी

साखर आणतो तुकाराम वाणी

अशा अनेक लोकगीतात विठ्ठल, रुक्मिणी, चंद्रभागा, चंद्रभागेचा पूर, संत मंडळी अजरामर झालीत.

याखेरीज पारंपरिक पद्धतीने हवामानुरूप सांस्कृतिक आणिक धार्मिक पैलूंचा विचार करून बांधलेली घरे हा पंढरपूरचा सांस्कृतिक ठेवाच आहे. लोक संस्कृतीचा, संस्कृतीकरणाचा आणि वारकरी परंपरेचा इतका वैविध्यपूर्ण आविष्कार फक्त पंढरपुरातच आढळून येतो. वाढत्या शहरीकरणात हा कुठे लुप्त होऊन जाणार नाही या करता सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

[email protected]

(लेखिका वास्तूसंवर्धन तज्ञ असून पंढरपुराबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे.)