पांडुरंग फुंडकर

>> राजेश देशमाने

राज्याचे कृषिमंत्री व बुलढाणा जिह्याचे पालकमंत्री म्हणून पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळीच छाप सोडली आहे. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेला नेता हरपला आहे. गावपातळीवर भाजपचे संघटन काम वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान लागले. त्यांनी सलग तीन वेळेस अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९८९ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. ९१-९६ या काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९७८-८० च्या सुमारास महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. २०१६ साली महाराष्ट्र मंत्रिमंडळात कृषिमंत्रीपद व बुलढाणा जिह्याचे पालकमंत्रिपद त्यांना प्राप्त झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी शेतकरी हा राज्याच्या विकासाचा कणा आहे आणि तो सुखी समाधानी असावा या दिशेने निर्णय घेतले. भाऊसाहेब शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याकडे आकर्षित झाले होते. १९७४ पासून जनसंघ युवा आघाडीचे जिल्हा चिटणीस या पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी भाजपचे आमदार, खासदार, भाजप प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व कृषिमंत्रीपद भूषविले. भाऊसाहेब फुंडकर यांचा जन्म बुलढाणा जिह्यातील नांदुरा तालुक्यातील नारखेड या छोट्य़ाशा गावातील शेतकरी कुटुंबात झाला. भाऊसाहेबांनी एम.ए. इकॉनॉमिक्सपर्यंत शिक्षण घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. वाचन व संगीत ऐकणे हे छंद आपल्या राजकीय व्यस्त जीवनातदेखील जोपासले. १९७५ ला आणीबाणीच्या काळात कॉलेज सोडून भूमिगत राहून त्यांनी जनजागृती केली. १९७६ ला आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केला. कारागृहाबाहेर आल्यानंतर ‘मिसा’मध्येही त्यांना अटक होऊन नऊ महिने ‘मिसाबंदी’चा कारावास ठाणे तुरुंगात त्यांनी भोगला. १९७७ ला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भाजपचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवातीला खामगाव तालुका सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. १९८० ला युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव व १९८२ युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. १९९२ ते १९९९ व २००० ते २००३ पर्यंत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणूनदेखील काम पाहिले. या काळात त्यांनी गावपातळीवर भाजपचे काम उभे केले. भाजपचे गोपीनाथ मुंडे व भाऊसाहेब फुंडकर ही मैत्री उभ्या महाराष्ट्राने पाहिली.

भाजपची पक्षीय जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली. खामगाव ते नागपूर विधान भवन ३५० किलोमीटर पायी पदयात्रा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढली. शेतकरी नेता म्हणून ते पुढे आले. १९७८ व १९८० ला खामगाव विधानसभा निवडणूक लढवली व ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून १९८९, १९९१ व १९९६ ला खासदार म्हणून तीन वेळा प्रतिनिधित्व केले. २००६ ला उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवदेखील करण्यात आला. २००२, २००८ व २०१४ असे तीनवेळा विधान परिषदेवर विधानसभा सदस्य मतदारसंघातून विजयी झाले. यादरम्यान २००५ ते २०१२ पर्यंत त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्याचबरोबर राज्याच्या अंदाजपत्रक समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी या समित्यांवर काम केले. ८ जुलै २०१६ पासून राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. सिंचनासाठी शेततळे बनवण्यापासून ते ठिबक सिंचनापर्यंत तसेच बियाणे, औजारे, पुरवठा, हवामानाच्या माहितीसाठी आधुनिक योजना, विमा योजनेपासून ते कर्जमाफीपर्यंत विविध प्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय त्यांनी कृषिमंत्री म्हणून घेतले. भाऊसाहेबांनी सहकार क्षेत्रातसुद्धा विविध पदे भूषवली. त्यामध्ये संजय गांधी सहकारी सूतगिरणी, जळगाव जामोदचे अध्यक्ष म्हणूनदेखील काम पाहिले. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे ते १९९६ ला मुख्य प्रशासक झाले. १९९० ते २००० पर्यंत त्यांनी राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. फेडरेशन मुंबई-गोवा, खामगाव अर्बन बँक, पांडुरंग नागरी सहकारी सोसायटी खामगाव, खामगाव एज्युकेशन सोसायटीवरदेखील संचालक म्हणून काम पाहिले. विधिमंडळ सदस्य म्हणून काम करीत असताना त्यांनी अनेक विदेश दौरे केले. भाऊसाहेब फुंडकर यांचे झालेले अकाली निधन अनेकांना चटका लावून गेले.